धारणी तालुक्यात सर्वांत कमी पावसाची नोंद
By लोकमत न्यूज नेटवर्क | Published: September 10, 2021 04:18 AM2021-09-10T04:18:13+5:302021-09-10T04:18:13+5:30
धारणी पंकज लायदे धारणी : मेळघाटातील धारणी तालुक्यात दरवर्षीपेक्षा यावर्षी सर्वात कमी पाऊस झाला आहे. जून ते सप्टेंबर महिन्यात ...
धारणी पंकज लायदे
धारणी : मेळघाटातील धारणी तालुक्यात दरवर्षीपेक्षा यावर्षी सर्वात कमी पाऊस झाला आहे. जून ते सप्टेंबर महिन्यात आजपर्यंत फक्त ६५८.८ मिलिमीटर पावसाची नोंद कृषी विभागाकडे घेण्यात आली. परिसरातील नदी-नाले तलाव अद्यापही दुथडी भरून वाहिले नसल्याने शेतकऱ्यांपुढे सिंचनाचा बिकट प्रश्न उभा ठाकला आहे.
मेळघाटातील धारणी तालुका हा सातपुड्याच्या पायथ्याशी वसलेला असून घनदाट जंगल व स्वच्छ पर्यावरण असूनही पावसाची कमतरता जाणवली आहे. पाच कृषी मंडळांच्या आकडेवारीनुसार, तालुक्यात फक्त ६५८.८ मिलिमीटर पाऊस कोसळला. त्यामध्ये धारणी, हरिसाल, धूळघाट, सावलीखेडा, साद्राबाडी या पाच कृषी मंडळांचा समावेश आहे.गेल्या २४ तासांत या मंडळांमध्ये अनुक्रमे ८.३, ५.५, ८.५, ६.५, १५.५ मिलिमीटर पाऊस कोसळला. धारणी तालुक्यात ८.९ व चिखलदरा तालुक्यात ६.३ मिमी पावसाची नोंद झाली आहे. या भागात वाहणाऱ्या नदी-नाल्यांना फक्त एकदाच पूर आला आहे, तर परिसरातील तलाव, शेतविहिरी, शेततळे अद्यापही पुरेसे भरले नसून, त्यातील पाण्याची पातळी खालीच आहे. तालुक्यातील आदिवासी बांधवांसमोर पाण्याचा बिकट प्रश्न उभा ठाकला आहे. तीन वर्षांपासून तालुक्यात पावसाची कमतरता जाणवत असल्याने यावर्षीसुद्धा तशीच परिस्थिती निर्माण होणार असल्याचे दिसून येत आहे.
तालुक्यातील मुख्य नद्या अद्यापही कोरड्याच
तालुक्यात तापी, गडगा, सिपना या मोठ्या नद्या आहेत. या नद्यांना प्रत्येक पावसाळ्यात अतिपावसामुळे चार ते पाच वेळा पूर येऊन जातो. त्यामुळे परिसरातील गावाचा संपर्कसुद्धा तुटते. यावर्षी आजपर्यंत फक्त एकदाच नद्यांना पूर आला आहे. तेसुद्धा चिखलदरा तालुक्यातून गत महिन्यात झालेल्या अतिवृष्टीच्या पावसाचे असल्याचे बोलले जात आहे. तापी, सिपना, गडगा नदीत मध्यभागातून मोजकेच पाणी वाहत आहे. कोणतीही नदी भर पावसाळ्यात दुथडी भरून वाहत नसल्याचे चित्र समोर दिसून येत आहे.