क्रीडा संकुलाचे प्रवेशद्वार ठरले प्रेमीयुगुलांचा अड्डा
By admin | Published: January 6, 2016 12:09 AM2016-01-06T00:09:49+5:302016-01-06T00:09:49+5:30
येथील विभागीय क्रीडा संकुलाचे कुलूपबंद प्रवेशद्वार व त्या लगतचा परिसर प्रेमीयुगुलांचा अड्डा ठरला आहे.
पोलिसांचे भय कुठे ? : अंधाराचा फायदा घेऊन राहतात तासन्तास उभे
संदीप मानकर अमरावती
येथील विभागीय क्रीडा संकुलाचे कुलूपबंद प्रवेशद्वार व त्या लगतचा परिसर प्रेमीयुगुलांचा अड्डा ठरला आहे. अंधाराचा गैरफायदा घेऊन दुचाकी आडव्या लावून हे प्रेमीयुगुल येथे तासन्तास काढतात. काही प्रेमीयुगुल तर येथे अश्लिल चाळे करतांना निदर्शनास येतात.
येथे दुचाकी लावली की, जणू काही आपलीच दुनियाच वेगळी आहे, असे त्यांना वाटते. पण हा प्रकार पाहतांना प्रतिष्ठित नागरिकांना त्रास होतो. या प्रेमीयुगुलांमध्ये शाळेचे विद्यार्थी व महाविद्यालायीन विद्यार्थ्यांचा समावेश मोठ्या प्रमाणात असतो. रात्री ६ वाजतापासून रात्री ११ वाजेपर्यंत हा प्रकार सुरु असतो. हा भाग गाडगेनगर पोलिस स्टेशन अंतर्गत येतो. पण कधीही पोलिस त्यांना हटकण्याची तसदी घेत नाहीत.
येथील विभागीय क्रीडा संकुलाच्या बंद असलेल्या प्रवेशद्वाराजवळ खुलेआम प्रेमीयुगुलांनी आपल्या प्रियकर, प्रेयसीला भेटण्याचा अड्डा केला आहे. की मैत्रीच्या नात्याने हे विद्यार्थी येथे एकत्र येतात, हे कळायला मार्ग नाही. पण संकुलच्या चौकीदाराने अशा विद्यार्थ्यांना नेहमीच हटकले तर हा प्रकार बंद होऊ शकतो. उल्लेखनीय म्हणजे, पाठीला कॉलेज बॅग लटकवून अनेक मुली आपल्या समवयस्क मित्रांसमवेत येथे खिदळताना दिसतात. त्यामुळे त्यांच्या पालकांनीही याकडे लक्ष देण्याची गरज आहे.
तोंडाला दुपट्टा बांधून राहतात उभे
विशेषत: मुली दुपट्टा बांधून येथे उभ्या राहतात. त्यांचे पालक जरी या परिसरात आले तर त्यांनाही आपला पाल्य ओळखू येत नाही. या ठिकाणी अंधाराचा गैरफायदा घेऊन प्रेमीयुगुल नको ते प्रकार करतात. येथे या युगुलांना अन्य ठिकाणाच्या तुलनेत एकांत मिळत असल्याने आणि त्यांना कुणी हटकण्याची तसदीही न घेत असल्याने त्यांचे फावले आहे.
पालकांनो, मुलांना सांभाळा
शिकवणी वर्ग किंवा तत्सम कामानिमित्त मुले-मुली घराबाहेर पडतात. पण आपला पाल्य नेमका शिकवणी वर्गा गेला की अन्य कुठे ? याची विचारणा करण्याची तसदी पालकांनी घ्यावी, तसे झाल्यास त्या मुला-मुलींवर अंकुश ठेवता येईल.
अल्पवयीन मुले व विद्यार्थी या ठिकाणी ग्रुपने उभे राहत असतील व सार्वजनिक ठिकाणी काही अश्लील प्रकार घडत असेल तर महिला पोलिसांचे पथक पाठवून त्यांना समज देण्यात येईल.
- चेतना तिडके, सहायक पोलीस आयुक्त.