यूजीसीच्या परिपत्रकाला खो; कॉलेजची मान्यता रद्द करा
By लोकमत न्यूज नेटवर्क | Published: May 6, 2020 07:24 PM2020-05-06T19:24:29+5:302020-05-06T19:25:37+5:30
विद्यापीठ अनुदान आयोगाने जारी केलेल्या परिपत्रकाला संत गाडगेबाबा अमरावती विद्यापीठ अंतर्गत महाविद्यालयांनी फारसा प्रतिसाद दिला नाही. त्यामुळे अशा कॉलेजची मान्यता रद्द करावी, अशी मागणी सिनेट सदस्य मनीष गवई यांनी केली आहे.
लोकमत न्यूज नेटवर्क
अमरावती : विद्यापीठ अनुदान आयोगाने जारी केलेल्या परिपत्रकाला संत गाडगेबाबा अमरावती विद्यापीठ अंतर्गत महाविद्यालयांनी फारसा प्रतिसाद दिला नाही. त्यामुळे अशा कॉलेजची मान्यता रद्द करावी, अशी मागणी सिनेट सदस्य मनीष गवई यांनी केली आहे. तसेच ऑनलाइन शिक्षणाद्वारे विद्यार्थ्यांचे अभ्यासक्रम पूर्ण करावे, असे निवेदनात म्हटले आहे.
राज्यपाल भगतसिंह कोश्यारी, अमरावती विद्यापीठाचे कुलगुरू मुरलीधर चांदेकर यांना दिलेल्या निवेदनातून मनीष गवई यांनी विद्यार्थ्यांचे शैक्षणिक प्रश्न, समस्या, परीक्षांबाबत अवगत केले आहे. नुकतेच काही दिवसांपूर्वी यूजीसीने परीक्षा, ऑनलाईन अभ्यासक्रम याबाबत गाइड लाइन जारी केले होते. यूजीसीच्या या परिपत्रकाची कॉलेजस्तराहून अंमलबजावणी होणे आवश्यक होते. तथापि, अमरावती विद्यापीठाशी संलग्नित ३९४ महाविद्यालयांनी यूजीसीच्या परिपत्रकाला खो दिला आहे. त्यामुळे विद्यार्थ्यांचे शैक्षणिक भवितव्याचा प्रश्न उपस्थित झाला आहे. विद्यार्थ्यांचे वर्ष वाया जाऊ नये, यासाठी शैक्षणिक संस्थांनी ऑनलाइन शिक्षणाचा पर्याय विद्यार्थ्यांना उपलब्ध करून द्यावा, यासाठी विद्यापीठ अनुदान आयोगाच्यावतीने नुकतेच परिपत्रक जाहीर करण्यात आले. परंतु विद्यापीठ अनुदान आयोगाच्या या परिपत्रकाला महाविद्यालयांनी पाहिजे तसा प्रतिसाद दिला नाही. यूजीसीच्या परिपत्रकाचे पालन न करणाऱ्या महाविद्यालयांची मान्यता रद्द करण्याची मागणी सिनेट सदस्य मनीष गवई यांनी केली आहे.
ऑनलाईन अभ्यासक्रमासाठी विद्यापीठाने पुढाकार घ्यावा
कोरोनाने देशभरात 'लॉकडाऊन' केल्यामुळे विद्यार्थ्यांचे वर्ग कक्ष बंद आहेत. विद्यापीठांचे शैक्षणिक वर्ष विस्कळीत व परीक्षा लांबणीवर टाकल्या आहेत. त्यामुळे अमरावती विद्यापीठाने महाविद्यालयांच्या सर्व शाखेतील विद्यार्थ्यांना ऑनलाइन पद्धतीने शिक्षण देण्याची व्यवस्था करावी आणि वेगवेगळ्या ऑनलाइन पद्धतीचा वापर करून अभ्यासक्रम पूर्ण करावा. त्यामुळे विद्यार्थ्यांचे शैक्षणिक वर्ष वाया जाणार नाही आणि शैक्षणिक वर्षांमध्ये त्यांची पदवी पूर्ण होईल, असे निवेदनातून म्हटले आहे.
विद्यापीठाने ऑनलाइन अभ्यासक्रम पूर्ण करण्यासाठी अगोदरच तयारी केली आहे. प्राचार्यांची जिल्हानिहाय ऑनलाईन बैठकी झाल्या आहेत. आता केवळ शासनाकडून परीक्षांच्या तारखांची प्रतीक्षा आहे.
- मुरलीधर चांदेकर, कुलगुरू, संत गाडगेबाबा अमरावती विद्यापीठ