नामांकन, प्रचार रॅली अन् सभास्थळीही निळ्या-भगव्या पताकांचा वरचष्मा
By गणेश वासनिक | Published: April 5, 2024 07:28 PM2024-04-05T19:28:54+5:302024-04-05T19:29:32+5:30
महायुती, महाविकास आघाडीकडे समान चित्र; राजकीय पक्षांचे झेंडे झाकोळले
अमरावती : लोकशाहीचा महासंग्राम सुरू झाला आहे. राज्यात पाच टप्प्यात लोकसभेची निवडणूक होत असून, महायुती आणि महाविकास आघाडीच्या उमेदवारांमध्ये थेट लढत आहे. मात्र, दोन्ही बाजूचा समान दुवा ठरल्या आहेत निळ्या-भगव्या पताका. नामांकन रॅली, प्रचार सभा असो की नेत्यांचे रोड शो, एवेच नव्हे तर उमेदवारांच्या मतदारांशी भेटीगाठीदरम्यान सामाजिक समरसता दर्शविण्यासाठी या पताका आसमंतात उंचावल्या जातात. यामध्ये राजकीय पक्षांचे झेंडे झाकोळले गेल्याचे यंदाच्या निवडणुकीचे वैशिष्ट्य ठरले आहे.
राज्यात पहिल्या टप्प्यात १९ एप्रिल, दुसऱ्या टप्प्यात २६ एप्रिल, तिसऱ्या टप्प्यात ७ मे, चवथ्या टप्प्यात १३ मे, तर पाचव्या टप्पा २० मे रोजी मतदान प्रक्रिया राबविली जाणार आहे. तापमान ४२ ते ४४ आणि सूर्य दरदिवशी आग ओकत असला तरी विदर्भात लोकसभा निवडणुकीच्या मैदानात असलेल्या उमेदवारांना प्रचार करावाच लागत आहे. चांद्यापासून बांद्यापर्यंत महायुती, महाविकास आघाडीचे उमेदवार रिंगणात आहेत आणि त्यांच्यातच प्रामुख्याने लढत आहे. प्रचार सभा वा उमेदवारांच्या मुख्य प्रचार कार्यालयात दर्शनी भागात छत्रपती शिवाजी महाराज आणि भारतरत्न डॉ. बाबासाहेब आंबडेकर यांच्या प्रतिमा, होर्डिंग्ज, पुतळे प्रामुख्याने लावण्यात येत आहे. विशेषत: विदर्भात महायुती असो वा महाविकास आघाडीचा उमेदवार, त्यांच्या गळ्यात पक्षीय दुपट्ट्यांऐवजी भगवे, निळे दुपट्टे ठळकपणे निदर्शनास यावेत, याचे भान राखले जात आहे.
सभा, मेळाव्यातही भगवे, निळ्या झेंड्यांचा बोलबाला
महायुतीत भाजप, राष्ट्रवादी अजित पवार गट, शिंदे सेना, रिपाइं (आठवले गट), पीरिपा (कवाडे गट) यांच्यासह ११ पक्ष-गट सामील आहेत. महाविकास आघाडीत काँग्रेस, राष्ट्रवादी शरद पवार गट, उद्धव ठाकरे सेना, रिपाइं (आंबेडकर गट), उपेंद्र खोब्रागडे (खाेरिपा), भीमशक्ती संघटना सोबत आहेत. विशेषत: काँग्रेस, भाजप उमेदवारांच्या प्रचार सभा, मेळावे आणि रॅलींमध्ये पक्षाच्या झेंड्यांपेक्षा भगव्या, निळ्या झेंड्यांचाच बोलबाला दिसून येत आहे.
डोक्यावरील टोपी लक्षवेधी
लोकसभा निवडणूक प्रचारात भगव्या, निळ्या झेंड्यांची क्रेझ असताना अलीकडे उमेदवारांसह पदाधिकारी, कार्यकर्त्यांच्या डोक्यावरील टोपीसुद्धा मतदारांचे लक्ष वेधत आहे. त्यातही ही टोपी भगवी, निळी असून विदर्भात पहिल्या व दुसऱ्या टप्प्यातील लोकसभा निवडणूक प्रचारात उमेदवार सामाजिक समीकरण आपल्या बाजूने जुळवून आणण्यासाठी शक्कल लढवित आहेत.