राजापेठ पोलिसांच्या हद्दीत भरदिवसा लूटमार; २ लाख ३७ हजारांचा ऐवज पळविला
By प्रदीप भाकरे | Published: November 10, 2022 05:51 PM2022-11-10T17:51:59+5:302022-11-10T17:53:08+5:30
तीन लुटारूंविरुद्ध गुन्हा दाखल
अमरावती : फायनान्स कंपनीच्या वसुली कर्मचाऱ्यावर चाकूने वार करत त्याच्याकडील रोख रकमेसह २ लाख ३७ हजार ५०० रुपयांचा ऐवज लुटण्यात आला. राजापेठ ठाण्याच्या हद्दीतील भाग्योदय कॉलनी येथील हनुमान मंदिराजवळ ९ नोव्हेंबर रोजी दुपारी ३ वाजताच्या सुमारास ही घटना घडली. या प्रकरणी तीन अज्ञात लुटारूंविरुद्ध गुन्हा दाखल करण्यात आला आहे.
एका फायनान्स कंपनीत कार्यरत श्रीकांत सुखदेव तायडे (३२, रा. येरला, मोर्शी) हे वसुली करून एमएच २७ एटी १६२६ या दुचाकीने कार्यालयात जात होते. राजापेठ हद्दीतील भाग्योदय कॉलनीतील हनुमान मंदिराजवळ मागून आलेल्या दुचाकीवरील तीन लुटारूंनी त्यांना शिवीगाळ करून अडविले. त्यानंतर दोघे दुचाकीवरून उतरले. त्यापैकी एकाने श्रीकांत तायडे यांच्या मांडीवर अचानक चाकूने वार केला. त्यानंतर त्यांच्याजवळील २ लाख २६ हजारांची रोकड असलेली बॅग, टॅब व बायोमेट्रिक मशीन असा २ लाख ३७ हजार ५०० रुपयांचा ऐवज हिसकावून लुटारूंनी दुचाकीने पळ काढला.
घटनेनंतर श्रीकांत तायडे यांनी राजापेठ ठाण्यात तक्रार दाखल केली. तीनही आरोपी २५ ते ३० वर्षे वयोगटातील होते. त्यांनी काळी टीशर्ट, निळी जिन्स व चेहऱ्याला पांढरा दुपट्टा गुंडाळला होता, अशी माहिती तायडे यांनी पोलिसांना दिली. घटनेची माहिती मिळताच डीसीपी विक्रम साळी, एसीपी पूनम पाटील यांच्यासह ठाणेदार मनीष ठाकरे यांनी घटनास्थळी भेट दिली.