चांदूरबाजार येथे वीज कंपनीकडून ग्राहकांची लूट
By admin | Published: October 15, 2014 11:13 PM2014-10-15T23:13:09+5:302014-10-15T23:13:09+5:30
विलंब आकाराच्या नावावर महावितरण कंपनीने ग्राहकांची लूट चालविली आहे. भारनियमन तसेच वीज दरवाढीच्या समस्येने आधीच त्रस्त असणाऱ्या ग्राहकांची विलंब आकाराच्या नावावर लूट होत
चांदूरबाजार : विलंब आकाराच्या नावावर महावितरण कंपनीने ग्राहकांची लूट चालविली आहे. भारनियमन तसेच वीज दरवाढीच्या समस्येने आधीच त्रस्त असणाऱ्या ग्राहकांची विलंब आकाराच्या नावावर लूट होत असल्याने ग्राहकांनी तीव्र संताप व्यक्त केला आहे.
महावितरणच्यावतीने सुरू असलेले भारनियमन त्याचबरोबर वीज वापरासाठी आकारण्यात येणारे वाढते दर व ग्रामीण भागात भारनियमनाव्यतिरिक्त होणारा खंडित विद्युत पुरवठा यामुळे ग्राहक त्रस्त झाले आहेत. त्यातच महावितरणच्यावतीने दरमाह वेळेवर देण्यात येणाऱ्या विद्युत बिलावर दिलेल्या रकमेचा भरणा व त्यानंतर विलंब झाल्यावर अधिक रकमेची करावी लागणारी भरणा यामुळे ग्राहकांना नाहक भुर्दंड बसत आहे.
विद्युत बिले वेळेच्या आत ग्राहकांना पोहचतील याची जबाबदारी महावितरण कंपनीची आहे. परंतु महावितरण कंपनीच्यावतीने वीज बिले वाटण्याचा ठेका कॉन्ट्रॅक्टरला देण्यात आला आहे. सदर ठेकेदाराकडून वेळेवर बिलाचे वाटप ग्राहकांना होत नाही. त्यामुळे उशिराने मिळालेल्या बिलाचा भरणा करताना अतिरिक्त दंडाचा भरणा वीज ग्राहकांना सहन करावा लागत असून आर्थिक भुर्दंड सोसावा लागत आहे. त्यामुळे अप्रत्यक्षरीत्या विलंब आकाराच्या नावाने वीज कंपनीकडून अशाप्रकारे वीज ग्राहकांची लूट सुरू आहे. त्यातच विलंब दर आकारणीचा भुर्दंड यामुळे महावितरण कंपनीच्या भोंगळ कारभारामुळे विद्युत ग्राहक कमालीचे त्रस्त झाले आहेत. वीज कंपनीकडून होणारी वीज ग्राहकांची लूट थांबवून सुरळीत सेवा देण्याची मागणी वीज ग्राहकांकडून केली जात आहे. (तालुका प्रतिनिधी)