नंदनवनात सर्वांत कमी पाऊस
By लोकमत न्यूज नेटवर्क | Published: July 13, 2018 10:55 PM2018-07-13T22:55:54+5:302018-07-13T22:56:21+5:30
लोकमत न्यूज नेटवर्क
अमरावती : आठवड्यात जिल्ह्यात सार्वत्रिक पाऊस होत असताना विदर्भाचे नंदनवन म्हणून ओळखल्या जाणाऱ्या चिखलदऱ्यात मात्र पाऊस माघारला. सद्यस्थितीत जिल्ह्यात चिखलदरा वगळता उर्वरित १३ तालुक्यांनी पावसाची सरासरी पार केली. यामध्ये सर्वांत जास्त २०२ टक्के पाऊस नांदगाव खंडेश्वर तालुक्यात पडला, तर सर्वांत कमी ८३ टक्के पाऊस चिखलदरा तालुक्यात पडला.
जिल्ह्यात १ जून ते १३ जुलै या कालावधीत २६१.९ मिमी पावसाची सरासरी अपेक्षित असताना प्रत्यक्षात ३३४.४ मिमी पाऊस पडला. ही १२७.७ टक्के सरासरी आहे, तर वार्षिक पर्जन्यमानाच्या तुलनेत ४१.१ टक्के आहे. मागील वर्षी याच दिनांकाला फक्त १४० मिमी पावसाची नोंद झाली होती. त्या तुलनेत यंदा १९६ मिमी पाऊस जास्त आहे. सद्यस्थितीत यंदा अमरावती तालुक्यात ३१४ मिमी, भातकुली २७८, नांदगाव खंडेश्वर ५०६, चांदूर रेल्वे ४२२.५, धामणगाव रेल्वे ३३५.५, तिवसा ३००.२, मोर्शी २८७.३, वरुड ३१७.७, अचलपूर २९४.९, चांदूर बाजार २९३.१, दर्यापूर ३३२.५, अंजनगाव सुर्जी २८१.६, धारणी ३६५.५, तर चिखलदरा तालुक्यात ३५२.७ मिमी पाऊस कोसळला.
विदर्भाचे नंदनवन म्हणून ओळखले जाणाऱ्या चिखलदरा तालुक्यात आतापर्यंत ४२६ मिमी पावसाची सरासरी अपेक्षित असताना, फक्त ३५२.७ मिमी पावसाची नोंद झाली. जिल्ह्यात सर्वच तालुक्यात पावसाची सरासरी पार झालेली असताना, या नंदनवनात मात्र अपेक्षित पावसाच्या ८३ टक्केच पाऊस पडला. किंबहुना जिल्ह्यात सरासरीच्या तुलनेत सर्वांत शेवटच्या म्हणजेच चौदाव्या स्थानी चिखलदरा आहे. अलीकडच्या पाच वर्षांत चिखलदरा पावसात माघारत असल्याची बाब चिंताजनक आहे. मेळघाटच्या या पर्वतराजीमध्ये पावसाने सर्वत्र हिरवळ असली तरी नैसर्गिक वाहणाऱ्या खळाळत्या पाण्यासाठी मात्र पर्यटकांना काही काळ वाट पाहावी लागणार आहे.
१३ तालुक्यांची सरासरी पार
जिल्ह्यात सद्यस्थितीत १२८ टक्के पाऊस पडला असला तरी चिखलदरा वगळता उर्वरित १३ तालुक्यांनी पावसाची सरासरी पार केली आहे. यामध्ये अमरावती तालुक्यात १३२.८ टक्के, भातकुली ११०.८, नांदगाव खंडेश्वर २०२, चांदूर रेल्वे १७०, धामणगाव रेल्वे १३६, तिवसा १२२, मोर्शी १११, वरूड १०७, अचलपूर १२४, चांदूर बाजार १२७, दर्यापूर १५०, अंजनगाव सुर्जी १४७, धारणी ११३ टक्के, तर चिखलदरा तालुक्यात फक्त ८३ टक्के पाऊस पडला
आठवडाभर सार्वत्रिक पावसाची शक्यता
वायव्य बंगालच्या उपसागरात कमी दाबाचे क्षेत्र निर्माण झाले असून, गुजरात, छत्तिसगड व ओरिसाच्या उत्तर किनाºयावर चक्राकार वारे कायम आहेत. त्यामुळे विदर्भात १७ जुलैपर्यंत हलका ते मध्यम पावसाची शक्यता आहे. यामध्ये काही ठिकाणी मुसळधार पाऊस कोसळू शकतो. १८ ते २० जुलै बहुतेक ठिकाणी हलका ते भारी पाऊस तुरळक ठिकाणी मुसळधार पाऊस पडण्याची शक्यता आहे. पावसाची ही स्थिती एक आठवडाभर अशीच राहणार असल्याचे श्री शिवाजी कृषी महाविद्यालयाचे हवामानतज्ज्ञ अनिल बंड यांनी सांगितले.