कार्यकारी अभियंत्यांकडून लेखापरीक्षणास ‘खो’
By लोकमत न्यूज नेटवर्क | Published: June 18, 2018 11:46 PM2018-06-18T23:46:05+5:302018-06-18T23:46:16+5:30
कार्यकारी अभियंत्यांनी लेखापरीक्षणासाठी आवश्यक रेकॉर्ड हेतुपुरस्सरपणे उपलब्ध करून दिला नाही, असा गंभीर आक्षेप मुख्य लेखापरीक्षकांनी नोंदविला आहे. अभिलेखे उपलब्धतेबाबत वारंवार पत्रव्यवहार करण्यात आला. मात्र, त्यानंतरही जाणीवपूर्वक ते अभिलेखे उपलब्ध करून न दिल्याने जमा रकमांची खात्री करता येत नसल्याचे त्यांनी लेखापरीक्षणात म्हटले आहे.
लोकमत न्यूज नेटवर्क
अमरावती : कार्यकारी अभियंत्यांनी लेखापरीक्षणासाठी आवश्यक रेकॉर्ड हेतुपुरस्सरपणे उपलब्ध करून दिला नाही, असा गंभीर आक्षेप मुख्य लेखापरीक्षकांनी नोंदविला आहे. अभिलेखे उपलब्धतेबाबत वारंवार पत्रव्यवहार करण्यात आला. मात्र, त्यानंतरही जाणीवपूर्वक ते अभिलेखे उपलब्ध करून न दिल्याने जमा रकमांची खात्री करता येत नसल्याचे त्यांनी लेखापरीक्षणात म्हटले आहे.
सन २०१३-१४ व २०१४-१५ मधील कार्यकारी अभियंता १ कार्यालयातील जमा बाजूचा लेखापरीक्षण अहवाल नुकताच स्थायी समितीसमक्ष ठेवण्यात आला. त्यात हे गंभीर आक्षेप नोंदविण्यात आले आहेत.
२५ एप्रिल व २८ नोव्हेंबर २०१४ रोजी कार्यकारी अभियंता १ या विभागाकडून ५ लाख ९ हजार ५०० व ३ लाख ३५ हजार रुपये या रकमांची चलान रोखपालाकडे भरण्यात आली. ती रक्कम धनादेश-डीडीच्या स्वरूपात स्वीकारल्याचे रजिस्टरमध्ये नमूद आहे. परंतु, ती रक्कम खात्यात प्रत्यक्षात जमा झाली की नाही, याबाबत कुठलीही नोंद आढळून आलेली नाही. त्यामुळे त्या रकमांमध्ये अनियमितता झाल्याची शक्यता लेखापरीक्षणात व्यक्त करण्यात आली आहे.
याशिवाय सर्वसाधारण रस्ते अनुदान या शिर्षातून २ कोटी २१ लाख रूपये अनुदानाची ‘चेक रिसिव्हड’ व ‘अॅडजेस्टेड रजिस्टर’मध्ये नोंद नाही. तसेच सदर धनादेश कोणत्या तारखेस प्राप्त झाले व रोखीकरणाचा दिनांक व प्रत्यक्ष खात्यात रक्कम जमा झाल्याची नोंदही नाही. त्यामुळे ती रक्कम आक्षेपाधीन ठेवण्यात आली आहे. सन २०१३-१४ व २०१४-१५ या आर्थिक वर्षात कार्यकारी अभियंता १ मधील मुद्रांक लेख्यांची तपासणी करण्यात आली. त्यात संबंधित लिपिकाने मुद्रांक शुल्कावर स्वत: खर्च केला असल्याचे आढळून आले. मनपा अधिनियमात अशी कुठलीही तरतूद नसल्याने संबंधित लिपिकाने स्वत:च्या खिशातून केलेला तो खर्च मुख्यलेखापरीक्षकांनी संशयास्पद ठरविला आहे.
भरणा चार दिवस उशिरा
वसुली लिपिकांनी वसूल केलेल्या रकमांची एकत्रित चलान रोजच्या रोज रोखपालांकडे भरणा करणे आवश्यक आहे. परंतु, २०१३-१४ या वर्षात १ लाख २८ हजार रुपये संबंधित लिपिकाने ८ आॅगस्ट २०१३ रोजी स्वीकारले. मात्र, रोखपालाकडे १२ आॅगस्टला भरणा केल्याचा आक्षेपही नोंदविण्यात आला आहे.
अभिलेखे दिलेच नाहीत
‘इ-वन’ने वसूल केलेली बयाना रक्कम, पावती पुस्तक, भरणा रजिस्टर, चलान प्रत, प्राप्त अनुदान, अनुदानाची धनादेश रजिस्टरमध्ये नोंद व दिनांक, धनादेश रोखीकरणाबाबतची माहिती, प्राप्त अनुदानाचे भरलेल्या चलान, निविदा फॉर्म फी चे एकूण उत्पन्न हे अभिलेखे लेखापरीक्षणास उपलब्ध करून देण्यात आले नाहीत.