Lok Sabha Election 2019; बेपत्ता १८ मतदारांसाठी केंद्र
By लोकमत न्यूज नेटवर्क | Published: April 8, 2019 01:22 AM2019-04-08T01:22:25+5:302019-04-08T01:23:55+5:30
मेळघाट व्याघ्र प्रकल्पातून पुनर्वसित झालेल्या डोलार गावात कुणीही राहत नसताना लोकसभा निवडणुकीसाठी मतदान केंद्र ठेवण्यात आले आहे. ते राज्यातील बहुधा सर्वात लहान मतदान केंद्र ठरले आहे. अवघ्या १८ मतदारांसाठी या गावात केंद्र असणार आहे.
लोकमत न्यूज नेटवर्क
चिखलदरा : मेळघाट व्याघ्र प्रकल्पातून पुनर्वसित झालेल्या डोलार गावात कुणीही राहत नसताना लोकसभा निवडणुकीसाठी मतदान केंद्र ठेवण्यात आले आहे. ते राज्यातील बहुधा सर्वात लहान मतदान केंद्र ठरले आहे. अवघ्या १८ मतदारांसाठी या गावात केंद्र असणार आहे.
मेळघाट व्याघ्र प्रकल्पाच्या अतिसंरक्षित क्षेत्रात असलेल्या तालुक्यातील जवळपास १८ गावांचे पुनर्वसन करण्यात आले. त्यात अतिदुर्गम डोलार या गावाचासुद्धा समावेश आहे. सन २०१८ मध्ये या गावाचे पुनर्वसन झाले आहे. जवळपास ८० घरांचा समावेश असलेल्या या गावात २३३ मतदार होते. त्यामध्ये १२६ पुरुष आणि १०७ महिलांचा समावेश आहे. पुनर्वसन झाल्याने संपूर्ण गावातील आदिवासींची घरे-झोपड्या बेपत्ता झाल्या असल्या तरी अंगणवाडी व शाळेची इमारत अजूनही जैसे थे आहे. तेथेच लोकसभा निवडणुकीच्या मतदानाची तयारी करण्यात आली असून शाळेत मतदान केंद्र राहणार आहे. अचलपूर तालुक्यातील वाघडोह येथे १६९, धारणी तालुक्यातील टिटंबा येथे ४२, टिंगऱ्या येथे २, तर धारणी व माळीझडप येथे प्रत्येकी एक मतदाराची नोंद असल्याने तेथे डोलारचे पुनर्वसित मतदान करू शकणार आहेत.
१८ मतदार शोधता सापडेना
डोलार गावाचे पुनर्वसनादरम्यान तेथील मतदारांचा समावेश ते नव्याने राहत असलेल्या मतदान केंद्रावर करण्यात आला. परंतु १८ मतदारांचा शोध लागला नाही. त्यांच्यासाठी मतदान केंद्र ठेवण्यात आले आहे. ६१ क्रमांकाचे हे मतदान केंद्र्र असून चार मतदान अधिकारी, एक पोलीस कर्मचारी, कोतवाल अशी सहा जणांची यंत्रणा या १८ मतदारांसाठी राहणार आहे. हे मतदार डोलार गावात मतदानासाठी आले किंवा नाही, हे मात्र १८ एप्रिल रोजी सायंकाळी कळणार आहे. त्यांचा कायमचा पत्ता घेऊन त्यांना पुढील निवडणुकीत वास्तव्यातील गावात मतदान करता येईल.