बांधकाम विभागाची मदार शाखा अभियंत्यावर
By लोकमत न्यूज नेटवर्क | Published: June 24, 2021 04:10 AM2021-06-24T04:10:34+5:302021-06-24T04:10:34+5:30
अमरावती : जिल्हा परिषदेत महत्त्वाचा विभाग म्हणून ओळखला जाणाऱ्या बांधकाम विभागातील कार्यकारी अभियंता या पदासह सात उपविभागापैकी अचलपूर उपविभागाचा ...
अमरावती : जिल्हा परिषदेत महत्त्वाचा विभाग म्हणून ओळखला जाणाऱ्या बांधकाम विभागातील कार्यकारी अभियंता या पदासह सात उपविभागापैकी अचलपूर उपविभागाचा अपवाद वगळला तर सर्व जबाबदारी शाखा अभियंत्यावर आहे. त्यामुळे रिक्त पदाचे ग्रहण केव्हा सुटणार, हा खरा प्रश्न आहे.
जिल्हा परिषदेच्या बांधकाम विभागाचे कार्यकारी अभियंता पद हे काही वर्षांपासून रिक्त आहे. त्यामुळे या पदाचा अतिरिक्त प्रभार अचलपूरच्या उपअभियंता यांच्याकडे साेपविला आहे. याशिवाय जिल्हा परिषद बांधकाम विभागाचे १४ तालुके मिळून ७ उपविभाग आहेत. यापैकी अचलपूरचा अपवाद वगळता सहा उपविभागाचा कारभार शाखा अभियंत्यांच्या भरोवशावर सुरू आहे. यात मोर्शी, दर्यापूर, धारणी, चांदूर रेल्वे, अमरावती उपविभाग क्र. १ आणि अमरावती उपविभाग क्र. २ या उपविभागाचे कामकाज शाखा अभियंता सांभाळत आहेत. ग्राम विकासाच्या कामाची सर्वाधिक जबाबदारी असलेल्या बांधकाम विभागातील गत काही वर्षांपासून अनेक महत्वाची पदे रिक्त आहेत. ही पदे अद्यापही शासनाकडून भरण्यात आलेली नाही. परिणामी कार्यकारी अभियंता, उपअभियंता पदाची अतिरिक्त जबाबदारी शाखा अभियंत्यांकडे देऊन बांधकाम विभागाचे कामकाज केले जात आहे. बांधकाम विभागात रिक्त पदे असल्यामुळे विकासकामे करताना विविध अडचणींचा सामना करावा लागत आहे. परिणामी प्रशासकीय कामकाजासह कामे विहित मुदतीत मार्गी लागण्यासाठी रिक्त पदाचा अनुशेष भरून काढणे आवश्यक आहे.