लॉज, हॉटेल्स नव्हेत, मृत्युची कोठडीच!
By लोकमत न्यूज नेटवर्क | Published: September 2, 2021 04:27 AM2021-09-02T04:27:40+5:302021-09-02T04:27:40+5:30
अमरावती : राजापेठ पोलीस ठाण्यासमोरील हॉटेल इम्पेरियाला लागलेल्या आगीदरम्यान उठलेल्या धुराच्या लोळाने नागपूरच्या दिलीप ठक्कर यांना प्राण गमवावे लागले. ...
अमरावती : राजापेठ पोलीस ठाण्यासमोरील हॉटेल इम्पेरियाला लागलेल्या आगीदरम्यान उठलेल्या धुराच्या लोळाने नागपूरच्या दिलीप ठक्कर यांना प्राण गमवावे लागले. तेथे आगप्रतिबंधक व्यवस्था नसल्याने, संचालकाच्या हलगर्जीपणामुळे ठक्कर यांचा बळी गेल्याच्या तक्रारीवरून हॉटेल मालकाविरूद्ध गुन्हादेखील नोंदविला गेला. या घटनेमुळे शहरातील हॉटेल, लॉजमधील अग्निरोधक यंत्रणेसह एकंदरित सुरक्षा व्यवस्थाच चव्हाट्यावर आली आहे. त्यापाश्वभूमिवर शहरातील १२५ च्या आसपास हॉटेल्स लॉजनी फायर ऑडिट करवून घेतले नसल्याची धक्कादायक माहिती हाती आली आहे.
महापालिकेच्या बाजार परवाना विभागातील नोंदीनुसार, शहरात १३० च्या संख्येत मोठे हॉटेल्स व लॉज आहेत. पैकी केवळ ७ हॉटेल्स लाॅजचे फायर ऑडिट झाले आहे. त्या सात आस्थापनांना महापालिकेच्या अग्निशमन विभागाकडून नाहरकत देण्यात आली आहे. त्यामुळे उर्वरित ‘स्टार’ हॉटेल वा लॉज म्हणून मिरविणाऱ्यांना व महापालिकेच्या अग्निशमन विभागाला प्राणांतिक अपघाताची प्रतीक्षा तर नाही ना, अशी साशंक भीती वर्तविण्यात येत आहे.
हॉटेल इम्पेरियाच्या माळ्यावर एकूण १३ रूम्स आहेत. त्या खोल्यांकडे जाण्या-येण्याचा मार्ग अतिशय चिंचोळा आहे. इमर्जंसी एक्झिटची सोय नाही. हाॅटेलचे फायर ऑडिट झालेले नाही. तेथील खोल्यांमध्ये सूर्यप्रकाश पोहोचत नाही. व्हेंटिलेशन नाही, त्यामुळे अशा मृत्यूच्या कोठडींना महापालिकेने परवानगी दिलीच कशी, असा प्रश्न उपस्थित झाला आहे. गतवर्षी जुन्या बायपासवरील एका हॉटेलला मोठी आग लागली होती. तेथील फायर ऑडिट झालेले नव्हते.
////////////////
फायर ऑडिट बंधनकारकच
महापालिकेने शहरातील सर्व हॉटेल्स, रेस्टॉरंट व बारचालकांना फायर ऑडिट बंधनकारक केले आहे. महाराष्ट्र आगप्रतिबंधक व जीवसंरक्षक उपाययोजना अधिनियम २००६ व नियम २००९ हे ६ डिसेंबर २००८ पासून लागू करण्यात आला आहे. या अधिनियमानुसार शासकीय कार्यालये, हॉटेल्स, लॉजेस, रेस्टाॅरंट, बियरबार, रुग्णालये, बहुमजली शैक्षणिक इमारती, शॉपिंग कॉम्प्लेक्स, मॉल्स, ऑफिसेस अशा व्यावसायिक इमारती, नाट्यगृहे, सिनेमागृहे, मंगल कार्यालये, औद्योगिक इमारती, गोदामे, सर्व प्रकारच्या संमिश्र वापराच्या इमारतीत अग्निप्रतिबंधक यंत्रणा लावणे बंधनकारक केले आहे.
//////
अग्निरोधक यंत्रणा हाताळता येईना
हॉटेल इम्पेरियामधील इलेक्ट्रिक पॅनेलला आग लागली, तेव्हा आत अग्निरोधक यंत्र (फायर एक्सटिंग्युशर) होते. मात्र, हॉटेलमधील स्टॉफला ते हाताळता आले नाही. महापालिकेच्या अग्निशमन पथकाने त्या यंत्रांचा वापर केल्याची माहिती प्रत्यक्षदर्शीनी दिली.
//////
कोट
शहरातील ज्या हॉटेल्स, रेस्टॉरंट व बारचालकांनी अद्यापही फायर ऑडिट केले नाही. अशांना नोटिसा बजावण्यात येणार आहेत. निर्धारित मुदतीत फायर ऑडिट न केल्यास थेट इमारतींना सील ठोकण्याची कारवाई केली जाणार आहे.
- प्रशांत रोडे, महापालिका आयुक्त