तेरवी आटोपलेला १७ वर्षांनंतर सापडला ग्वाल्हेरला

By लोकमत न्यूज नेटवर्क | Published: February 22, 2022 07:47 PM2022-02-22T19:47:42+5:302022-02-22T19:50:08+5:30

Amravati News घरातून निघून गेलेला व्यक्ती आता या जगात नाही असे समजून घरच्यांनी त्याची तेरवी केली. मात्र तब्बल १७ वर्षांनी तो सापडला आणि घरी परतल्याची घटना अमरावती जिल्ह्यात घडली.

Lost Person found in Gwalior after 17 years | तेरवी आटोपलेला १७ वर्षांनंतर सापडला ग्वाल्हेरला

तेरवी आटोपलेला १७ वर्षांनंतर सापडला ग्वाल्हेरला

Next
ठळक मुद्देस्वयंसेवकांनी ३० नवलगावात घेतला नातेवाइकांचा शोध व्हॅलेंटाईन डेला आली जिवंत असल्याची माहिती

अमरावती : तालुक्यातील नवलगाव येथील रानू तान्या बेठेकर (५४) हा इसम २००५ साली घरून निघून गेला होता. तब्बल १२ वर्षे घरच्यांनी शोध घेतल्यानंतर तो न सापडल्याने २०१७ मध्ये त्याची घरी तेरवीही आटोपली. मात्र, सदर इसम हा मध्य प्रदेशात ग्वाल्हेर जिल्ह्यातील गुढागुढी येथे जिवंत असल्याचा निरोप आला आणि घरच्या लोकांचा आनंद गगनात मावेनासा झाला.

ग्वाल्हेर येथील स्वर्ग सदन या सामाजिक संस्थेचे संचालक विकास गोस्वामी यांना ५ जून २०२० रोजी रेल्वे स्टेशनवर रानू तान्या बेठेकर हा इसम आढळला. त्यावेळी ते त्याला आपल्या आश्रमात घेऊन गेले. तेव्हापासून तेथेच तो राहत होता. मनोरुग्णासारखे वर्तन असल्याने कोण, कुठला गावाचा, ही माहिती मिळत नव्हती. त्याच्यावर उपचार झाल्यानंतर घर, गाव, नातेवाईकांबद्दल तो विचारू लागला. तेव्हा इंटरनेटच्या माध्यमातून नवलगावासंदर्भात माहिती मिळविण्यात आली. सहा महिन्यांपासून सतत संस्थेचे अधिकारी, स्वयंसेवक ३० पेक्षा अधिक नवलगावात जाऊन आले आणि अखेर मेळघाटातील नवलगावात नातेवाईक आढळले.

व्हॅलेंटाईन डे ठरला गोड

रानू बेठेकर यांचा शोध घेत असताना विविध मोबाईल क्रमांकावर माहिती टाकण्यात आली. राहू येथे मोबाईल शॉपी चालविणारे संदीप घुमारे यांच्याकडे आलेली माहिती त्यांनी पंचायत समिती सदस्य नानाकराम ठाकरे यांना छायाचित्र आणि माहिती दिली आणि इथून जिवंत असल्याची आनंदाची बातमी मिळाली. अशाप्रकारे व्हॅलेंटाईन डे गोड झाला.

रात्रीतून बेपत्ता, १२ वर्षे शोध अन् बाप-लेकाची तेरवी

रानू बेठेकर शेती आणि मजुरीचे काम करीत होते. मानसिक संतुलन बिघडल्याने १७ वर्षांपूर्वी अचानक रात्री घरातून बेपत्ता झाले. घरात पत्नी, सहा वर्षाचा मुलगा, चार धाकटे भाऊ, तीन बहिणी असा त्यांचा परिवार गुण्यागोविंदाने नांदत होता. बारा वर्षे शोध घेतल्यानंतर त्यांच्यासह वडील तान्या बेठेकर यांची तेरवी परिजनांनी आटोपली.

मुलगा अपरिचित

रविवारी नातेवाइकांनी वर्गणी गोळा करून ग्वाल्हेर गाठले. मुलगा सुनील, भाऊ खानु, नानकराम ठाकरे, बाबू बेठेकर, जोगीलाल अखंडे, संदीप घुमारे, प्रज्वल येवले, गणेश बेठेकर आदींनी स्वर्ण सदन आश्रम गाठले. मुलगा सुनीलला त्यांनी ओळखले नाही. मात्र, भावासोबत कोरकूमध्ये संवाद साधला. सर्व सोपस्कार आटोपून सोमवारी रात्री त्यांना परत आणण्यात आले.

Web Title: Lost Person found in Gwalior after 17 years

Get Latest Marathi News , Maharashtra News and Live Marathi News Headlines from Politics, Sports, Entertainment, Business and hyperlocal news from all cities of Maharashtra.