'मेड इन इंडिया' कादंबरीफेम साहित्यिक पुरुषोत्तम बोरकर यांचे निधन
By ऑनलाइन लोकमत | Published: July 17, 2019 10:55 PM2019-07-17T22:55:26+5:302019-07-17T22:55:59+5:30
खामगाव येथे संपन्न झालेल्या राज्यस्तरीय युवा साहित्य संमेलनात त्यांनी पूर्णवेळ उपस्थिती दर्शविली होती.
खामगाव : ‘होबासक्या’तून वऱ्हाडी भाषा समृध्द करणारे, मेड इन इंडीया या अजरामर वऱ्हाडी कादंबरीचे लेखक पुरुषोत्तम बोरकर यांचे बुधवारी १७ जुलैरोजी संध्याकाळी निधन झाले. गेल्या काही वर्षांपासून ते खामगाव वास्तव्यास होते. त्यांच्यावर १८ जुलै गुरुवारी सकाळी १० वाजता सुटाळा (खामगाव) येथे अंत्यसंस्कार करण्यात येतील. त्यांच्या पत्नीचे काही वर्षं अगोदर निधन झाले होते. तेव्हापासून पुरुषोत्तम बोरकर आपल्या मुलासोबत खामगाव सुटाळा येथे राहत होते.
खामगाव येथे संपन्न झालेल्या राज्यस्तरीय युवा साहित्य संमेलनात त्यांनी पूर्णवेळ उपस्थिती दर्शविली होती. वऱ्हाडी भाषेच्या संवर्धनासाठी त्यांचे योगदान कायम लक्षात राहील. पुरुषोत्तम बोरकर यांना विविध पुरस्काराने सन्मानित करण्यात आले आहे. श्रीमती शांता शेळके पुरस्कृत कै. ल. मो. प्रभुणे पुरस्कार १९८७ हा ज्येष्ठ साहित्यीक पु. ल. देशपांडे यांच्याहस्ते मिळाला आहे. अमरावती येथे पार पडलेल्या अखिल भारतीय साहित्य संमेलनात त्यांना कै. बा.सी. मर्ढेकर पुरस्कार १९८८ मध्ये प्रा. के.ज. पुरोहीत यांच्याहस्ते प्राप्त झाला आहे. याशिवाय महाराष्ट्र शासनाचा १९८८-८९ चा पुरस्कार ‘मेड इन इंडिया’ या कादंबरीला तत्कालीन मुख्यमंत्री शरद पवार यांच्याहस्ते प्राप्त झाला आहे. याशिवाय कौशिक साहित्य पुरस्कार, युवा शांतीदूत प्रतिष्ठानतर्फे दिला जाणारा महाराष्ट्र समाजभुषण पुरस्काराने त्यांना सन्मानित करण्यात आले आहे. अमरावती विद्यापीठच नव्हेतर यशवंतराव चव्हाण मुक्त विद्यापीठाअंतर्गत विविध अभ्यासक्रमात त्यांचे साहित्य अभ्यासाला आहे.
‘मेड इन इंडिया’ ही कादंबरी, होबासक्या उर्फ बांड्या पंचायती ही विनोदी लघुकथा, आमार निवास रुम नं. १७५६ ही कादंबरी, १५ ऑगस्ट भागिले २६ जानेवारी ही कादंबरी, माजी राष्ट्रपती प्रतिभाताई पाटील व डॉ. शेखावत यांच्या जीवनचरित्रावर इंद्रपुरीचा राणा हा चरित्रग्रंथ, डॉ. विठ्ठल जाधव (आयपीएस) ‘विठ्ठल झालासे कळस’ या चरित्रासह ४९ वेगवेगळ््या प्रकारची पुस्तके त्यांनी लिहली आहेत. वऱ्हाडी भाषा, वऱ्हाडी माणूस वऱ्हाडी माती पुरुषोत्तम बोरकरांच्या कायम ऋणात राहतील.