Lok Sabha Election 2019; मतविभाजनावर शिवसेनेचा डोळा
By लोकमत न्यूज नेटवर्क | Published: April 2, 2019 10:51 PM2019-04-02T22:51:26+5:302019-04-02T22:52:15+5:30
महाआघाडीने नवनीत राणा या अपक्ष उमेदवाराला समर्थन दिल्यानंतर अमरावती लोकसभा मतदारसंघात एकच गहजब झाला होता. हा उद्रेक निस्तरण्यात वरिष्ठांना यश आले. मात्र, मतभेद मिटलेत तर मनभेद मात्र उघड दिसू लागले आहेत. आता ‘मोदी लाट’ ओसरली असल्याने युतीच्या शिलेदारांना वास्तवाचे भान आले.
लोकमत न्यूज नेटवर्क
अमरावती : महाआघाडीने नवनीत राणा या अपक्ष उमेदवाराला समर्थन दिल्यानंतर अमरावती लोकसभा मतदारसंघात एकच गहजब झाला होता. हा उद्रेक निस्तरण्यात वरिष्ठांना यश आले. मात्र, मतभेद मिटलेत तर मनभेद मात्र उघड दिसू लागले आहेत. आता ‘मोदी लाट’ ओसरली असल्याने युतीच्या शिलेदारांना वास्तवाचे भान आले. सहा महिन्यांवर विधानसभा येऊन ठेपली आहे. त्यानिमित्त रंगीत तालमीसाठी सहाही विधानसभा मतदारसंघात अहमहिका लागली आहे.
अमरावती लोकसभा मतदारसंघात शिवसेना-भाजप युतीचे आनंदराव अडसूळ अन् महाआघाडी समर्थित युवा स्वाभिमानच्या नवनीत राणा यांच्यात २०१४ प्रमाणेच यावेळीही थेट लढत आहे. विशेष म्हणजे मतांचे ध्रुवीकरण करण्यास राणांना येत असलेले अपयश हे युती उमेदवारांच्या पथ्यावर पडणारे आहे.
विधानसभानिहाय आढावा घेता, सन २००९ मध्ये अमरावती लोकसभा मतदारसंघात समाविष्ट सहा विधानसभा मतदारसंघांमध्ये युती असताना भाजपला भोपळाही फोडता आला नव्हता. अमरावती, तिवसा व मेळघाट विधानसभा मतदारसंघात काँग्रेस, बडनेरात युवा स्वाभिमान, दर्यापुरात शिवसेना, तर अचलपुरात प्रहारने बाजी मारली. २०१४ मधील मोदी लाट, जिल्ह्यात झालेली नरेंद्र मोदी यांची सभा, यामुळे युती नसतानाही अमरावती, मेळघाट व दर्यापूर मतदारसंघ भाजपने जिंकले, तर बडनेरा व अचलपूर अनुक्रमे रवि राणा व बच्चू कडू यांनी राखले होते. या निवडणुकीत सरासरी ३६ टक्के मतदान भाजपला झाले. आता ‘मोदी लाट’ ओसरली आहे. मात्र, विरोधकांच्या मतविभाजनाचा फायदा अडसुळांच्या पथ्यावर आहे. २५० किमीच्या लोकसभा मतदारसंघात नव्याने मिळालेले अपक्षाचे चिन्ह पोहचविण्याची कसरत करावी लागणार असली तरी त्यासाठी त्यांनी चिन्ह प्रचाराची खास मोहिमच उघडली आहे.
चित्र बदलेल का?
सन २००९ लोकसभा निवडणुकींमध्ये महाआघाडीत राष्ट्रवादी काँग्रेसच्या वाट्याला मतदारसंघ आल्याने मित्र पक्ष असलेल्या आरपीआय (गवई) गटाला उमेदवारी देण्यात आली. या पक्षाचे उमेदवार डॉ. राजेंद्र गवई यांनी अडीच लाखांवर मते घेतली. यामध्ये युतीचे आनंदराव अडसूळ विजयी झाले.
सन २०१४ च्या लोकसभा निवडणुकीत महाआघाडीत राष्ट्रवादी काँग्रेसने नवनीत राणा या दाक्षिणात्य अभिनेत्री व युवा स्वाभिमानचे आमदार रवि राणा यांच्या सुविद्य पत्नीला उमेदवारी दिली होती. त्यांनी ३ लाख २९ हजार मते घेतली. मात्र, रिपाइंचे राजेंद्र गवई यांनी उमेदवारी कायम ठेवून ५४,२७८ मते घेतली व बसपाचे उमेदवार गुणवंत देवपारे यांनाही ९९,२०० मते मिळालीत. या निवडणुकीत युतीचे आनंदराव अडसूळ विजयी झाले.
यंदाच्या निवडणुकीत युतीचे आनंदराव अडसूळ हे कायम आहेत, तर मागील निवडणुकीतील राष्ट्रवादीच्या उमेदवार नवनीत राणा यांना महाआघाडीचे समर्थन आहे. त्यांना अपक्षाचे चिन्ह मिळाले आहे. गुणवंत देवपारे हे या निवडणुकीत वंचित बहुजन आघाडीचे उमेदवार आहेत. अडसूळ वगळता परंपरागत विरोधकांचे पक्ष बदललेले आहेत.