हरविलेले २० लाखांचे १०४ मोबाईल मूळ मालकांना केले परत
By लोकमत न्यूज नेटवर्क | Published: January 20, 2021 04:15 AM2021-01-20T04:15:01+5:302021-01-20T04:15:01+5:30
अमरावती : पोलीस आयुक्तालयाच्या १० ठाण्यांच्या हद्दीत मोबाईल हरविल्याच्या नोंदी असलेले २० लाखांचे महागडे १०४ मोबाईल पोलिसांनी तांत्रिक तपास ...
अमरावती : पोलीस आयुक्तालयाच्या १० ठाण्यांच्या हद्दीत मोबाईल हरविल्याच्या नोंदी असलेले २० लाखांचे महागडे १०४ मोबाईल पोलिसांनी तांत्रिक तपास करून शोधून काढले. पोलीस आयुक्त आरती सिंह यांच्या हस्ते सोमवारी मूळ मालकांना ते परत करण्यात आले. मोबाईल परत मिळताच नागरिकांच्या चेहऱ्यावर हास्य फुलले.
मोबाईल हरविल्याच्या तक्रारी विविध ठाण्यांमध्ये दाखल झाल्या होत्या. त्या अनुषंगाने पोलीस आयुक्त आरती सिंह, शहर सायबर ठाण्याचे पोलीस निरीक्षक रमेश ताले, तत्कालीन पोलीस निरीक्षक प्रवीण काळे, सहायक निरीक्षक रवींद्र सहारे, पोलीस अंमलदार सचिन भोयर, मयूर बोरेकर, पंकज गाडगे, प्रशांत मोहोड यांनी संबंधित मोबाईलबाबत तांत्रिक तपास करून १२ लाखांचे १०४ मोबाईल शोध घेण्यात यश मिळविले. पोलीस आयुक्त आरती सिंह यांच्या हस्ते मूळ मालकांना पोलीस आयुक्तालयात बोलावून त्यांना मोबाईल परत देण्यात आले. याप्रसंगी पोलीस उपआयुक्त विक्रम साळी यांचीही उपस्थिती होती.
बॉक्स:
ॲप्सबाबत बाळगा सावधगिरीपोलीस आयुक्त आरती सिंह यांनी याप्रसंगी उपस्थितांना मार्गदर्शन केले. सोशल मीडियाचा वापर, गुगल सर्च फसवणूक, ओएलएलक्स फ्रॉड, रिमोट कंट्रोल ॲप्स, क्यूआर कोड फ्रॉड, यूपीआय फ्रॉड याबाबत सविस्तर माहिती देत, त्यांनी नागरिकांना सावध राहण्याचे आवाहन केले.
बॉक्स:
ओटीपी देऊ नका
सायबर गुन्हेगार हे आपल्याला बँकेतून बोलत असल्याची बतावणी करून एटीएम कार्ड डिटेल्स, ओटीपी विचारून फसवणूक करतात. त्यामुळे कुणालाही बँक खाते, डेबिट कार्ड, क्रेडिट कार्डची माहिती देऊ नका, आलेला ओटीपी सांगू नका, असे पोलीस आयुक्त आरती सिंह यांनी सांगितले.