पीएसआयसह सहा पोलीस मनोज पांडेच्या शोधात
By admin | Published: April 5, 2017 12:06 AM2017-04-05T00:06:56+5:302017-04-05T00:06:56+5:30
विद्यार्थिनीचे लैंगिक शोषण प्रकरणातील आरोपी मनोज पांडे याच्या शोधार्थ दोन पोलीस उपनिरीक्षकासह सहा पोलीस कर्मचाऱ्यांची दोन पथके तयार करण्यात आली आहे.
विद्यार्थिनीच्या लैंगिक शोषणाचे प्रकरण : क्रिएटिव्ह अॅकेडमीतील सीसीटीव्ही फुटेज जप्त
अमरावती : विद्यार्थिनीचे लैंगिक शोषण प्रकरणातील आरोपी मनोज पांडे याच्या शोधार्थ दोन पोलीस उपनिरीक्षकासह सहा पोलीस कर्मचाऱ्यांची दोन पथके तयार करण्यात आली आहे. सोमवारी रात्री गाडगेनगर पोलिसांनी क्रिएटिव्ह अॅकेडमीतील सीसीटीव्ही फुटेज जप्त केली असून त्या फुटेजमध्ये काही आढळून येते का, याबाबत तपासणी सुरू केली आहे.
सिंधी कॅम्पस्थित राम लक्ष्मण संकुलातील क्रिएटिव्ह अॅकेडमीचे संचालक मनोज पांडे यांच्यावर एका विद्यार्थिनीने लैंगिक शोषणाचा गंभीर आरोप केला आहे. शिक्षक व विद्यार्थिंच्या संबंधांना काळीमा फासणाऱ्या या घटनेने शहरात खळबळ उडाली आहे. याची गंभीर दखल घेत पोलीस आयुक्तांनी आरोपीला तत्काळ अटक करण्याच्या सूचना दिल्यात. मात्र, अद्यापपर्यंत मनोज पांडे पोलिसांच्या हाती लागला नाही. गाडगेनगर पोलीस ठाण्यातील दोन पीएसआयसह सहा कर्मचाऱ्यांची दोन पथके मनोज पांडेच्या शोधात भटकंती करीत आहे. त्यांनी गुप्त माहितीवरून अकोला येथून मनोज पांडेचा शोध घेतला. मात्र काही मनोज पांडे पोलिसांच्या हाती लागला नाही. सोमवारी रात्री पोलीस उपनिरीक्षक सुलभा राऊत यांच्या पथकाने क्रिएटिव्ह अॅकेडमीची पाहणी केली असता तेथे ६ सीसीटीव्ही कॅमेरे आढळली. पोलिसांनी सीसीटीव्हीचे फुटेज जप्त केले. मनोज पांडेच्या संपर्कातील पाच जणांचे बयाण पोलिसांनी नोंदविले आहे. मात्र, त्यांनी मनोज पांडेबाबत काही माहिती नसल्याचे पोलिसांना सांगितले.
पांडेच्या पत्नीची चौकशी
मनोज पांडे पसार झाल्यावर त्याने पत्नीशी संपर्क केला असावा, असा संशय गाडगेनगर पोलिसांना होता. त्यामुळे पोलिसांनी राजापेठ परिसरात राहणाऱ्या पांडेच्या घरी जाऊन त्याच्या पत्नीकडे चौकशी केली. मात्र, मनोज पांडेने त्यांच्याशी संपर्क केला नसल्याचे पोलिसांना समजले.
लैंगिक शोषणाच्या प्रकरणात क्रिएटिव्ह अॅकेडमीतील सीसीटीव्ही फुटेज जप्त करण्यात आली असून पोलिसांची दोन पथके मनोज पांडेच्या शोधात आहे. त्याच्या पत्नीची चौकशी करण्यात आली. मात्र, पांडेने त्यांच्याशी संपर्क केला नसल्याचे निदर्शनास आले आहे.
- कैलास पुंडकर, पोलीस निरीक्षक, गाडगेनगर