Lok Sabha Election 2019; काँग्रेस-राकाँची प्रचारात गती
By लोकमत न्यूज नेटवर्क | Published: April 8, 2019 11:25 PM2019-04-08T23:25:14+5:302019-04-08T23:26:05+5:30
युवा स्वाभिमानच्या नवनीत राणा यांना महाआघाडीचे समर्थन जाहीर झाल्यानंतर राष्ट्रवादी काँग्रेस व काँग्रेसने मेळावा घेत भूमिका जाहीर करून प्रचाराचा धडाका सुरू केला. शरद पवार यांच्या सोमवारी झालेल्या जाहीर सभेनंतर महाआघाडीत नवी ऊर्जा संचारली आहे.
लोकमत न्यूज नेटवर्क
अमरावती : युवा स्वाभिमानच्या नवनीत राणा यांना महाआघाडीचे समर्थन जाहीर झाल्यानंतर राष्ट्रवादी काँग्रेस व काँग्रेसने मेळावा घेत भूमिका जाहीर करून प्रचाराचा धडाका सुरू केला. शरद पवार यांच्या सोमवारी झालेल्या जाहीर सभेनंतर महाआघाडीत नवी ऊर्जा संचारली आहे.
महाआघाडी ५६ पक्षांची असली तरी काँग्रेस, राष्ट्रवादी काँग्रेस, रिपाइं (गवई गट) आदी पक्ष हे जिल्ह्यात मोठे घटकपक्ष आहेत. काँग्रेसद्वारे जिल्ह्यात प्रचाराची धुरा आमदार यशोमती ठाकूर, माजी आमदार रावसाहेब शेखावत, जिल्हाध्यक्ष बबलू देशमुख, शहराध्यक्ष किशोर बोरकर यांच्यासह माजी आमदार व ज्येष्ठ पदाधिकारी व तालुकाध्यक्षांकडे आहे. राष्ट्रवादी काँग्रेसचे जिल्हाध्यक्ष सुनील वºहाडे, शहराध्यक्ष राजेंद्र महल्ले, ज्येष्ठ नेते शरद तसरे यांच्यासह पदाधिकारी व संबंधित तालुकाध्यक्षांकडे आहे. सहा विधानसभा मतदारसंघात महाआघाडीसह काँग्रेस व राष्ट्रवादी काँग्रेसच्या स्वतंत्र कार्यालयांतून प्रचार यंत्रणेची सूत्रे हालविली जात आहेत.
नवनीत राणा यांना उमेदवारी जाहीर झाल्यानंतर दुसऱ्याच दिवशी जिल्हा ग्रामीण काँग्रेसने मेळावा घेत आ. रवि राणा यांच्यासमक्ष भूमिका स्पष्ट केली. सध्या महाआघाडीत कुठेही मतभेद व मनभेद नसल्याची ग्वाही देत सर्वच नेते प्रचाराला लागले आहे. शहरातील काँग्रेस, राष्ट्रवादी काँग्रेसच्या कार्यालयात आता बैठकांचा धूमधडाका सुरू झालेला आहे. मुख्य प्रचार कार्यालयातदेखील सर्वच पक्षांच्या नेत्यांची वर्दळ आहे. बडनेरा मतदारसंघात स्वत: आ. रवि राणा यांची स्वतंत्र प्रचार यंत्रणा पूर्ण ताकदीने कामाला लागली आहे. आ. राणा यांच्यापासून कुठलीच अपेक्षा न करता स्वबळावर काँग्रेस व राष्ट्रवादी काँग्रसद्वारा प्रचार सुरू असल्याचे शहर व जिल्हा काँग्रेसच्या पदाधिकाऱ्यांनी सांगितले.
प्रत्येक घरापर्यंत कार्यकर्ता
जिल्ह्यात काँग्रेसचे १८०० बूथप्रमुख व प्रत्येकाजवळ १० कार्यकर्त्यांची टीम आहे. उमेदवाराची वाट न पाहता, सबंधित तालुकाध्यक्षांद्वारे निरपेक्ष भावनेने प्रचाराचा धडाका सुरू केला आहे. प्रत्येक गावातील प्रत्येक घरापर्यंत कार्यकर्ता पोहोचावा, याची काळजी घेत आहोत.
- बबलू देशमुख, जिल्हाध्यक्ष, काँग्रेस
गावागावांत बैठकी, व्यक्तीश: नोंद
जिल्ह्यात २३०० बूथप्रमुख व प्रत्येक बूथवर १० कार्यकर्त्यांची फळी आहे. अॅपद्वारे या सर्वांची व्यक्तीश: नोंद घेण्यात आली आहे. प्रत्येक तालुक्यात बैठकी आटोपल्या. आता गावागावांत बैठकीद्वारे प्रचारयंत्रणा सुरू आहे.
- सुनील वऱ्हाडे, जिल्हाध्यक्ष, राष्ट्रवादी काँग्रेस
प्रत्येक तालुका कार्यालयाद्वारे प्रचाराचे मॉनिटरिंग
1अमरावती शहर कार्यालयात रावसाहेब शेखावत, किशोर बोरकर, बबलू शेखावत यांच्या उपस्थितीत बैठकी. राष्ट्रवादीचे शहराध्यक्ष राजेंद्र महल्लेंकडून प्रचारकार्याचा आढावा.
2तिवसा येथे आमदार यशोमती ठाकूर, मुकंदराव देशमुख यांच्याद्वारे गावनिहाय प्रचार व बैठकीचे नियोजन. राकाँच्या बूथवर सुभाष तंवर, शंतनु देशमुख, भूषण यावले आदींद्वारे आढावा.
3मेळघाट मतदारसंघात केवलराम काळे, दयाराम काळे यांच्याद्वारे कार्यकर्त्यांना सूचना. राकाँ कार्यालयात श्रीराम पटेल, हुकूमचंद मालवीय यांच्याद्वारे प्रचार साहित्याचे नियोजन.
4दर्यापूर कार्यालयात सुधाकर भारसाकळे, बाळासाहेब हिंगणीकर, आदीद्वारे कार्यकर्त्यांशी संपर्क. राकाँ कार्यालयात अरूण गावंडे, अनिल जळमकर आदींचा बूथप्रमुखांशी संवाद.
5अचलपूर कार्यालयात बबलू देशमुख स्वत: नियंत्रण ठेवून आहेत. राकाँ कार्यालयात सुरेखा ठाकरे, वसुधा देशमुख, संगीता ठाकरे प्रत्येक बूथप्रमुखाशी संवाद साधत आहेत.
6बडनेरा मतदारसंघात आमदार रवि राणा प्रचाराची धुरा सांभाळत आहेत. याव्यतिरिक्त रावसाहेब शेखावत, सुनील वºहाडे, राजेंद्र महल्ले वनवे आदींचे सहकार्य मिळत आहे.
राजकमल चौकातील चौबळ वाड्यात महाआघाडी समर्थित उमेदवार नवनीत राणा यांच्या प्रचारार्थ शहर काँग्रेस कमिटी व कार्यकर्त्यांच्या बैठकीत माजी आमदार रावसाहेब शेखावत, शहराध्यक्ष किशोर बोरकर. अशी तालीम रोज सुरू आहे.