मदरशाची झडती, पीडितेच्या मैत्रिणींचे नोंदविले बयाण
By लोकमत न्यूज नेटवर्क | Published: November 6, 2019 06:00 AM2019-11-06T06:00:00+5:302019-11-06T06:00:12+5:30
लालखडी रिंगरोडवरील जामियानगर स्थित जामिया इस्लामिया बुस्तान-ए-फातेमा लिल्बनात नावाच्या मदरशात शिक्षण घेणाºया एका अल्पवयीन मुलीचे लैंगिक शोषण झाल्याची धक्कादायक घटना सोमवारी उघडकीस आली. पीडिताच्या वडिलांच्या तक्रारीवरून नागपुरी गेट पोलिसांनी मदरसा संस्थाध्यक्ष मुफ्ती जियाउल्ला खान व फिरदौस नामक तेथील महिलेविरुद्ध गुन्हा नोंदविला.
लोकमत न्यूज नेटवर्क
अमरावती : मदरशात राहून शिक्षण घेणाऱ्या मुलीचे लैंगिक शोषण केल्याच्या प्रकरणातील मुख्य आरोपी मुफ्ती जियाउल्ला खान व फिरदौस नामक महिला पसार झाली आहे. पोलिसांकडून युद्धपातळीवर दोघांचाही शोध घेतला जात आहे. यादरम्यान मंगळवारी पोलिसांनी पीडित मुलीच्या दोन मैत्रिणींचे बयाण नोंदविले. पोलिसांनी सरकारी पंचासमक्ष घटनास्थळाचा पंचनामा करून मदरशाची झडती घेतली.
लालखडी रिंगरोडवरील जामियानगर स्थित जामिया इस्लामिया बुस्तान-ए-फातेमा लिल्बनात नावाच्या मदरशात शिक्षण घेणाºया एका अल्पवयीन मुलीचे लैंगिक शोषण झाल्याची धक्कादायक घटना सोमवारी उघडकीस आली. पीडिताच्या वडिलांच्या तक्रारीवरून नागपुरी गेट पोलिसांनी मदरसा संस्थाध्यक्ष मुफ्ती जियाउल्ला खान व फिरदौस नामक तेथील महिलेविरुद्ध गुन्हा नोंदविला. पोलीस पथक दोन्ही आरोपींना अटक करण्यासाठी गेले असता, ते दोघेही पसार झाल्याचे निदर्शनास आले.
दरम्यान, पोलिसांनी मदरशातील घटनास्थळ व कार्यालय सील केले. मदरशातील मुलींना मुफ्ती जियाउल्ला खानने १८ नोव्हेंबरपर्यंत सुट्टी दिल्याची बाब चौकशीत पुढे आली. सोमवारी रात्री मुफ्ती जियाउल्ला खान व त्याचा चालकाचे लोकेशन मोझरीनजीक होते. त्याला अटक करण्यासाठी पोलिसांचे पथक मोझरी गेले. मात्र, तेथून तो पसार झाला. पोलीस रित्या हाताने परतले. त्यानंतर जियाउल्ला खानचे लोकेशन पोलिसांना मिळालेले नाही. पोलीस जियाउल्ला खानच्या हातखेडा येथील निवासस्थानी गेले; तेथेही तो नव्हता. तो जिल्हाबाहेर पसार झाल्याची माहिती पुढे आली असून, त्या अनुषंगाने सर्व पोलीस यंत्रणांना माहिती देण्यात आली आहे. या प्रकरणात मदरशातील मुलींचे बयाण नोंदविण्यासाठी बाल कल्याण समिती व चाइल्ड लाइनची मदत घेण्यात येत आहे.
मुफ्ती जियाउल्ला खानच्या निवासस्थानी धडकले नागरिक
जियाउल्ला खान याच्या लालखडी परिसरातील निवासस्थानी सोमवारी रात्री शेकडो नागरिक धडक ले. यादरम्यान काही नागरिकांनी दगडफेक केल्याचीही चर्चा आहे. या माहितीच्या आधारे पोलिसांचा ताफा जियाउल्ला खानच्या निवासस्थानी पोहोचला. त्यानंतर तणावाची स्थिती निवळली.
२४ सप्टेंबरच्या रात्री पीडितासाठी भयावह
२४ सप्टेंबर रोजी रात्री ११ वाजताच्या सुमारास मदरशातील फिरदौस नामक महिलेने पीडित मुलीला मुफ्ती जियाउल्ला खानच्या खोलीत नेले. त्यानंतर पहाटे ४ वाजता पीडित मुलीला खोलीतून बाहेर आणले गेले. ती रात्र पीडित मुलीसाठी भयावह ठरली.
मुलीच्या लैंगिक अत्याचार प्रकरणातील दोन्ही आरोपी पसार झाले. पोलिसांकडून कसून शोध सुरू आहे. सरकारी पंचांसमक्ष घटनास्थळाचा पंचनामा करण्यात आला असून, मदरशाची झडती घेण्यात आली आहे. याशिवाय पीडिताच्या दोन मैत्रिणींचे बयाण नोंदविले आहे.
- अर्जुन ठोसरे, पोलीस निरीक्षक, नागपुरी गेट.