कोरोनानंतर लम्पीची लसही पुण्यात तयार होणार, जनावरांचे नमुने पाठविले बंगळूरला

By जितेंद्र दखने | Published: April 26, 2023 05:37 PM2023-04-26T17:37:22+5:302023-04-26T17:37:42+5:30

अमरावती जिल्ह्यात ५ तालुक्यातून गोळा केले ३५ नमुने

Lumpy vaccine will also be prepared in Pune after Corona, animal samples sent to Bangalore | कोरोनानंतर लम्पीची लसही पुण्यात तयार होणार, जनावरांचे नमुने पाठविले बंगळूरला

कोरोनानंतर लम्पीची लसही पुण्यात तयार होणार, जनावरांचे नमुने पाठविले बंगळूरला

googlenewsNext

अमरावती : राज्यात गत काही महिन्यांपूर्वी जनावरांवर आलेल्या लम्पी प्रादुर्भाव प्रादुर्भावामुळे शेकडो मुक्या जनावरांचे बळी गेले होते. मात्र, आता राज्य सरकारने लम्पी लस तयार करण्यासाठी पुढाकार घेतला असून, कोरोनानंतर लम्पीची लसही पुण्यात तयार होणार होणार आहे. त्याअनुषंगाने लम्पीग्रस्त जनावरांचे नमुने बंगळूर येथील प्रयोगशाळेत तपासणीकरिता पाठविण्यात आले आहे. त्यामुळे देशात लम्पी लस तयार करणारे महाराष्ट्र राज्य पहिले ठरणार आहे.

जनावरांना लम्पी स्किनचा प्रादुर्भाव झालेल्या जिल्ह्यांतील जनावरांचे नमुने गोळा करण्यात येत आहेत. त्यानुसार अमरावती जिल्ह्यातील १४ पैकी ५ तालुक्यामधून ३५ लम्पीग्रस्त जनावरांचे नमुने पशुसंवर्धन विभागाने गोळा केले आहेत. पशुसंवर्धन आयुक्तालयामार्फत आता गोळा केलेल्या नमुन्यांवर बंगळुरू येथील प्रयोगशाळेत अभ्यास केला जाणार आहे. त्यानंतर जनावरांना लम्पीची लस देण्याबाबतचा निर्णय घेतला जाणार आहे. जिल्ह्यातील ५ तालुक्यांमधून नमुने गोळा करण्याचे काम पशुसंवर्धन विभागाकडून अलीकडेच पूर्ण केले आहे.

ऑगस्ट २०२२ मध्ये लम्पी प्रादुर्भाव वाढला होता. लम्पी संपला म्हणत असतानाच पुन्हा काही जिल्ह्यात जनावरांना लम्पीची लागण झाल्याचे समोर आले. त्यामुळे पुन्हा लम्पी स्किनचा प्रादुर्भाव होण्याची शक्यता नाकारता येत नाही, असे तज्ज्ञ सांगतात. जिल्ह्यातील अमरावती, भातकुली, दर्यापूर, तिवसा, आणि चांदूर रेल्वे या पाच तालुक्यांमधून नमुने गोळा करण्यात आले आहेत.

प्रत्येक तालुक्यातून टप्प्याटप्प्याने ३५ नमुने गोळा करण्यात आले आहेत. अमरावती जिल्ह्यात २६ ऑगस्ट रोजी लम्पी स्किन आजाराचे पहिले जनावर सापडले होते. तेव्हापासून ३१ डिसेंबर २०२२ दरम्यान ३९ हजार जनावरे या आजाराने बाधित झाली होती. त्यापैकी २७७५ जनावरे या आजाराने दगावली आहेत. तर ३६ हजार २२५ जनावरे ही या आजारातून पूर्णपणे बरी झाली.

पुण्यात तयार होणार लस

गतवर्षी लप्मीचा प्रादुर्भाव वाढल्यानंतर पशुसंवर्धन विभागामार्फत जनावरांना गोटपॉक्स लस देण्यात आली होती. विषाणूजन्य आजारावर उपचारासाठी या लसीचा वापर होतो. ही लस लम्पी आजारावर उपचार करण्यासाठी पशुसंवर्धन विभागाला खरेदी करावी लागली होती. आता पुण्यामध्येच लम्पीची लस तयार होणार आहे. पुण्यातील पशुवैद्यकीय जैव पदार्थ निर्मित संस्थेकडून (आयव्हीबीपी) लम्पी प्रतिबंधक लसींचे उत्पादन केले जाणार असल्याचे पशुसंवर्धन विभागाचे उपायुक्त डॉ. संजय कावरे यांनी ‘लोकमत’शी बोलताना सांगितले.

Web Title: Lumpy vaccine will also be prepared in Pune after Corona, animal samples sent to Bangalore

Get Latest Marathi News , Maharashtra News and Live Marathi News Headlines from Politics, Sports, Entertainment, Business and hyperlocal news from all cities of Maharashtra.