VIDEO: पाकिस्तानातून आलेलं 'ते' संकट महाराष्ट्रात; कोट्यवधींचं नुकसान होण्याची शक्यता
By ऑनलाइन लोकमत | Published: May 25, 2020 09:21 PM2020-05-25T21:21:05+5:302020-05-25T21:30:13+5:30
कोरोनाचं संकट अधिक गहिरं होत असताना राज्यावर आणखी एक संकट
अमरावती: एकीकडे कोरोनाचं संकट वाढत असताना दुसरीकडे राज्यावर आणखी एक संकट आलं आहे. पाकिस्तानमधून आलेले टोळ कीटक मध्य प्रदेशातून महाराष्ट्रात शिरले आहेत. मध्यप्रदेशाच्या सीमेवरून मोर्शी, वरूड व मेळघाटात टोळधाड दाखल झाली आहे. ताशी १२ ते १६ किलोमीटरच्या वेगाने ही टोळधाड पुढे सरकत आहे.
टोळधाडीने मोर्शी तालुक्यात आक्रमण केल्यानंतर सोमवारी सकाळी वरूड तालुक्यात शिरकाव केला. पुढे इत्तमगाव, पळसवाडा, काचूर्णाकडे आगेकूच केली आहे. शेतकरी तसेच संत्रा बागायतदार शेतकरी या आकस्मिक हल्ल्यानं हादरून गेले आहेत. ही टोळधाड पालेभाज्यांसह हिरव्या वृक्षांची पानं खात आहे. लाखोंच्या संख्येनं आलेले टोळ पिकांचा फडशा पाडत असल्यानं कोट्यवधींचं नुकसान होण्याची भीती व्यक्त होत आहे. ही नाकतोड्याच्या गटातील तांबूस रंगाची वाळवंटी टोळ असल्याचं कृषी विभागानं स्पष्ट केलं आहे.
कोरोना पाठोपाठ आणखी एक संकट महाराष्ट्रात; अमरावतीत पिकांवर टोळधाड pic.twitter.com/siAEDvliLr
— Lokmat (@MiLOKMAT) May 25, 2020
पाकिस्तानातून आलेल्या टोळ किटकांनी आधी राजस्थान आणि मध्य प्रदेशातल्या पिकांवर हल्ला चढवला. या राज्यांतील अनेक जिल्ह्यांना टोळधाडीचा फटका बसला. यामुळे उत्तर प्रदेश सरकारनं संपूर्ण राज्यात अलर्ट जारी केला. टोळधाड एप्रिलच्या दुसर्या आठवड्यात पाकिस्तानहून राजस्थानला पोहोचली. राजस्थानातील १८ आणि मध्य प्रदेशातील जवळपास १२ जिल्ह्यांतील पिकांचे नुकसान करुन टोळधाड उत्तर प्रदेशातील झांसी आणि आग्रापर्यंत पोहोचली. उत्तर प्रदेशातील १७ जिल्ह्यांतल्या पिकांचं टोळधाडीनं मोठं नुकसान केलं. यात आग्रा, अलीगड, मथुरा, बुलंदशहर, हाथरस, एटा, फिरोजाबाद, मैनपुरी, इटावा, फारुखाबाद, कानपूर, झांशी, हमीरपूर आणि ललितपूरचा समावेश आहे.
उत्तर प्रदेश कृषी विभागाच्या अधिकाऱ्यांच्या म्हणण्यानुसार, टोळांचा मोठा झुंड एका तासामध्ये कित्येक एकरातील उभ्या पिकांचे नुकसान करु शकतो. या परिस्थितीला सामोरे जाण्यासाठी उत्तर प्रदेशच्या कृषी विभागाने शेतकऱ्यांना जागरूक करण्यासाठी व्यापक मोहीम सुरू केली आहे. आग्रामध्ये जिल्हा प्रशासनाने २०४ ट्रॅक्टर रासायनिक फवारणीसह सज्ज ठेवले आहेत. २० मे रोजी राजस्थानच्या दौसा जिल्ह्यात टोळ कीटक पाहायला मिळाले. त्यानंतर अवघ्या ५ दिवसात टोळ कीटकांनी अजमेरपासून २०० किमी अंतरावरील दौसा गाठली.
कोरोनापाठोपाठ पाकिस्तानातून भारतात आलं मोठं संकट; संपूर्ण उत्तर प्रदेशात अलर्ट जारी
अडकलेल्या मजुरांसाठी 'देवदूत' ठरलेल्या सोनू सूदला गब्बरचा सलाम
राज्य सरकार अपयशी, त्यांना नारळ देऊन राष्ट्रपती राजवट लागू करा; राणेंचं ठाकरे सरकारवर शरसंधान