काठेवाडींच्या गुरांवर वनविभागाची करडी नजर
By Admin | Published: June 27, 2017 12:13 AM2017-06-27T00:13:53+5:302017-06-27T00:13:53+5:30
वनपरीक्षेत्राच्या आजूबाजूला राहुट्या करून जंगलात चराई करणाऱ्या काठेवाडींना वनविभागाने वनपरीक्षेत्रापासून दूर जावे, अशा सूचना केल्या आहेत.
नोटिशी बजावल्या : कारवाई करण्याचे आदेश
लोकमत न्यूज नेटवर्क
पोहराबंदी : वनपरीक्षेत्राच्या आजूबाजूला राहुट्या करून जंगलात चराई करणाऱ्या काठेवाडींना वनविभागाने वनपरीक्षेत्रापासून दूर जावे, अशा सूचना केल्या आहेत. याशिवाय ज्या शेतकऱ्यांच्या पडीक जमिनीवर काठेवाडींनी राहुट्या तयार केल्या आहेत, अशा शेतकऱ्यांनादेखील वनविभागाने नोटिशी बजावल्या आहेत.
चिरोडी, पोहरा, वडाळी, कोंडेश्वर, कारला, एमआयडीसी भानखेडा, बडनेरा या भागात काठेवाडींनी आपले बस्तान बसविले आहे. विशेष म्हणजे या काठेवाडींना स्थानिक शेतकरी प्रोत्साहन देत आहेत.
वनपरीक्षेत्रात बंदी असताना संधी साधून काठीयावाडी आपली गुरे जंगलात सोडली जातात. मागील दोन वर्षांपासून वनविभाग काठेवाडींवर कारवाई करीत असल्याने ते धास्तावले आहेत. मागील वर्षी वनविभागाने काठेवाडींच्या २८९ मेंढ्या, ११३ बकऱ्या, १२ वासरे जप्त करून त्यांचा लीलाव करण्यात आला होता. यासोबतच त्यांच्यावर पोलीस कारवाई करण्यात आली होती. यावर्षी देखील उपवनसंरक्षक हेमंत कुमार मिना यांनी कारवाईचे संकेत दिले आहेत. पोहरा, चिरोडी व वडाळीचे वनपालांनी वनरक्षक व वनमजुरांना काठीयावाडींच्या गुरांवर लक्ष केंद्रित करून त्यांची गुरे वनपरीक्षेत्रात चरताना दिसल्यास जप्त करण्याचे आदेश दिले आहेत, अशी माहिती चांदूर रेल्वेचे वनपरीक्षेत्र अधिकाऱ्यांनी दिली.
औषधीयुक्त वनस्पती नष्ट
मार्डी, भिवापूर, कारला, चिखली, माळेगाव या भागात काठेवाडींची गुरे येत नसली तरी देखील या भागात मेंढ्या चराईसाठी पाठविल्या जात असल्याने या भागातील वनऔषधी नष्ट होत आहे. शिवाय अवैध चराईमुळे जंगलांचे सौंदर्य नष्ट होत आहे.