Lok Sabha Election 2019; यंदा सखी मतदान केंद्राची संकल्पना
By लोकमत न्यूज नेटवर्क | Published: April 2, 2019 10:46 PM2019-04-02T22:46:01+5:302019-04-02T22:46:29+5:30
आगामी लोकसभा निवडणुकांसाठी प्रत्येक लोकसभा मतदारसंघात ‘महिला व्यवस्थापित मतदान केंद्र’ निर्माण करण्यात येणार आहे. केंद्रीय निवडणूक आयोगाने तसे आदेश दिले असून, याची अंमलबजावणी महाराष्ट्रात करण्यात येणार आहे.
लोकमत न्यूज नेटवर्क
अमरावती : आगामी लोकसभा निवडणुकांसाठी प्रत्येक लोकसभा मतदारसंघात ‘महिला व्यवस्थापित मतदान केंद्र’ निर्माण करण्यात येणार आहे. केंद्रीय निवडणूक आयोगाने तसे आदेश दिले असून, याची अंमलबजावणी महाराष्ट्रात करण्यात येणार आहे. या मतदान केंद्रांमध्ये तैनात असलेल्या पोलिसांपासून ते निवडणूक कार्यावर असलेल्या अधिकारी आणि कर्मचारी यांच्यासह सर्वच जण महिला असतील. सर्व महिला व्यवस्थापित मतदान केंद्रे सखी मतदान केंद्रे’ म्हणून ओळखली जाणार आहेत.
लैंगिक समानता आणि मतदार प्रक्रियेत महिलांच्या अधिक रचनात्मक सहभागासंबंधातील वचनबद्धतेचा भाग म्हणून आगामी लोकसभा निवडणुकीसाठी महिलांनी चालविलेले महिला मतदान केंद्र राहणार असून, याला ‘सखी मतदान केंद्र’ असे म्हटले जाणार आहे.
महिलाशक्ती निर्णायक
यंदाच्या निवडणुकीत महिलाशक्ती निर्णायक ठरणार आहे. २०१४ च्या तुलनेमध्ये महिला मतदार दरहजारी ८८९ वरून ९११ झाल्या आहेत. सन २०१४ मध्ये मतदार यादीतील महिलांचे प्रमाण एक हजार पुरुषांमागे ८८९ इतके होते. आता मात्र सन २०१९ या प्रमाणात एक हजार पुरुषांमागे ९११ अशी लक्षणीय सुधारणा झाली आहे.
केंद्राच्या रंगरंगोटीसह सफाईवर लक्ष
सर्व महिला व्यवस्थापित मतदान केंद्रात विशिष्ट रंग वापरला जाणार नाही. केंद्रातील कुठल्याही खास राजकीय पक्षाच्या रंगाचा अनावश्यक वापर टाळण्याचे निवडणूक आयोगाचे निर्देश आहेत. या मतदान केंद्रात तैनात महिला त्यांच्या आवडीच्या कोणत्याही रंगाचा पोशाख परिधान करू शकतात.
महिलांचा मतदानाचा टक्का वाढण्यावर भर
‘सखी मतदान केंद्र’ स्थापन करण्याच्या निर्णयामुळे महिलांचा मतदानातील सहभाग वाढण्यास मदत होणार आहे. सखी मतदार केंद्रावर अधिकारी, कर्मचारी महिला असतील. प्रत्येक मतदारसंघातून एकाच मतदान केंद्राची निवड होईल. महिला मतदान केंद्र निवडताना केंद्राची सुरक्षितता लक्षात घेतली जाणार आहे. संवेदनशील केंद्र टाळून निवडणूक प्रक्रियेतील अधिकाऱ्यांचा कायम संपर्क राहील, अशा ठिकाणी केंद्राची निवड करण्यात येणार आहे.