अंजनगाव सट्टा प्रकरणावर शासनाच्या हेरखात्याची नजर
By admin | Published: May 20, 2017 12:43 AM2017-05-20T00:43:57+5:302017-05-20T00:43:57+5:30
डोळे विस्फारणाऱ्या रकमांचा व्यवहार असलेल्या आणि प्रतिष्ठित धनिकांचा समावेश असलेल्या सावकरापुरा येथील
एसपींची भेट : पोलिसांची चुप्पी, जनतेत उत्सुकता
लोकमत न्यूज नेटवर्क
अंजनगाव सुर्जी : डोळे विस्फारणाऱ्या रकमांचा व्यवहार असलेल्या आणि प्रतिष्ठित धनिकांचा समावेश असलेल्या सावकरापुरा येथील आयपीएल क्रिकेट सट्ट्यावर शासनाच्या हेरखात्याची नजर असल्याची विश्वसनीय माहिती आहे.
जिल्ह्याच्या सीमेवरील या ताुलका मुख्यालयात अनेक प्रकारचे अवैध व्यवसाय सुरू असतात. सट्ट्याला या तालुक्यात नियमित ग्राहक असतात. सट्टाप्रेमींची ही आवड हेरून आयपीएल क्रिकेट सट्टाही अंजनगावात काही महिन्यांपासून सुरू करण्यात आला होता. जिल्हा मुख्यालयापासून काही अंतरावर असलेल्या तालुका मुख्यालयावर जिल्ह्यातील पोलीस आणि इतर खात्याच्या अधिकाऱ्यांची थेट नजर नसल्याचा गैरफायदा घेऊन आयपीएल क्रिकेट सट्टा भयमुक्त वातावरणात चलविला गेला. मतभेद आणि अंहकार याकारणांनी तो उघड झाला.
तालुकास्तरावरील सदर सट्ट्याची चर्चा मंत्रालयापर्यंत पोहोचली. ठाणेदार जसे याप्रकरणी मौन बाळगून आहेत, तसेच पोलीस खात्याचे बडे अधिकारीही चुप्पी साधून आहेत. याप्रकरणात एकूण काय घडामोडी घडतात, त्यावर गृहखात्याची नजर आहे. प्रशासन कार्यक्षम असावे, असा आग्रह धरणाऱ्या मुख्यमंत्र्यांकडे गृहखाते आहे. यागंभीर प्रकरणी पोलीस प्रशासन कसे ‘रिअॅक्ट’ होत आहे, याबाबतची माहिती मुंबईपर्यंत पोहोचू लागली आहे.
जिल्हा पोलीस अधीक्षक अभिलाष कुमार यांनी गुरूवारी येथील पोलीस ठाण्याला भेट दिली. सट्ट्याबाबत त्यांची कुठलीही भूमिका जाहीर केली नसली तरी त्यांची भेट सट्ट्याच्याच अनुषंगाने होती.