Lok Sabha Election 2019; लोकशाहीच्या महोत्सवाची तयारी पूर्ण
By लोकमत न्यूज नेटवर्क | Published: April 16, 2019 11:13 PM2019-04-16T23:13:01+5:302019-04-16T23:14:36+5:30
लोकशाहीच्या महोत्सवाची तयारी पूर्ण झालेली आहे. यंदा दोन हजार मतदान केंद्रांवर १८ लाख ३० हजार ५६१ मतदार मतदान करणार आहेत. मेळघाटातील दुर्गम १३४ मतदान केंद्रांवर पोलिंग पार्ट्या मंगळवारी रवाना झाल्या, तर बुधवारी उर्वरित केंद्रांवर त्या रवाना होणार असल्याची माहिती जिल्हाधिकारी तथा जिल्हा निवडणूक निर्णय अधिकारी शैलेश नवाल यांनी मंगळवारी पत्रपरिषदेत दिली.
लोकमत न्यूज नेटवर्क
अमरावती : लोकशाहीच्या महोत्सवाची तयारी पूर्ण झालेली आहे. यंदा दोन हजार मतदान केंद्रांवर १८ लाख ३० हजार ५६१ मतदार मतदान करणार आहेत. मेळघाटातील दुर्गम १३४ मतदान केंद्रांवर पोलिंग पार्ट्या मंगळवारी रवाना झाल्या, तर बुधवारी उर्वरित केंद्रांवर त्या रवाना होणार असल्याची माहिती जिल्हाधिकारी तथा जिल्हा निवडणूक निर्णय अधिकारी शैलेश नवाल यांनी मंगळवारी पत्रपरिषदेत दिली.
अमरावती, बडनेरा, तिवसा, दर्यापूर, अचलपूर व मेळघाट या विधानसभा मतदारसंघांचा समावेश असलेल्या अमरावती लोकसभा मतदारसंघात ९,३३,४४४ पुरुष, ८,८७,०८० महिला स्त्री व ३७ तृतीयपंथीय मतदार आहेत. ५१८९ दिव्यांग, २५३० सैन्य दलातील मतदार आहेत. ते २४ उमेदवारांचे भाग्य ठरवतील. दोन हजार मतदान केंद्रांसाठी ८९१६ अधिकारी व कर्मचारी नियुक्त करण्यात आले आहेत. ८९१ मनुष्यबळ राखीव आहेत. १८ सखी मतदार केंद्रे आहेत. या ठिकाणी निवडणूक अधिकारी व पोलीसदेखील महिलाच राहतील. ३७ संवेदनशील केंद्रांवर ३७ मायक्रो आॅब्झर्व्हर नेमले आहेत, तर एकूण ६१ मायक्रो आॅब्झर्व्हर नियुक्त आहेत. जाहीर प्रचाराची मुदत मंगळवारी सायंकाळी सहा वाजता संपल्यानंतर एसएसटी, फ्लार्इंग स्कॉड आदीद्वारे आचारसंहितेचे उल्लंघन होणार नाही याबाबत पाहणी करीत आहेत. या कालावधीत १८ लाख रोख रक्कम जप्त करण्यात आली तर आचारसंहिता उल्लंघनाबाबत आठ एफआयआर दाखल करण्यात आले आहे. कुठेही संशय वाटल्यास व्हीडीओ कॅमेरा पथकाची नजर राहणार आहे. मतदानासाठी यंत्रणा सज्ज आहे. लोकशाही बळकट करण्यासाठी नागरिकांनी मतदानाच्या महोत्सवात सहभाग घ्यावा, असे आवाहन शैलेश नवाल यांनी केले आहे.
ईव्हीएम वाहून नेणाऱ्या वाहनांवर ‘जीपीएस’
निवडणूक प्रक्रियेत ईव्हीएम व व्हीव्हीपॅट वाहतूक करणाऱ्या वाहनांवर ‘जीपीएस’ यंत्रणा बसविली आहे. जिल्हाधिकारी कार्यालयातील नियंत्रण कक्षातून यावर मॉनिटरिंग होणार आहे. या निवडणुकीसाठी चार हजार बीयू, दोन हजार सीयू व दोन हजार व्हीव्हीपॅट लागणार आहेत. याव्यतिरिक्त ८३० बीयू, ४१५ सीयू व ४१५ व्हीव्हीपॅट राखीव आहे. कुठल्याही केंद्रावर यंत्र बंद झाले असल्यास, ते अवघ्या ३० मिनिटांत बदलणार असल्याचे शैलेश नवाल म्हणाले.