२४ तासांत ३० हजार हेक्टरचे नुकसान, दोघांचा मृत्यू; संततधार पावसाने सहा तालुके बाधित
By ऑनलाइन लोकमत | Published: July 23, 2023 07:37 PM2023-07-23T19:37:17+5:302023-07-23T19:37:41+5:30
२४ तासांत जिल्ह्यात सार्वत्रिक सरासरी २२.३ पावसाची नोंद झाली. याशिवाय प्रकल्पाचा विसर्ग सोडण्यात आल्यात आल्याने नदी-नाले दुथडी भरून वाहून वाहू लागले आहे.
अमरावती : शुक्रवारी झालेल्या संततधार पावसाने सहा तालुक्यातील २९८४० हेक्टरमधील कपाशी, तूर व सोयाबीन पिकांचे नुकसान झाले आहे. नदी-नाल्यांना पूर आल्याने त्यात दोन व्यक्ती वाहून गेल्या. याशिवाय ११७ घरांची पडझड झाल्याचा जिल्हा प्रशासनाच्या प्राथमिक अहवाल आहे. जिल्ह्यात आतापर्यंत ४५ हजार हेक्टरमधील पिकांचे नुकसान झाले आहे.
२४ तासांत जिल्ह्यात सार्वत्रिक सरासरी २२.३ पावसाची नोंद झाली. याशिवाय प्रकल्पाचा विसर्ग सोडण्यात आल्यात आल्याने नदी-नाले दुथडी भरून वाहून वाहू लागले आहे. त्यामुळे अनेकांच्या शेतात पुराचे पाणी शिरले. यामध्ये सर्वाधिक २६११७ हेक्टरमध्ये मोर्शी तालुक्यात नुकसान झाले आहे. याशिवाय भातकुली तालुक्यात २६२१, चांदूर बाजार ३००, वरूड ६८२, चांदूर रेल्वे ७५ व नांदगाव खंडेश्वर तालुक्यात ६८२ हेक्टरमधील पिकांचे नुकसान झाले आहे.
नदीला आलेल्या पुरामुळे धामणगाव व चांदूर बाजार तालुक्यात प्रत्येकी एक व्यक्ती वाहून गेला आहे. याशिवाय चार पशुधन मृत झाले आहे. या पावसाने आठ तालुक्यांतील ११७ घरांची पडझड झाली आहे.