वाघाची डरकाळी अन् रातकिड्यांची किरकिर; लख्ख चंद्रप्रकाशात पर्यटकांनी लुटला निसर्गानुभवाचा आनंद
By लोकमत न्यूज नेटवर्क | Published: May 19, 2022 02:13 PM2022-05-19T14:13:49+5:302022-05-19T14:29:32+5:30
बुद्ध पौर्णिमेच्या लख्ख प्रकाशात घनदाट वनातील ४५६ मचानीवर रात्रभर बसून पाणवठ्यावर येणाऱ्या वन्यप्राण्यांच्या निरीक्षणाचा रोमांचकारी अनुभव निसर्गप्रेमींनी मनमुरादपणे लुटला.
परतवाडा (अमरावती) : वनातील रात्रीच्या निरामय शांततेत वाघाची डरकाळी, प्राण्यांचे आवाज, रातकिड्यांची किरकिर, हवेची झुळुक यांचा अनुभव आणि पाणी पिण्यासाठी पाणवठ्यावर येणाऱ्या प्राण्यांचे प्रत्यक्ष दर्शन निसर्गप्रेमींनी बुद्ध पौर्णिमेच्या लख्ख प्रकाशात घेतले. वाघ, बिबट, अस्वल, रानगवा, चितळ, सांबर, नीलगाय, उदमांजर आदी प्राणी प्रत्यक्षात बघायला मिळाले. मात्र, पहिल्यांदा व्याघ्र प्रकल्पातर्फे वाघासह किती प्राणी दिसले, याला फाटा देण्यात आला.
बुद्ध पौर्णिमेच्या लख्ख प्रकाशात घनदाट वनातील ४५६ मचानीवर रात्रभर बसून पाणवठ्यावर येणाऱ्या वन्यप्राण्यांच्या निरीक्षणाचा रोमांचकारी अनुभव निसर्गप्रेमींनी मनमुरादपणे लुटला. पूर्वी या उपक्रमाला प्राणी गणना असे म्हटले जात होते; परंतु शास्त्रशुद्ध पद्धतीच्या प्रणालीचा अभ्यास करण्याचे तंत्र वन्यप्राण्यांच्या गणनेकरिता आल्यानंतर राष्ट्रीय व्याघ्र संवर्धन प्रतिष्ठान यांनी मचानीवर प्राणी गणनेचे रूपांतर निसर्ग अनुभव या जनजागृतीपर उपक्रमामध्ये केले.
मेळघाट व्याघ्र प्रकल्पांतर्गत सिपना (१०५), अकोट (७५), गुगामल (१२८), मेळघाट वन्यजीव (३२), तर अकोला (६३) व पांढरकवडा (५३) या सर्व वन्यजीव विभागांमध्ये निसर्गप्रेमींनी व पर्यावरण व वन्यजीव संवर्धन क्षेत्रात कार्य करणाऱ्या स्वयंसेवी संस्थांनी ऑनलाइन पद्धतीने मचान आरक्षित केले होते. राज्यासह मध्य प्रदेशातील निसर्ग-वन्यजीवप्रेमींसह व्याघ्र प्रकल्पाच्या कर्मचाऱ्यांनी यात सहभाग घेतला.
मेळघाट व्याघ्र प्रकल्पाच्या संचालक ज्योती बॅनर्जी, अकोट डीएफओ नवकीशोर रेड्डी, गुगामलचे सुमंत सोळंखे, सिपना वन्यजीवच्या दिव्या भारती, पांढरकवडा विभागीय वनअधिकारी किरण जगताप, अकोला विभागीय वनअधिकारी तथा पर्यटन व्यवस्थापक स्वप्नील बांगडे, पर्यटन व्यवस्थापक व वनपरिक्षेत्र अधिकारी योगेश तापस यांनी अथक परिश्रम घेतले.
नशिबी कुणाच्या वाघोबा, कुठे उदमांजर
बुद्ध पौर्णिमेला निसर्ग अनुभव असा बदल करण्यात आल्याने व्याघ्र प्रकल्पातर्फे पहिल्यांदा निसर्गप्रेमींनी नोंदी केलेल्या वन्यप्राण्यांची आकडेवारी दिली गेली नाही. कुणाच्या नशिबी वाघोबा आणि कुठे उदमांजर, असा अनुभव निसर्गप्रेमींना आला; परंतु आकडेवारी कोणत्या प्राण्याची किती, हे मात्र गुलदस्त्यात राहिले. प्रत्यक्षात बारा वाघ आणि तीन छावे दिसल्याची माहिती ‘लोकमत’ने बुधवारी प्रकाशित केली होती. तीच खरी असल्याचे विश्वसनीय सूत्रांचे म्हणणे आहे.