Lok Sabha Election 2019; इंया वोटो होय अनमोल, डामान बन डाऊ डीजा मोल...
By लोकमत न्यूज नेटवर्क | Published: April 13, 2019 10:37 AM2019-04-13T10:37:31+5:302019-04-13T10:39:10+5:30
‘हां आ, इंज वोटिंग डायबाका, या वोटो होय अनमोल, डामान बन डाऊ डीजा मोल, टुनिकाबी लालीचोन बकी हेजे बनहिगरा टे वोटिंग डाये’!
नरेंद्र जावरे ।
लोकमत न्यूज नेटवर्क
अमरावती : ‘हां आ, इंज वोटिंग डायबाका, या वोटो होय अनमोल, डामान बन डाऊ डीजा मोल, टुनिकाबी लालीचोन बकी हेजे बनहिगरा टे वोटिंग डाये’!
‘कुठल्याच प्रकारच्या प्रलोभनाला बळी न पडता निर्भयतेने मतदान करा. आपले मत अमूल्य आहे. पैशात त्याची तुलना करू नका. तुम्ही मतदान करा आणि इतरांनाही मतदान करायला लावा. आपले मत आपली ताकद आहे. मतदार लहान असो वा मोठा, सर्वांनी मतदान करा’ असा त्याचा अर्थ. कोरकू भाषेत मतदान जनजागृती करणारे फलक मेळघाटच्या गावखेड्यांसह पंचायत समिती आणि इतर कार्यालयांपुढे लावण्यात आले आहेत.
मेळघाटच्या पाड्यांमध्ये कोरकू भाषेतून पथनाट्य सादर करून, फलक, शाळांमधून विद्यार्थ्यांच्या हस्ते पालकांसाठी पत्र पाठवून मतदान करण्याचे आवाहन होत आहे. प्रत्येकाने मतदान करावे, त्याद्वारे मतदानाचा टक्का वाढावा, यासाठी निवडणूक आयोगाच्या दिशानिर्देशानुसार मेळघाटात कोरकू भाषेतील हे अभिनव फलक लक्षवेधक ठरले आहेत. मेळघाट विधानसभा मतदारसंघात २ लाख ७२ हजार १२३ मतदार आहेत. शिक्षणाचे प्रमाण कमी आहे. या कल्पकतेचा मतदारांवर किती प्रभाव पडतो, हे निवडणुकीला स्पष्ट होईल.
कोरकूत पत्र
जिल्हाधिकारी कार्यालयांतर्गत जिल्हाभर सुरू असलेला मतदार जनजागृती कार्यक्रम मंदिर, मशिदीत करण्यात येत असतानाच अमरावती शहरातील शाळांच्या विद्यार्थ्यांना त्यांच्या पालकांसाठी कोरकू भाषेतूनच मतदान करण्याचे पत्र पाठविण्यात आले आहे.
जिल्हाभर मतदानाचा टक्का वाढावा, यासाठी विविध उपक्रम राबविले जात आहेत. मेळघाटात कोरकू भाषेत आदिवासींमध्ये जनजागृती करण्यात येत आहे.
- मनीषा खत्री, सीईओ तथा नोडल आॅफिसर, स्वीप