Lok Sabha Election 2019; राजकीय पक्षांकडून मैदाने बुकींगसाठी स्पर्धा
By लोकमत न्यूज नेटवर्क | Published: April 2, 2019 01:06 PM2019-04-02T13:06:14+5:302019-04-02T13:07:28+5:30
राष्ट्रीय व राज्यस्तरीय नेत्यांच्या प्रचारसभांचे नियोजन राजकीय पक्षाकडून सुरू झाले आहे. त्यानुसार शहरात सभांसाठी प्रसिद्ध असलेली मैदाने बुकींगसाठी स्पर्धा असल्याचे चित्र आहे.
लोकमत न्यूज नेटवर्क
अमरावती : राष्ट्रीय व राज्यस्तरीय नेत्यांच्या प्रचारसभांचे नियोजन राजकीय पक्षाकडून सुरू झाले आहे. त्यानुसार शहरात सभांसाठी प्रसिद्ध असलेली मैदाने बुकींगसाठी स्पर्धा असल्याचे चित्र आहे. सायन्स्कोर, दसरा मैदान, नेहरू मैदान आणि गाडगेनगर येथील गाडगेबाबा समाधी मंदिरासमोरील प्रांगणाला पसंती दिली जात आहे.
प्रमुख राजकीय पक्षाच्या उमेदवारांनी प्रचारासाठी नेत्यांच्या सभा घेण्याचे नियोजन चालविले आहे. काही राजकीय पक्षांनी मैदाने बुकींग करून प्रतिस्पर्धी उमेदवारांची ‘नाकेबंदी’ केल्याचे दिसून येते. विरोधक उमेदवारांच्या प्रचारासाठी नेत्यांना सभा घेण्यासाठी प्रसिद्ध मैदाने मिळू नये, काहींची मैदाने बुकींग करण्यामागे राजकीय खेळी आहे. तसेच महापालिका मालकीचे प्रागंण, शाळांचे मैदाने, खुल्या जागासुद्धा बुकींग करण्याचा फंडा सुरू आहे. १० ते १२ हजार रुपयांचे शुल्क अदा करून मैदाने बुकींग होत आहे. येत्या काही दिवसांत भाजप-शिवसेना, काँग्रेस- राष्ट्रवादी, बसपासह अन्य पक्षाच्या उमेदवारांच्या प्रचारासाठी नेत्यांची अमरावती मांदियाळी असणार आहे. मैदाने बुकींगकरिता परवानगी मिळवायची असल्यास जिल्हाधिकारी कार्यालयात एक खिडकीतून कागदपत्रांची पूर्तता केल्यास ती उपलब्ध होते. जिल्हा परिषदेच्या नियंत्रणातील सायन्स्कोर मैदान व अॅकेडमिक ग्राऊंड बुकींग करिता १२ हजार रूपयांचे शुल्क अदा करावे लागते. नेहरू मैदान बुकींगकरिता अद्यापपर्यंत कोणत्याही पक्षाकडून मागणी करण्यात आलेली नाही. बडनेरा जुनीवस्ती येथील सावता मैदान १५ व १६ एप्रिल रोजी युवा स्वाभिमान पार्टीकडून बुकींग करण्यात आले आहे.