Lok Sabha Election 2019; आज थंडावणार प्रचारतोफा
By लोकमत न्यूज नेटवर्क | Published: April 15, 2019 11:10 PM2019-04-15T23:10:14+5:302019-04-15T23:10:57+5:30
निवडणुकीच्या दुसऱ्या टप्प्यात असलेल्या अमरावती लोकसभा मतदारसंघात मंगळवारी सायंकाळी ६ वाजता म्हणजेच मतदान ंसंपण्याचे ४८ तास अगोदर प्रचाराचा धुराडा खाली बसणार आहे. त्यानंतर मात्र, कुणालाच प्रचार जाहीर प्रचार करता येणार नाही. त्यामुळे उमेदवारांसह राजकीय नेत्यांचा गृहभेटीवर भर राहणार आहे.
लोकमत न्यूज नेटवर्क
अमरावती : निवडणुकीच्या दुसऱ्या टप्प्यात असलेल्या अमरावती लोकसभा मतदारसंघात मंगळवारी सायंकाळी ६ वाजता म्हणजेच मतदान ंसंपण्याचे ४८ तास अगोदर प्रचाराचा धुराडा खाली बसणार आहे. त्यानंतर मात्र, कुणालाच प्रचार जाहीर प्रचार करता येणार नाही. त्यामुळे उमेदवारांसह राजकीय नेत्यांचा गृहभेटीवर भर राहणार आहे.
अमरावती लोकसभा मतदारसंघात गुरुवारी मतदान होणार आहे. मंगळवारी जाहीर प्रचाराचा शेवटचा दिवस असल्याने प्रामुख्याने मोठ्या शहरांमध्ये प्रचार रॅली काढून शक्तिप्रदर्शनावर उमेदवारांचा भर राहणार आहे. त्यानंतर मात्र जाहीर प्रचारावर बंदी आहे. त्यानंतरच्या दोन दिवसांच्या कालावधीत भरारी पथके, स्थिर निगराणी पथके, पोलीस विभाग तसेच क्षेत्रीय अधिकारी यांचा मतदारांना पैशांचे वाटप, दारू यावर ‘वॉच’ राहणार आहे. मतदारांना प्रलोभन वा कोणतीही कृती करता येणार नाही, असे निवडणूक विभागाने स्पष्ट केले आहे. प्रचार बंद झाल्यावर शासकीय यंत्रणा वगळता अन्य कुठेही ध्वनिक्षेपक राहणार नाही, याची काळजी घेण्याच्या सूचना आहेत. मतदान १८ एप्रिलला असल्याने १७ तारखेला सबंधित सहायक निवडणूक अधिकारी कार्यालयातून मतदार पार्ट्या रवाना होतील. निवडणूक संदर्भातील तयारी पूर्ण झालेली असल्याचे या विभागाने सांगितले.
लोकसभा निवडणुकीसाठी दोन हजार मतदान केंद्रे आहेत. या केंद्रांवर प्रत्येकी चार व काही प्रमाणात राखीव असे ८ हजार ८१२ अधिकारी व कर्मचारी राहणार आहेत. या सर्व कर्मचाऱ्यांना आतापर्यंत तीन वेळा प्रशिक्षण देण्यात आलेले आहे. बुधवारी या पार्ट्यांना मतदान साहित्य दिले जाणार आहे. जिल्ह्यात स्वीप मोहिमेत सर्वदूर जनजागृतीसह आचारसंहितेची प्रभावी अंमलबजावणी होत आहे. स्वीप मोहिमेत विविध विभागांनी गावोगाव शेकडो कार्यक्रम, ईव्हीएम- व्हीव्हीपॅट प्रात्यक्षिके घेतली आहेत. मतदाराचे हक्क, कर्तव्य व जाणीवजागृतीचे कार्य या मोहिमेतून होत आहे. या मोहिमेत आशा स्वयंसेविका, अंगणवाडी सेविका, शिक्षक, ग्रामसेवक, ग्रामरोजगार सेवक यांच्यासह सर्व यंत्रणांचे अधिकारी-कर्मचारी सहभागी झाले आहेत. नागरिकांनीही मतदानाचे राष्ट्रीय कर्तव्य पूर्ण करण्याचे आवाहन प्रशासनाने केले आहे.
२०० मतदान केंद्रांवर वेब कास्टिंग
यंदा प्रथमच वेब कास्टिंगद्वारे २०० केंद्रांवरील मतदानाच्या प्रक्रियेचे थेट प्रक्षेपण होणार आहे. हे प्रक्षेपण एआरओ, डीडीआरओ, आरओ, सीईओ (मुंबई) व निवडणूक आयोग (दिल्ली) येथे पाहात येणार आहे. मतदान कोणाला केले, ही शंका दूर करण्यासाठी यंदा प्रथमच व्हीव्हीपॅटचा वापर केला जाणार आहे. मतदान केंद्रावर ईव्हीएमचे डमी मॉडेल उपलब्ध केले जाणार आहे. संवेदनशील मतदान केंद्रांवर सूक्ष्म निरीक्षक व पोलिसांचे पथक राहणार आहे.
बाहेरच्या व्यक्तींना मतदारसंघामध्ये राहण्यास प्रतिबंध
प्रचाराची मुदत मंगळवारी सायंकाळी सहा वाजता संपत आहे. या मुदतीनंतर ज्या व्यक्तींची नावे मतदार यादीत नाहीत अशांनी व अन्य जिल्ह्यातील राजकीय व्यक्तींनी मतदानाची प्रक्रिया होइस्तोवर जिल्ह्यात थांबू नये, अशा आयोगाच्या सूचना आहेत. १६ ते १८ एप्रिलच्या मध्यरात्रीपर्यंत कलम १४४ जारी करण्यात आले आहे.
२० हजारांवर रकमेसाठी पुरावे
मतदान प्रक्रियेत कोणालाही २० हजारांवर रोख रक्कम बागळता येणार नाही. जादा रकमेसंदर्भातील पुरावे जवळ नसल्यास ती जप्त होण्याची शक्यता आहे. मतदाराला लाच देणे, धमकावणे, भीती दाखविणे, अवैधरीत्या शस्त्रास्त्रे बाळगणे व सामाजिक शांततेचा भंग करणे हे प्रकार भादंवि नुसार गुन्हा असून, मतदार शिक्षेस पात्रदेखील राहू शकतो.