Lok Sabha Election 2019; पाकिस्तानला धडा शिकविण्यासाठी मोदी हवे
By लोकमत न्यूज नेटवर्क | Published: April 16, 2019 11:10 PM2019-04-16T23:10:55+5:302019-04-16T23:11:26+5:30
अतिरेक्य्यांचे अड्डे बनवून जगभरात दहशतवाद पसरविणाऱ्या पाकिस्ताला धडा शिकविण्यासाठी नरेंद्र मोदी हेच पुन्हा देशाचे पंतप्रधान हवे, असे आवाहन शिवसेना पक्षप्रमुख उद्धव ठाकरे यांनी येथे मंगळवारी केले.
लोकमत न्यूज नेटवर्क
अमरावती : अतिरेक्य्यांचे अड्डे बनवून जगभरात दहशतवाद पसरविणाऱ्या पाकिस्ताला धडा शिकविण्यासाठी नरेंद्र मोदी हेच पुन्हा देशाचे पंतप्रधान हवे, असे आवाहन शिवसेना पक्षप्रमुख उद्धव ठाकरे यांनी येथे मंगळवारी केले.
येथील नेहरू मैदानावर आयोजित भाजपा-शिवसेना-रिपाइं (आठवले) महायुतीचे उमेदवार आनंदराव अडसूळ यांच्या प्रचारार्थ जाहीर सभेला उद्धव ठाकरे यांनी संबोधित केले. यावेळी व्यासपीठावर पालकमंत्री प्रवीण पोटे, आमदार सुनील देशमुख, विदर्भ समन्वयक अरविंद नेरकर, डॉ. दीपक सावंत, आ. अरुण अडसड, श्रीकांत देशपांडे, अनिल बोंडे, माजी खासदार अनंत गुढे, दिनेश बूब, शिवसेना जिल्हाप्रमुख सुनील खराटे, प्रशांत वानखडे, श्याम देशमुख, कृपाल तुमाने, विजयराज शिंदे, प्रीती बंड, सुधीर सूर्यवंशी, भाजप जिल्हाध्यक्ष दिनेश सूर्यवंशी, शहराध्यक्ष जयंत डेहनकर उपस्थित होते.
पुढे बोलताना उद्धव ठाकरे म्हणाले, राज्यात युती का झाली? यातून काँग्रेस-राष्ट्रवादी अद्यापही सावरली नाही. युती ही हिंदुत्वाच्या विचाराची; देशाची अखंडता, अयोध्येत राममंदिर उभारणीच्या मुद्द्यावर झाली आहे. काही मुद्द्यांवर भाजपसोबत वाद होता. पण, ते निकाली निघाले आहेत. त्यामुळे आता भाजप-शिवसेना महायुती ही निवडणुकीत एकदिलाने काम करीत आहे. महायुतीचाच विजय होणार, असा विश्वास त्यांनी दर्शविला. चार वर्षात आघाडीचे नेते कुठेच नव्हते. आता दुष्काळ नसताना त्यांना तो दिसू लागला आहे. दुष्काळात मी स्वत: मराठवाड्यात शिवसेनेच्या ६३ आमदारांना सोबत घेऊन दौरा केला. शेतकऱ्यांचे दु:ख जाणून घेतले आणि भरीव मदतदेखील केली. महायुती ही सत्तेसाठी नव्हे, तर हिंदुत्वाचे रक्षण व देशाचा विकासासाठी असल्याचे उद्धव ठाकरे यांनी सांगितले.