लोकसभा निवडणुकीमुळे विद्यापीठाच्या ५५० उन्हाळी पेपरला फटका
By ऑनलाइन लोकमत | Published: March 22, 2019 05:18 PM2019-03-22T17:18:14+5:302019-03-22T17:18:37+5:30
वेळापत्रक लांबणार : आठ दिवसांच्या परीक्षेत बदल; मतमोजणीच्या दिवशीचे पेपर पुढे घेणार
अमरावती : संत गाडगेबाबा अमरावतीविद्यापीठाच्या १ एप्रिलपासून प्रारंभ होणाºया उन्हाळी परीक्षेत ५५० पेपरला लोकसभा निवडणुकीचा फटका बसला आहे. आठ दिवसांच्या परीक्षेत बदल करण्याची तयारी प्रशासनाने चालविली आहे.
केंद्रीय निवडणूक आयोगाने १० मार्च रोजी सार्वत्रिक लोकसभा निवडणूक कार्यक्रम जाहीर केला. दुसरीकडे विद्यापीठाची उन्हाळी परीक्षा १ एप्रिल ते २६ मे या कालावधीत निश्चित केली असून, चार लाख विद्यार्थी परीक्षा देणार आहेत. ११, १८ व २३ एप्रिल रोजी नियोजित पेपरच्या दिवशी मतदान, तर २३ मे रोजी मतमोजणी होत आहे. त्यामुळे ५५० पेपर पुढे ढकलले जातील, अशी माहिती परीक्षा वेळापत्रक नियोजक मिलिंद देशपांडे यांनी सांगितले.
संत गाडगेबाबा अमरावती विद्यापीठ कार्यक्षेत्रात यवतमाळ, वाशिम, बुलडाणा, अकोला व अमरावती हे पाच जिल्हे येतात. लोकसभेच्या धामणगाव रेल्वे, नांदगाव खंडेश्वर, चांदूर रेल्वेचा समावेश असलेला वर्धा, मोर्शीचा काही भाग येणारा रामटेक आणि यवतमाळ-वाशिम या मतदारसंघांची निवडणूक ११ एप्रिल रोजी होणार आहे, तर अमरावती लोकसभा मतदारसंघाची निवडणूक १८ एप्रिल रोजी होऊ घातली आहे. मलकापूर तालुका समाविष्ट असलेल्या रावेर लोकसभा मतदारसंघाची निवडणूक २३ एप्रिल रोजी होत आहे. २३ मे रोजी लोकसभा निवडणूक मतमोजणी आहे. या दिवसांचे पेपरदेखील पुढे घेण्यासंदर्भात प्रशासनाने तयारी केली आहे.
लोकसभा निवडणुकीच्या अनुषंगाने उन्हाळी परीक्षांच्या तारखेत बदल करण्याची तयारी चालविली आहे. १०, ११ व १२ आणि १८, २३, २३, २४ एप्रिल आणि २३ मे अशा आठ दिवसांचे पेपर पुढे घेतले जातील.
- हेमंत देशमुख,
संचालक, परीक्षा व मूल्यांकन मंडळ