'नौटंकी करण्यात बच्चू कडू सुप्रसिद्ध, भांडवलातून सस्ती प्रसिद्धी मिळवणं त्यांचा धंदा'; रवी राणांचा पलटवार
By ऑनलाइन लोकमत | Published: April 24, 2024 12:15 PM2024-04-24T12:15:05+5:302024-04-24T12:19:55+5:30
Bacchu Kadu : आधी परवानगी मिळाल्यानंतरही आता मात्र भाजप नेते आणि केंद्रीय गृहमंत्री अमित शाह यांच्या सभेचं कारण सांगत पोलीस आम्हाला मैदानात सभा घेऊन देत नसल्याचा आरोप करत बच्चू कडू यांनी पोलीस प्रशासनाविरोधात आक्रमक भूमिका घेतली.
Bacchu Kadu ( Marathi News ) : अमरावती लोकसभा मतदारसंघात महायुतीचा घटकपक्ष असलेल्या प्रहार जनशक्ती पक्षाचे नेते आमदार बच्चू कडू यांनी महायुतीच्या उमेदवार नवनीत राणा यांच्याविरोधात आक्रमक भूमिका घेत आपल्या पक्षाचाही उमेदवार मैदानात उतरवला आहे. गेल्या काही दिवसांत बच्चू कडू आणि नवनीत राणा यांच्यात शाब्दिक वाद सुरू असतानाच काल मात्र सायन्स कोअर मैदानातील सभेवरून चांगलाच राडा झाला. आधी परवानगी मिळाल्यानंतरही आता मात्र भाजप नेते आणि केंद्रीय गृहमंत्री अमित शाह यांच्या सभेचं कारण सांगत पोलीस आम्हाला मैदानात सभा घेऊन देत नसल्याचा आरोप करत बच्चू कडू यांनी पोलीस प्रशासनाविरोधात आक्रमक भूमिका घेतली. यावरुन आता आमदार रवी राणा यांनी आमदार बच्चू कडू यांच्यावर टीका केली आहे.
"राहुल गांधी आज दौऱ्यावर आहेत, त्यांची जिथे सभा होणार आहे ते मैदानही आम्ही बुक केले होते, पण हायप्रोफाइल कोण नेता आला की त्यांच्या सिक्युरीटी प्रमाणा मैदान द्यावे लागले, आम्ही ते मैदान त्यांना दिले. संविधानाचा आदर केला पाहिजे. दोन दिवसापूर्वी शरद पवार आणि उद्धव ठाकरे यांची तिथे सभा होणार होती तोही सभागृह आम्ही बुक केला होता, आम्हाला त्यांनी सांगितले की शरद पवार आणि ठाकरे यांच्या सिक्युरिटी दृष्टीने आम्हाला सभागृह पाहिजे आम्ही त्यांनाही दिले, त्यावेळी आम्ही त्याच बबल केला नाही, आम्ही त्याचा भांडवल केले नाही, भांडवल करणे आणि भांडवलातून सस्ती पब्लिसीटी करणे हा आता बच्चू कडू यांचा धंदा झाला आहे, अशी टीका आमदार रवी राणा यांनी केली.
"त्यांनी जनतेसाठी काय केलं, कोणता उद्योग आणला, शेतकऱ्यांसाठी काय केलं. बच्चू कडू यांनी मला दिवाळी काळात तुरुंगात टाकलं. गरिबांचे संकट काय असते हे मला माहित आहे. अमरावतीची जनता त्यांना जाणते. सस्ती पब्लिसीटीसाठी देशाच्या गृहमंत्र्यांचा विरोध करणे, सभेचा विरोध करणे याचे भांडवल करणे यातून काहीही मिळणार नाही, असंही राणा म्हणाले.
"अमरावती जिल्ह्यात दोन मंत्री होते, त्यावेळी जिल्ह्यात मोठे दंगे झाले. हिंदूंच्या घरावर दगडफेक झाले. उमेश कोल्हे हत्याकांड झाला. तेव्हा या मंत्र्यांनी तोंडाला लॉक लावला होता, यावर काहीही ते बोलले नाहीत. नवनीत राणा यांनी अमित शाह यांची भेट घेऊन हत्येचा तपास करण्याची विनंती केली, तेव्हापासून एनआयएने तपास सुरू केला. तेव्हा यशोमती ठाकूर आणि बच्चू कडू यांनी पोलिसांना फाईल बंद करायला सांगितलं होतं, असा आरोपही रवी राणा यांनी केला.