आठ दिवसांत मिळणार नुकसान भरपाई

By admin | Published: February 29, 2016 11:59 PM2016-02-29T23:59:49+5:302016-02-29T23:59:49+5:30

जिल्ह्यात २७ व २८ फेब्रुवारीला झालेल्या अवकाळी पाऊस व गारपिटीमुळे ६१ गावांमधील २ हजार ५७३ शेतकऱ्यांच्या..

Loss compensation for eight days | आठ दिवसांत मिळणार नुकसान भरपाई

आठ दिवसांत मिळणार नुकसान भरपाई

Next

पालकमंत्री : ६१ गावांत ९ हजार २८ हेक्टरमध्ये १५ कोटींच्या हानीचा प्राथमिक अंदाज, शासनाला अहवाल सादर
अमरावती : जिल्ह्यात २७ व २८ फेब्रुवारीला झालेल्या अवकाळी पाऊस व गारपिटीमुळे ६१ गावांमधील २ हजार ५७३ शेतकऱ्यांच्या ९ हजार २८ हेक्टर क्षेत्रामधील शेतीपिके व फळपिकांचे १५ कोटींपेक्षा अधिक नुकसान झाल्याचा प्राथमिक अंदाज आहे. शेतकऱ्यांना या बाधित पिकांची नुकसान भरपाई आठ दिवसांत मिळणार असल्याची माहिती पालकमंत्री प्रवीण पोटे यांनी सोमवारी पत्रपरिषदेत दिली.
पालकमंत्री प्रवीण पोटे यांनी जिल्हाधिकाऱ्यांसमवेत सोमवारी ७ बाधित गावांना भेटी दिल्यात. जिल्ह्यात गारपिटीने झालेल्या नुकसानीबाबत मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस व महसूलमंत्र्यांशी चर्चा झाली. दोन-तीन दिवसांत जिल्ह्याला नुकसानीचे अनुदान प्राप्त होणार असल्याचे त्यांनी सांगितले.

बाधित जिल्ह्यांसाठी १०० कोटी उपलब्ध
अमरावती : चांदूरबाजार तालुक्यातील २८ गावांत १८५४ हेक्टरमधील गहू, ७२२ हेक्टरमधील हरभरा, ११०५ हेक्टरमध्ये असलेला भाजीपाला व ४१२२ हेक्टरमधील फळपिकांसह एकूण ७ हजार ७८ हेक्टरमधील पिकांची प्रचंड हानी झाली आहे. धामणगाव तालुक्यात २६० हेक्टर व अमरावती तालुक्यात ८६० हेक्टरमधील गहू व हरभरा पिकांचे मोठ्या प्रमाणावर नुकसान झाल्याचे पालकमंत्र्यांनी सांगितले. चांदूरबाजार तालुक्यात २८ घरांचे व २७ झोपड्यांचे नुकसान झाले. चिखलदरा तालुक्यात वीज पडल्याने १ बैल व १ म्हैस दगावली. त्यांना जिल्हास्तरावर मदत देण्यात येणार असल्याची माहिती त्यांनी दिली.
राज्यात अमरावती जिल्ह्यासह यवतमाळ, सातारा, परभणी व जालना जिल्ह्यातील शेतीपिकांचे वादळी पाऊस व गारपिटीमुळे मोठ्या प्रमाणात नुकसान झाले आहे. यासाठी शासनाने १०० कोटींची आर्थिक मदत उपलब्ध करून दिली आहे. जिल्ह्यातील नुकसानीच्या मदतीसाठी शासनाकडे मागणी नोंदविण्यात आल्याची माहिती जिल्हाधिकारी किरण गित्ते यांनी दिली.
गुरुवारपर्यंत पावसाची शक्यता
पूर्वेकडून वाहणारे उष्णवारे, दक्षिण मध्य महाराष्ट्रापासून पश्चिम मध्य प्रदेशापर्यंत हवेच्या कमी दाबामुळे तयार झालेली द्रोणीय स्थिती यामुळे विदर्भ मराठवड्यात गुरुवारपर्यंत मेघगर्जनेसह पाऊस पडण्याची शक्यता असल्याची माहिती हवामान खात्याचा अंदाज आहे.
ओंबीवर आलेला गहू जमीनदोस्त
सध्या गव्हाचे पीक ओंबी धरण्याच्या स्थितीत आहे. गारपिटीमुळे हा गहू जमिनीवर लोळला. त्यामुळे दाणा बारकावणार आहे. तसेच हरभरा संवगणीच्या अवस्थेत आहे. गारपिटीमुळे घाट्याला मार बसला आहे. त्यामुळे सरासरी उत्पन्नात घट होण्याची शक्यता आहे.
संत्र्याच्या मृगबहराचे नुकसान
संत्र्याच्या मृगबहराची फळे झाडावर आहेत. या फळांना गारांचा मार बसला. फळे व पानांची गळ सुरू झाली आहे. मार लागलेल्या फळांची गळ होणार आहे. आंबिया बहरदेखील गळून पडला आहे. (प्रतिनिधी)

३३ टक्क्यांवर बाधित पिकांना मदत
जिल्ह्यात झालेला वादळी पाऊस व गारपिटीमुळे ३३ टक्क्यांवर बाधित पिकांना केंद्राच्या नवीन निकषांप्रमाणे नुकसान भरपाई मिळणार आहे. त्यामुळे सरसकट सर्वच शेतकऱ्यांपर्यंत ही मदत पोहोचणार असल्याचे ना. पोटे यांनी सांगितले.
-तर ‘त्या’ व्यापाऱ्याचा
परवाना रद्द करू
चांदूरबाजार कृषी उत्पन्न बाजार समितीमध्ये शेतकऱ्यांनी शनिवारी माल विक्रीसाठी आणला होता. मात्र, पावसामुळे तो भिजला. लिलाव झालेल्या धान्याची उचल न केल्यास त्या व्यापाऱ्याचा परवाना तत्काळ रद्द करण्याचे निर्देश बाजार समिती सचिवाला दिल्याचे देखील ना. पोटे यांनी सांगितले.

शेतीपिकांच्या नुकसानीसाठी २३ एप्रिल २०१५ च्या शासन निर्णयाप्रमाणे मदत मिळणार आहे. प्राथमिक सर्वेक्षण करून शासनाला अहवाल पाठविला आहे. घरांची पडझड व प्राणहानीसाठी जिल्हास्तर नैसर्गिक आपत्ती निधीमधून मदत देण्यात येणार आहे.
- किरण गित्ते, जिल्हाधिकारी

२ हेक्टर क्षेत्रापर्यंत मदत
जिल्ह्यात वादळी पाऊस, गारपिटीमुळे ९ हजार हेक्टर शेती व फळपिकांचे नुकसान झाले. २ हेक्टर क्षेत्रापर्यंत मदत दिली जाईल. ही मदत शेतकऱ्यांच्या बँक खात्यात थेट जमा होणार आहे.

शेतकऱ्यांना जिल्हा काँग्रेसतर्फे मदत
अमरावती : रविवारच्या वादळाने बाधित झालेल्या शेतकऱ्यांना दुसऱ्याच दिवशीच जिल्हा ग्रामीण काँग्रेस कमिटीने मदतीचा हात दिला. काँग्रेसचे जिल्हाध्यक्ष बबलू देशमुख यांनी सोमवारी चांदूरबाजार, अचलपूर, परतवाड्यासह अन्य गावांना भेटी देऊन झालेल्या नुकसानीचा आढावा घेतला व शक्य तेवढ्या शेतकऱ्यांना आर्थिक मदत दिली. अखेरीस त्यांनी चांदूरच्या बाजार समितीमध्ये झालेल्या धान्याच्या नासाडीची पाहणी केली.
 

 

शासनाने भरीव मदत द्यावी
अमरावती : वादळाचा फटका बसलेल्या शेतकऱ्यांना शासनाने तत्काळ आर्थिक मदत करावी, अशी मागणी त्यांनी राज्य शासनाकडे केली आहे.
रविवारी वादळी पाऊस, गारपिटीने अचलपूर, चांदूरबाजार, परतवाड्यासह जिल्हाभरात शेतीपिकांची प्रचंड हानी झाली. गारपिटीमुळे कांदा, गहू, हरभरा, संत्रा या पिकांचे अतोनात नुकसान झाले आहे. खरीप हंगाम हातचा गेला असताना शेतकऱ्यांची रबीच्या पिकांवरच संपूर्ण मदार होती. मात्र, पुन्हा अवकाळी पावसाने शेतकऱ्यांना नुकसानीच्या खाईत लोटले आहे. नुकसानग्रस्त शेतकऱ्याशी संवाद साधून त्यांना जिल्हा काँग्रेसने आर्थिक मदत दिल्याने संकटग्रस्त शेतकऱ्यांना दिलासा मिळाला आहे. नुकसानग्रस्त भागाच्या पाहणी दौऱ्यात जिल्हाध्यक्ष बबलू देशमुख, किशोर किटुकले, समीर देशमुख, शिवाजी बंड, नंदू वासनकर, मंगेश अटाळकर, मंगेश देशमुख, शिवानंद मदने, नारायण वाडेकर आदींचा सहभाग होता.

अवकाळी पाऊस व गारपिटीमुळे जिल्ह्यात शेतकऱ्यांचे अतोनात नुकसान झाले आहे. शिवाय अनेक घरेदेखील क्षतिग्रस्त झाली आहेत. या सर्व नुकसानीचे सर्वेक्षण करून शासनाने तातडीने नुकसान भरपाई द्यावी.
- बबलू देशमुख, जिल्हाध्यक्ष,
जिल्हा ग्रामीण काँग्रेस कमेटी.

Web Title: Loss compensation for eight days

Get Latest Marathi News , Maharashtra News and Live Marathi News Headlines from Politics, Sports, Entertainment, Business and hyperlocal news from all cities of Maharashtra.