भगवान महावीर जीवनदर्शन

By Admin | Published: April 2, 2015 12:29 AM2015-04-02T00:29:11+5:302015-04-02T00:29:11+5:30

कालचक्र म्हणजे परिवर्तनशील असून ते सतत फिरतं चक्र आहे.

Lord Mahavir biography | भगवान महावीर जीवनदर्शन

भगवान महावीर जीवनदर्शन

googlenewsNext

अमरावती : कालचक्र म्हणजे परिवर्तनशील असून ते सतत फिरतं चक्र आहे. ज्यामध्ये दिवस, रात्र, महिना, पक्ष आणि वर्ष हे एकामागून एक येत असतात. तसेच शताब्दी, सहस्त्राब्दी, लक्ष, कोटी आणि असंख्यात वर्ष काल परिवर्तनाच्या नियमात येतात.
जैन परंपरेनुसार दोन कालखंड असतात : १) उत्सर्पिणी आणि उवसर्पिणी ज्या काळामध्ये प्राणीमात्रांची शक्ती, आयुष्य आणि शरीराची उंची याप्रमाण क्रमश: वाढते तो उत्सर्पिणी काल आणि ज्यामध्ये हे तीनही क्रमश: घटत जातात तो अवसर्पिणी काल होय.
तृतीय काल संपल्यानंतर कुलकरांची उत्पत्ती होते. यामध्ये प्रथम प्रतिश्रूती आणि अंतिम नाभीराय यांचा जन्म झाला. नाभीरायांचे पूत्र प्रथम तीर्थकर ऋषभनाथ झाले.
तीर्थ अर्थात घाट, जो घाट प्राप्त करून संसार सागर तरुन जाणे म्हणजे तीर्थ, मोक्षप्राप्तीच्या उपायभूत रत्नत्रय धर्माला तीर्थ म्हणतात. तीर्थ करोती इती तीर्थकर याप्रमाणे धर्म म्हणतात. जेव्हा धर्माचा प्रभाव घटतो आणि मिथ्यात्वाची भावना वाढते तेव्हा तीर्थकर अवतारीत होऊन धर्म-तीर्थची स्थापना करतात.
पद्मपुराण ग्रंथामध्ये ५ वे प्रकरण श्लोक २०६ मध्ये असे म्हटले आहे-
आचाराणां विद्यातेन, कुद्दष्टीनांच संपदा।
धर्मग्लानिं परिप्राप्तमुच्छयंते जिनोनम:।।
या युगात २४ तीर्थंकर होऊन गेले. त्यापैकी प्रथम तीर्थंकर ऋषभदेव आणि अंतिम तीर्थंकर म्हणजे महावीर स्वामी हे चोविसावे तीर्थंकर धर्म संस्थापक नसून शाश्वत प्रवहमान धर्म परंपरेचे प्रवर्तक आहेत.
कृतिनायक चोविसावे तीर्थंकर महावीर स्वामी जगविख्यात ऐतिहासिक महापुरूष आहेत. ज्यांची महती सर्वत्र मुक्तकंठाने गायिली जाते.
ऋग्वेद मंडलमध्ये अध्याय - १ सूत्र ३ मध्ये लिहिले आहे-
देववहिर्वधमांन सुविरस्तीर्ण रोयसुभरं वेद्यास्याम।
घृतेनाक्त वसव: सदितेदं विश्वे देवा। आदित्याय ज्ञियास:।।
धन्य ती वैशाली नगरी ज्या ठिकाणी बालक महावीराचा जन्म झाला. प्रजापाल, पापभीरू राजा सिद्धार्थ आणि त्रिशलादेवी यांच्यापोटी बालक महावीरांचा जन्म झाला. वैशाली नगरी अतिशय समृद्ध आणि भाग्यशाली होती.
एक दिवस सौधर्म इंद्राने कुबेराला वैशाली नगरीवर रत्नांचा पाऊस पाडण्यास सांगितले. इंद्रांची आज्ञा मानून कुबेराने मध्यलोकी येऊन वैशाली नगरीवर रत्नांचा पाऊस पाडला. धर्म प्रभावानेच तीनही लोकांमध्ये तीर्थंकरांसारखे पुज्यपदप्राप्त पुत्राचा जन्म होतो. याचा शुभसंकेत राणीला (त्रिशल) पडलेल्या सोळा स्वप्नांमधून मिळाला आणि चैत्र शुक्ल त्रयोदशी (सोमवार २७ मार्च इ. पू. ५९८) या दिवशी उत्तरा फाल्गुनी नक्षत्रावर राणी त्रिशला देवीने तीन ज्ञानधारी धर्म प्रवर्तक तीर्थकर पुत्राला जन्म दिला आणि धरती धन्य झाली.
बालक महावीरांच्या जन्मापासून महाराजा सिद्धार्थ यांचे शक्ती वैभव वाढू लागले. त्यांची कीर्ती उन्नत झाली म्हणून त्यांनी सर्वांना आमंत्रित करून वीर बालकांचे नामकरण करून नाव वर्धमान ठेवले.
भगवान पार्श्वनाथ यांच्या शासनकाळातील मुनी यांनी बालक महावीराला सन्मती दाता आहे म्हणून त्याचे नाव ‘सन्मती’ ठेवले. बाल्यावस्थेत देवांनी त्यांची परीक्षा घेण्याच्या उद्देशाने ‘सर्व’ रुप धारण करून बालक महावीराला भयभीत करण्याचा प्रयत्न केला. मित्रांसमवेत खेळत असताना त्यांना तो साप दिसला इतर मित्र सापाला पाहून पळून गेले. परंतु सन्मती त्या सर्वासोबत निर्भयपणे खेळले म्हणून त्यांचं नाव ‘महावीर’ झाले.
अशी विविध चमत्कारांनी आणि कृतीने त्यांना बालपणातच अनेक नावे मिळालीत. सुखोपयोग पायाशी लोळण घेत असताना तारूण्य आले. परंतु महावीरांची प्रवृत्ती भोगाकडे नसून त्यागाकडे होती. सतत एकांतात बसून आत्मचिंतन करण्याकडेच त्यांचा कल होता. त्यांनी अविवाहित राहण्याचा दृढ निश्चय केला. त्यांच्या निश्चयाने सर्वजण दु:खी झाले. परंतु त्यांनी कोणत्याही आसक्तीमध्ये न पडता वयाच्या अवघ्या तिसाव्या वर्षी संध्याकाळी जेव्हा चंद्र हस्त आणि उत्तरा फाल्गुनी नक्षत्राच्या मध्यात होता तेव्हा अतिशय धीर वीर महावीरांनी वस्त्रआभूषणांचा त्याग करून पंचमुष्टी केशलोच करून ‘नम: सिद्धेभ्य:’ म्हणत निर्ग्रंथ जैन दीक्षा धारण केली.

संध्या अमरकुमार सावळकर,
मोतीनगर, अमरावती.
अहिंसा :
प्राण्यांच्या केवळ हत्येचाच निषेध नाही, त्यांना त्रास होईल अशी कोणतीही कृतीसुद्धा निषेध्य आहे. आज आपण पाहतो की जीवनात दिवसेंदिवस निरंतर अहिंसेचं अवमूल्यन होत आहे. भौतिक ज्ञानाने आण्विक ऊर्जा व शस्त्र निर्माण केले की, थोड्याशा असावधानीने विनाशकाल येऊ शकतो.
अनेकांत :
याचा अर्थ, सहअस्तित्व, सहिष्णुता व अनाग्रह व्यक्ती तितक्या मान्यता, व्यक्ती विविध धर्मी असू शकतात. त्यांचे विचार, व्यवहार चिंतन भिन्न असू शकतात. यातील एकांगी विचारामुळे संघर्षाची परिस्थिती येऊ शकते. आपल्याला संघर्ष नको तर शांतता पाहिजे.
अपरिग्रह :
भगवान महावीरांचा तिसरा सिद्धांत अपरिग्रह. परिग्रह म्हणजे संग्रह. संग्रह हा मोक्षाचा परिणाम आहे. धन, पैसा, वस्तू या सर्वांचा संचय म्हणजे परिग्रह. परिग्रहामुळे माणूस दु:खी होतो, म्हणून भगवान महावीर म्हणतात, परिग्रहाचा संपूर्ण त्याग करा किंवा शक्य नसेल तर आवश्यक सामग्रींचा संचय करा अनावश्यक वस्तूंचा त्याग करा.
आत्मस्वातंत्र्य :
यालाच कर्मवाद किंवा अकर्तावाद म्हणजेच ईश्वरीशक्ती किंवा सृष्टी संचालन न मानणे. भगवान कृतकृत्य झालेत म्हणून ते कोणत्याही प्रकारे कार्यकारण कर्तृत्वापासून मुक्त आहे. प्रत्येक जीव आपण केलेल्या कर्माचे फळ भोगतो. जीवाचे शुभ कर्म त्याला उन्नत व सुखी करतात. अशुभ कर्म अवनत व दु:खी करतात. प्रत्येक गोष्ट आपण स्वत: केलेल्या चांगल्या वाईट कर्माचे फळ आहे. त्यासाठी दुसरी व्यक्ती कारणीभूत नाही. आपण केलेल्या कर्मावर विश्वास ठेवून त्याचं मिळणारं फळ स्वीकारण हेच खरं धैर्य आहे. मनात कर्तृत्वाचा अहंकार नसावा व कर्तृत्वाचा दुसऱ्यावर दोष न देता या वस्तुस्थितीला समजून आत्म्याची शुद्ध दशा प्राप्त करणे.
हेच खरे धर्मचतुष्ट्य भगवान महावीर स्वामींच्या सिद्धांताचे सार आहे.
‘जन्मसे नही कर्मसे महान बनता है।’
याचा अर्थ प्रत्येक मानवप्राणी ‘कंकर से शंकर, भीलसे भगवान, नर से नारायण, निरंजन बनता है.’ हेच खरे भगवान महावीरांचे जीवन दर्शन आहे.

Web Title: Lord Mahavir biography

Get Latest Marathi News , Maharashtra News and Live Marathi News Headlines from Politics, Sports, Entertainment, Business and hyperlocal news from all cities of Maharashtra.