धावत्या रेल्वेगाडीत लूटमार, प्रवासी असुरक्षित
By admin | Published: January 30, 2017 01:12 AM2017-01-30T01:12:20+5:302017-01-30T01:12:20+5:30
दोन दिवसांपूर्वी बडनेरापासून काही अंतरावर धावत्या पॅसेंजर गाडीतील प्रवाशांना ब्लेडच्या धाकावर लुटण्यात
बडनेरा : दोन दिवसांपूर्वी बडनेरापासून काही अंतरावर धावत्या पॅसेंजर गाडीतील प्रवाशांना ब्लेडच्या धाकावर लुटण्यात आले. या घटनेने प्रवासी प्रचंड धास्तावले आहेत. पॅसेंजर गाड्यांमध्ये रात्रीच्या वेळी प्रवाशांना पोलिसांचे संरक्षण मिळावे, अशी संतप्त मागणी केली जात आहे.
प्रजासत्ताक दिनाच्या आदल्या रात्री बडनेरा ते टिमटाळादरम्यान धावत्या पॅसेंजर गाडीच्या डब्यातील प्रवाशांना ब्लेडच्या धाकावर मारहाण करून त्यांच्या जवळील पैसे व मोबाईल हिसकाविण्याच्या घटनेमुळे पॅसेंजर गाडीतील प्रवासी प्रचंड धास्तावले होते. भुसावळ ते वर्धा पॅसेंजर गाडी उशिरा रात्री साडेबारा वाजता बडनेरा स्थानकावर पोहोचते. शेगाव येथे गजानन महाराजांच्या दर्शनाला गेलेले भक्त मोठ्या संख्येने या गाडीतून परतीचा प्रवास करतात. यागाडीतील कमी प्रवासी असलेल्या डब्यातील प्रवाशांना पाच जणांच्या टोळीने ब्लेडच्या धाकावर लुटले. पुढे प्रवासी व बडनेरा रेल्वे पोलिसांनी पाचही आरोपींना पकडले. ज्या डब्यात लुटमारी झाली त्यातून पुरूषांसह महिला व लहान मुले देखील प्रवास करीत होते. सुदैवाने याप्रवाशांकडे मोठी रक्कम नव्हती. एक्सप्रेस गाड्यांप्रमाणेच उशिरा रात्री धावणाऱ्या पॅसेंजर गाड्यांमध्ये रेल्वे सुरक्षा दलाचे जवान प्रवाशांच्या सुरक्षेसाठी तैनात करण्याची मागणी आहे. याघटनेतील सर्व आरोपी अकोल्याचे असून ते मद्यधुंद अवस्थेत असल्याचे प्रत्यक्षदर्शी प्रवाशांनी सांगितले. यातील बहुतांश आरोपींवर अकोला शहर पोलीस ठाण्यात गुन्हे दाखल असल्याची माहिती आहे. प्रवाशांच्या सुरक्षेसाठी एकीकडे केंद्र सरकार व रेल्वे मंत्रालय नवनवीन उपाययोजना करीत आहेत. प्रत्यक्षात त्याचा प्रवाशांना कुठलाच फायदा होत नसल्याच्या संतप्त भावना प्रवासी व्यक्त करीत आहेत. एक्सप्रेस गाड्यांप्रमाणेच पॅसेंजर गाड्यांमध्ये देखील रेल्वे सुरक्षा बल, रेल्वे पोलिसांची नियमित गस्त सुरू करावी, अशी मागणी सर्वसामान्य प्रवाशांची आहे. (शहर प्रतिनिधी)
अवैध खाद्यपदार्थ विक्री देखील कारणीभूत
४धावत्या एक्सप्रेस, पॅसेंजर गाड्यांमध्ये अवैध खाद्यपदार्थ विक्रेत्यांनी हैदोस घातला आहे. हासर्व प्रकार रेल्वे सुरक्षा बल, रेल्वे पोलिसांच्या आशीर्वादाने सुरु आहे. अवैध खाद्यपदार्थ विक्रेत्यांची पार्श्वभूमी सुद्धा गुन्हेगारी स्वरुपाची आहे. त्यामुळे लूटमारी, खिसेकापू, चोरी आदी प्रकारासाठी अवैध खाद्यपदार्थ विक्रेते जबाबदार आहेत.