आरटीई प्रवेश सोडतीत १९८० विद्यार्थ्यांना लॉटरी
By लोकमत न्यूज नेटवर्क | Published: April 16, 2021 04:12 AM2021-04-16T04:12:49+5:302021-04-16T04:12:49+5:30
अमरावती : आरटीई अंतर्गत प्रवेशपात्र विद्यार्थ्यांची यादी गुरुवार, १५ एप्रिल रोजी संकेतस्थळावर जाहीर करण्यात आली आहे. यात जिल्ह्यातील १,९८० ...
अमरावती : आरटीई अंतर्गत प्रवेशपात्र विद्यार्थ्यांची यादी गुरुवार, १५ एप्रिल रोजी संकेतस्थळावर जाहीर करण्यात आली आहे. यात जिल्ह्यातील १,९८० पाल्यांना प्रवेशाची लॉटरी लागली आहे. दरम्यान प्रवेशासंदर्भातील संदेश पालकांना नोंदणीकृत भ्रमणध्वनीवर एसएमएसने पाठविले जात आहेत.
बालकांचा मोफत व सक्तीच्या शिक्षणाचा अधिकार अधिनियम तरतुदीनुसार २०२१-२२ या शैक्षणिक वर्षातील प्रवेशासाठी राज्याच्या प्राथमिक शिक्षण संचालकांच्या आदेशानुसार जिल्ह्यातील २४४ शाळांनी नोंदणी केली. या शाळांमध्ये २ हजार ७६ रिक्त जागा आहेत. या रिक्त जागांसाठी जिल्हाभरातून सुमारे ५ हजार ९१८ पालकांनी आपल्या पाल्याच्या प्रवेशासाठी आरटीई पोर्टलवर ऑनलाईन अर्ज सादर केले आहेत. यानुसार आरटीई प्रवेशासाठी गत ७ एप्रिल रोजी पूणे येथे राज्यस्तरावर ऑनलाईन सोडत काढण्यात आली आहे. या सोडतीत प्रवेशासपात्र ठरलेल्या पाल्यांची निवड यादी गुरुवार, १५ एप्रिल रोजी जाहीर करण्यात आली आहे. यात जिल्ह्यातील १,९८० विद्यार्थ्यांना प्रवेशासाठीची लॉटरी लागली आहे. यानुसार प्रवेशासपात्र ठरलेल्या पाल्यांच्या अर्जात नोंदणी केलेल्या भ्रमणध्वनीवर एसएमएस पाठविले जात आहे. ज्या पालकांना प्रवेशाबाबतचे एसएमएस येतील अशा पाल्यांना आरटीईनुसार २५ टक्के रिक्त जागांवर प्रवेश दिला जाणार आहे. प्रवेशाबाबतची विस्तृत माहिती आरटीईच्या संकेतस्थळावर जाहीर केली जात असल्याचे प्राथमिक शिक्षण विभागाच्या अधिकाऱ्यांनी सांगितले.
बॉक्स
प्रवेशासाठी ही कागदपत्रे आवश्यक
प्रवेशासाठी रहिवासी पुरावा, जन्माचा दाखला, उत्पन्नाचा दाखला, जातीचा दाखला तसेच विद्यार्थी अपंग असल्यास जिल्हा शल्यचिकित्सक वैद्यकीय अधीक्षक अधिसूचित जिल्हा शासकीय रुग्णालयाचे ४० टक्क्यांपेक्षा अधिक अपंगत्व असल्याचे प्रमाणपत्र आवश्यक आहे. शासनाच्या संकेतस्थळावर याबाबत सविस्तर माहिती उपलब्ध करून देण्यात आली आहे.
कोट
प्रवेशपात्र विद्यार्थ्यांची यादी गुरुवारी संकेतस्थळावर उपलब्ध झाली आहे. कोरोना विषाणूच्या पार्श्वभूमीवर दिलेल्या सूचनेप्रमाणे प्रवेशाबाबत शिक्षण विभागामार्फत वरिष्ठ स्तरावरून प्राप्त सूचनेप्रमाणे कारवाई केली जाईल.
- ई.झेड खान,
शिक्षणाधिकारी प्राथमिक