धारणीत नजरा आकाशाकडे
By लोकमत न्यूज नेटवर्क | Published: July 15, 2019 11:56 PM2019-07-15T23:56:50+5:302019-07-15T23:57:30+5:30
जिल्ह्यातील अन्य तालुक्यांच्या तुलनेत धारणी तालुक्यात सर्वाधिक पाऊस पडला खरा; मात्र आठ-दहा दिवसांपासून तोही गायब झाल्याने सरासरी शंभराहून ९१ टक्क्यांवर स्थिरावली आहे. लाखमोलाचे बियाणे जमिनीत पेरल्यानंतर शेतकऱ्यांचे डोळे आकाशाकडे लागले आहेत.
लोकमत न्यूज नेटवर्क
धारणी : जिल्ह्यातील अन्य तालुक्यांच्या तुलनेत धारणी तालुक्यात सर्वाधिक पाऊस पडला खरा; मात्र आठ-दहा दिवसांपासून तोही गायब झाल्याने सरासरी शंभराहून ९१ टक्क्यांवर स्थिरावली आहे. लाखमोलाचे बियाणे जमिनीत पेरल्यानंतर शेतकऱ्यांचे डोळे आकाशाकडे लागले आहेत.
तालुक्यात जून महिन्याच्या अखेरीस जवळपास ३० टक्के पेरणी झाली होती. त्यानंतर पावसाने संततधार सुरू केल्यामुळे पेरण्या खोळंबल्या. जुलैमध्ये पुन्हा पेरणी सुरू झाल्यावर ८ जुलैपर्यंत ५६ टक्के आणि सोमवारअखेर ८० टक्के पेरण्या झाल्याची माहिती तालुका कृषी अधिकारी अरुण बेठेकर यांनी दिली. मात्र त्या पेरण्या उलटण्याची भीती आहे. पावसाने उघाड दिल्यावर पेरणी करण्यात आली. मात्र, पावसाने दडी मारल्यामुळे त्या पेरण्या अयशस्वी होण्याच्या मार्गावर आहेत. जमिनीखालील बियाण्याऐवजी शेतकऱ्यांनी नजरा आभाळावर रोखल्या आहेत. येत्या दोन दिवसांत पाऊस न झाल्यास तालुक्यातील शेतकºयांवर मोठे संकट कोसळण्याची भीती वर्तविली जात आहे.
तालुक्यातील एकूण भौगोलिक क्षेत्र ८२ हजार २७० हेक्टर असून, त्यातील ४६ हजार ९४७ हेक्टर क्षेत्रावर खरिपाची पेरणी केली जाते.
तालुक्यात २०० मिमी पाऊस
तालुक्यात १ जून ते १५ जुलै या कालावधीत अपेक्षित ३४७.५ मिमी पावसाच्या तुलनेत आतापर्यंत ३१६.६ मिमी ( ९१.१ टक्के) पावसाची नोंद झाली. विशेष म्हणजे, जुलैच्या पहिल्या आठवड्यात अपेक्षित पावसाची सरासरी गाठून पाऊस पुढे गेला होता. मात्र आठ दिवसांच्या उघाडीनंतर ती सरासरी ९१ टक्क्यांपर्यंत खाली आली आहे.
तालुक्यात ३२४२ हेक्टरवर सोयाबीन, ११ हजार ८० हेक्टरवर कापूस, ३९५० हेक्टरवर तूर, ३१०० हेक्टरवर ज्वारी, ४१२० हेक्टरवर मका, ७६६ हेक्टरवर धान व ३२ हेक्टरवर अन्य पिकांची पेरणी झाली आहे. शेतकºयांना आता पावसाची प्रतीक्षा लागून आहे.
- अरुण बेठेकर, तालुका कृषी अधिकारी, धारणी