१७ जुलै रोजी खंडग्रास चंद्रग्रहण
By लोकमत न्यूज नेटवर्क | Published: July 13, 2019 12:47 PM2019-07-13T12:47:43+5:302019-07-13T12:51:50+5:30
पुढील आठवड्यात बुधवार, १६ जुलै रोजी रात्री १.३२ मिनिटांनी खंडग्रास चंद्रग्रहणाचा योग आहे. ग्रहणास सुरुवात होऊन ३.०१ वाजता ग्रहण मध्य व ४.३० वाजता ग्रहणमोक्ष होणार आहे.
लोकमत न्यूज नेटवर्क
अमरावती : पुढील आठवड्यात बुधवार, १६ जुलै रोजी रात्री १.३२ मिनिटांनी खंडग्रास चंद्रग्रहणाचा योग आहे. ग्रहणास सुरुवात होऊन ३.०१ वाजता ग्रहण मध्य व ४.३० वाजता ग्रहणमोक्ष होणार आहे. एकूण २.५८ मिनिटांचा ग्रहण कालावधी राहणार असून, ही एक खगोलीय घटना आहे. आकाश निरभ्र असल्यास अवलोकता येणार असल्याची माहिती मराठी विज्ञान परिषदेने दिली.
अवकाशात पृथ्वी चंद्राभोवती व चंद्र पृथ्वीभोवती फिरत असतो. त्यामुळे पृथ्वी, सूर्य व चंद्र कधीतरी एका रेषेत येतात. त्यावेळी पृथ्वीची सावली चंद्रावर पडते. या घटनेला चंद्रग्रहण म्हणतात. सूर्यप्रकाशामुळे पृथ्वीची सावली नेहमीच पडते. परंतु इतर वेळी ती अवकाशात पडत असल्याने दिसत नाही. परंतु चंद्र जेव्हा सरळ रेषेत येतो तेव्हा चंद्राची पार्श्वभूमी मिळाल्याने पृथ्वीची सावली आपल्याला चंद्रावर दिसून येते. चंद्रग्रहण हे नेहमी पौर्णिमेलाच होत असते. परंतु प्रत्येक पौर्णिमेला होत नाही. याचे कारण म्हणजे चंद्र व पृथ्वी सरळ रेषेत नसतात. चंद्रावर पृथ्वीची सावली पडल्याने वातावरण कोणत्याही प्रकारे दूषित होत नाही किंवा मानवी जीवनावर त्याचा कोणताही शुभाशूभ परिणाम होत नाही. हे अभ्यासाअंती सिद्ध झाले आहे. यावेळी हे खंडग्रास चंद्रग्रहण संपूर्ण भारतासह मध्य आशिया, आफ्रिका, युरोप व अरबी समुद्रातून दिसणार आहे. आपण ज्या ग्रहावर राहतो त्या ग्रहाची सावली पाहण्याचा योग चंद्रग्रहणात येतो.
चंद्रग्रहण ही एक खगोलीय घटना आहे. हे पाहण्यासाठी कोणत्याही साधनांची आवश्यकता नाही. सर्व गैरसमज झुगारून नागरिकांनी आकाश निरभ्र असल्यास आस्वाद घ्यावा
- रवींद्र खराबे,
खगोलशास्त्र शाखा प्रमुख, मविप, अमरावती