वॉटस्अपमुळे मिळाला हरवलेला चिमुकला; दिवाळीत उजळले आनंददीप
By लोकमत न्यूज नेटवर्क | Published: November 15, 2020 08:54 PM2020-11-15T20:54:59+5:302020-11-15T20:55:23+5:30
Amravati News boy missing दिवाळीच्या तोंडावर आठ दिवसांपूर्वी परतवाड्यातील गुजरी बाजारातून हरविला गेलेला दोन वर्षीय चिमुकला अखेर दिवाळीच्या दिवशी सुखरूप मिळाला, आणि त्या घरात दिवाळीच्या आनंद पणत्या पेटल्या.
लोकमत न्यूज नेटवर्क
अमरावती: दिवाळीच्या तोंडावर आठ दिवसांपूर्वी परतवाड्यातील गुजरी बाजारातून हरविला गेलेला दोन वर्षीय चिमुकला अखेर दिवाळीच्या दिवशी सुखरूप मिळाला, आणि त्या घरात दिवाळीच्या आनंद पणत्या पेटल्या. व्हॉट्सअपवरील माहितीच्या आधारे या हरविलेल्या चिमुकल्याचा शोध लागला.
धोतरखेडा येथील प्रेम संजू काकडे (२ वर्ष) हा आजीसोबत शुक्रवार, ६ नोव्हेंबर रोजी परतवाड्यातील गुजरी बाजारात आला होता. दरम्यान आजीच्या हातातून निसटला आणि गर्दीत दिसेनासा झाला. शोधूनही तो सापडला नव्हता.
प्रेमचे वडील संजू काकडे (रा. धोतरखेडा) यांनी धोतरखेड्याचे पोलीस पाटील सुरेश कोगदे यांच्या मदतीने परतवाडा पोलीस स्टेशनला माहिती दिली. पोलीस उपनिरीक्षक संजय गायकवाड, पोलीस शिपाई आशिष भुंते, पोलीस पाटील सुरेश कोगदे, प्रेमचे वडील संजू काकडेसह नातेवाईकांनी हरविलेल्या प्रेमचा मध्यप्रदेशसह लगतच्या परिसरात शोध घेतला. पण, आठ दिवसांपर्यंत त्याचा शोध लागला नव्हता.
दरम्यान सुरेश कोकदे यांनी पोलीस पाटलांच्या व्हॉट्सअप ग्रूपवर फोटोसह हरविलेल्या प्रेमची माहिती टाकली. पोलिसांनीही शोधपत्रक जारी केले. अखेर प्रेमची माहिती मिळाली आणि दिवाळी व बालकदिनी तो घरी पोहचता झाला. अचलपूर तालुक्यातील चंद्रभागा धरणालगतच्या भोपापूर येथून दिवाळीच्या दिवशी पालक व पोलीस पाटलांसह पोलिसांनी त्याला ताब्यात घेतले.
६ नोव्हेंबरला प्रेम नामक चिमुकला जैतादेही येथील एका महिलेला परतवाडा पोष्ट आॅफीस चिखलदरा स्टॉपवरील आॅटो स्टॉपवर सायंकाळी रडताना दिसला. त्याला त्या महिलेने घरी नेले. त्याचा सांभाळ करायला सुरुवात केली. ज्याचा असेल तो शोधत शोधत घ्यायला येईलच. या आशेवर असतानाच दारसिंभेचा साळा राजेश जामुनकर (रा. जैतादेही) याला ही माहिती मिळाली. त्या आधारे दरसिंभे याने त्या मुलाला आपल्या भोपापूर येथील मुलीकडे नेले. तेथून त्याची माहिती धोतरखेड्याला पोहचविली व हरवलेला प्रेम आपल्या आई-वडिलांकडे सुखरूप पोहचता झाला.
ऐन दिवाळीच्या तोंडावर मुलगा हरवल्याचे दु:ख शब्दापलीकडचे असतानाच दिवाळीच्या दिवशी तो सुखरूप घरी परतल्याचा आनंद कुटुंबीयांसाठी गगनभर ठरले.
हरवलेल्या मुलाला परतवाड्यातून आपल्या घरी नेताना किंवा निदान दुसऱ्या दिवशी तरी त्यांनी पोलिसांना माहिती द्यायला हवी होती. आठ दिवस गावपातळीवर पोलीस पाटील, सरपंच यांनाही माहिती दिली नाही, हे योग्य नाही. पण बालकदिनी त्याला सुखरुप त्याच्या पालकांच्या स्वाधीन करता आले. शेवट अखेर गोड झाला.
- सुरेश कोगदे,
पोलीस पाटील, धोतरखेडा, ता. अचलपूर.