‘लोकमत’शैक्षणिक प्रदर्शनी विद्यार्थ्यांसाठी लाभदायक
By लोकमत न्यूज नेटवर्क | Published: June 17, 2017 12:07 AM2017-06-17T00:07:11+5:302017-06-17T00:07:11+5:30
बारावी आणि दहावीचा निकाल जाहीर झाल्यानंतर पाल्यांना आपल्या मुलांना कोणत्या क्षेत्रात प्रवेश देऊन करिअर घडवायचे, ही चिंता सतावत आहे.
श्रीकांत देशपांडे : ‘लोकमत अॅस्पायर एज्युकेशन फेअर’चा थाटात शुभारंभ
लोकमत न्यूज नेटवर्क
अमरावती : बारावी आणि दहावीचा निकाल जाहीर झाल्यानंतर पाल्यांना आपल्या मुलांना कोणत्या क्षेत्रात प्रवेश देऊन करिअर घडवायचे, ही चिंता सतावत आहे. मात्र, ‘लोकमत’च्या पुढाकाराने आयोजित शैक्षणिक प्रदर्शनात मुलांचे नक्कीच भवितव्य घडेल, असे प्रतिपादन अमरावती विभागाचे शिक्षक आ. श्रीकांत देशपांडे यांनी येथे शुक्रवारी व्यक्त केले.
येथील संत ज्ञानेश्वर सांस्कृतिक भवनात ‘लोकमत’ व द युनिक अकादमीच्या संयुक्त विद्यमाने आयोजित ‘लोकमत अॅस्पायर एज्युकेशन फेअर’च्या शुभारंभाप्रसंगी ते उद्घाटक म्हणून बोलत होते. यावेळी प्रमुख पाहुणे म्हणून द युनिक अकादमी पुणे यथील सुरेश साळवे, एमआयटी वर्ल्ड पिस युनिव्हर्सिटी पुणे येथील भूषण मेहरे, मराठवाडा मित्र मंडळ ग्रुप, पुणे येथील अपर्णा ठाकूर व लोकमतचे उपमहाव्यवस्थापक सुशांत दांडगे उपस्थित होते. प्रदर्शनीचे उद्घाटन श्रद्धेय बाबुजी जवाहरलाल दर्डा यांच्या प्रतिमेला दीप प्रज्ज्वलन व पूजनाने करण्यात आले.
आ. श्रीकांत देशपांडे म्हणाले, "लोकमत"चा उपक्रम अतिशय स्तुत्य आणि चांगला आहे. एकाच ठिकाणी राज्यातील नामांकित शैक्षणिक संस्थांचे मार्गदर्शन मिळणार आहे. पाल्यांना मुलांचे भवितव्य घडवायचे असेल तर नक्कीच शैक्षणिक प्रदर्शनीला भेट द्यावी, असे आवाहन त्यांनी मार्गदर्शनादरम्यान केले.
त्यांनी"लोकमत"च्या या उपक्रमाची भरभरून प्रशंसा केली. दहावी, बारावीचा निकाल जाहीर होताच दरवर्षी माता-पित्यांची प्रवेशासाठी टिकटिक सुरू होते. करिअर कोणत्या क्षेत्रात घडवायचे ही चिंता सतावत असताना "लोकमत"ने शैक्षणिक प्रदर्शनीच्या माध्यमातून दालन उपलब्ध करून दिल्याचे त्यांनी सांगितले. "लोकमत"ने विद्यार्थ्यांसाठी सोल्युशन काढले असून ही समाज घडविण्याची तळमळ आहे. आज स्पर्धेच्या युगात कोणत्या क्षेत्रात करिअर घडवायचे, हे कन्फ्युजन दूर करून "लोकमत"ने सोल्युशन काढले आहे. "लोकमत"ने जगण्यासाठीच्या वाटा दाखविल्या असून या उपक्रमाला सलाम करूया. शैक्षणिक प्रदर्शनीला पाल्यांनी पालकांसह अवश्य भेट द्यावी, असे आवाहनही श्रीकांत देशपांडे यांनी केले. संचालन ‘लोकमत’चे वितरण प्रबंधक रवि खांडे यांनी केले.