प्रेमासाठी ती झारखंडहून आली महाराष्ट्रात, फेसबुकवरून जुळले प्रेमसूत
By ऑनलाइन लोकमत | Published: March 10, 2018 08:42 PM2018-03-10T20:42:03+5:302018-03-10T20:42:03+5:30
फेसबुकवरून झालेली ओळख प्रेमात बदलली आणि ती झारखंड राज्यातील अमरकंठक गावाहून महाराष्ट्रात पोहोचली.
बडनेरा : फेसबुकवरून झालेली ओळख प्रेमात बदलली आणि ती झारखंड राज्यातील अमरकंठक गावाहून महाराष्ट्रात पोहोचली. मात्र, रेल्वेत प्रवाशासोबत झालेल्या वादानंतर तिच्या प्रेमकथेचा भंडाफोड झाला. शनिवारी पहाटे हटीया एक्सप्रेसमध्ये घडलेल्या या घटनेत बडनेरा जीआरपीएफने त्या तरुणीला ताब्यात घेतले.
झारखंडच्या अमरकंठक गावातील एका मुलीची महाराष्ट्रातील नंदूरबार येथील विशिष्ट समुदयातील मुलाशी ओळख झाली. फेसबुकवर मैत्रीपूर्ण संबंध प्रस्थापित झाल्यामुळे चार वर्षांपासून ते फेसबुकवर संदेशाद्वारे संवाद साधत होते. त्यांनी एकमेकांना भेटण्याची इच्छा दर्शविली. त्या तरुणाने मुलीला नंदूरबारला येण्यास सांगितले. त्यानुसार ती मुलगी हटीया एक्सप्रेसने निघाली. शनिवारी पहाटे ३ वाजताच्या सुमारास रेल्वेच्या गेटजवळ ती उभी होती. ही बाब काही वेगळी वाटल्याने एका प्रवाशाने त्या मुलीला हटकले. त्यावेळी तिने प्रेमकहाणी कथन केली. हे सांगताना तिचे अश्रू अनावर झाले आणि तिने परक्या प्रवाशाच्या खांद्यावर डोके ठेवून रडण्यास सुरुवात केली. हा प्रकार त्या परक्या प्रवाशाच्या पत्नीने पाहिला. आपल्या पतीच्या खांद्यावर रडणारी ती तरूणी कोण, ही बाब जाणून घेण्यासाठी ती महिला गेली असता, पती-पत्नीत शाब्दिक वाद झाला. पती,पत्नी व त्या मुलीचा वाद विकोपाला गेल्यानंतर त्या व्यक्तीने त्या मुलीसह पत्नीला मारहाण केली. दरम्यान हा गोंधळ बडनेरा रेल्वे पोलिसांना कळला. पोलिसांनी त्या मुलीला ताब्यात घेऊन चौकशी केली असता प्रेमप्रकरणाचा विषय पुढे आला. तिच्या प्रियकराशी पोलिसांनी संपर्क केला व मुलीच्या कुटुंबीयांना ठाण्यात येण्यासाठी निरोप दिला. शनिवारी दुपारपर्यंत त्या मुलीवर प्रेम करणारा तो तरुण दोन वकिलांना घेऊन ठाण्यात पोहोचला. उशिरा रात्रीपर्यंत पोलिसांनी चोकशी केली. मात्र, मुलीचे नातेवाईक बडनेरा रेल्वे पोलिसांपर्यंत पोहोचले नव्हते.