सागवान तस्करांचे ‘माफियाराज’

By लोकमत न्यूज नेटवर्क | Published: November 11, 2018 10:07 PM2018-11-11T22:07:44+5:302018-11-11T22:08:22+5:30

मेळघाटच्या जंगलातील सागवानची तस्करी करणारे दोन्ही तस्कर दुसऱ्यांदा नोटीस बजावूनसुद्धा रविवारी वनाधिकाऱ्यांपुढे हजर झाले नाहीत. दरम्यान, ब्राह्मणवाडा थडी येथील हर्षोद्दीन हसनोद्दीनला दीड वर्षांत चारवेळा अवैधरीत्या सागवान नेताना पकडण्यात आले.

'MafiaRaj' of Sagwan smugglers | सागवान तस्करांचे ‘माफियाराज’

सागवान तस्करांचे ‘माफियाराज’

Next
ठळक मुद्देचार वाहने जप्त : हर्षोद्दीनचा तडीपारीचा प्रस्ताव, वन विभागातील म्होरक्यांवर लक्ष

लोकमत न्यूज नेटवर्क
परतवाडा : मेळघाटच्या जंगलातील सागवानची तस्करी करणारे दोन्ही तस्कर दुसऱ्यांदा नोटीस बजावूनसुद्धा रविवारी वनाधिकाऱ्यांपुढे हजर झाले नाहीत. दरम्यान, ब्राह्मणवाडा थडी येथील हर्षोद्दीन हसनोद्दीनला दीड वर्षांत चारवेळा अवैधरीत्या सागवान नेताना पकडण्यात आले. तस्करीसाठी वापरलेली चारही वाहने वनविभागाने जप्त केली. त्याच्या तडीपारीचा प्रस्ताव पोलिसांकडे पाठविल्याची धक्कादायक माहिती पुढे आली आहे.
पूर्व मेळघाट वनविभागाच्या घटांग परिक्षेत्रातील बिहाली वर्तुळात सागवान वृक्षांची अवैध कत्तल करून त्याच्या चरपटा व इतर साहित्याची विक्री करण्यात आल्याचा प्रकार उघडकीस येताच वनविभागात एकच हडकंप माजला होता. वरिष्ठांना कळविल्यानंतर या संपूर्ण प्रकरणावर अत्यंत गोपनीयरीत्या सुरू झालेल्या कारवाईत दस्तुरखुद्द वनविभागाला समस्यांचा सामना करावा लागला. याप्रकरणी १७ सागवान वृक्षतोड केल्याबद्दल कोहाना येथील तीन आदिवासींना ताब्यात घेण्यात आले. वनकोठडीत त्यांनी सागवान ज्या तस्करांना विकले, त्यांचे पत्ते दिले. त्यावरून शहराच्या अजिजपुरा भागात अग्गा ऊर्फ कल्लू याच्या घरातून सागवान फर्निचर जप्त करण्यात आले, तर ब्राह्मणवाडा थडी येथील हर्षोद्दीन हसनोद्दीन इनामदार याच्या मार्कंडा येथील घरझडतीत काहीच आढळून आले नाही. मात्र, दोघांनाही वरिष्ठ वनाधिकाºयांपुढे हजर राहण्याची नोटीस बजावण्यात आली होती. रविवारी दुसऱ्यांदा नोटीस बजावूनदेखील सायंकाळपर्यंत ते वनविभागाच्या अधिकाऱ्यांपुढे आपली बाजू मांडण्यासाठी हजर झाले नाहीत. त्यामुळे आता वनाधिकारी पुढे काय कारवाई करतात, यावरच पर्यावरणप्रेमींचे लक्ष लागले आहे.
आदिवासी मोहरे; सागवानचा साठा पकडा
मेळघाटच्या जंगलात अवैध वृक्षतोड करून मिळविलेल्या सागवानच्या चरपटा व इतर साहित्य परतवाडा व परिसरातील काही ठरावीक फर्निचर दुकानांमध्ये मोठ्या प्रमाणात मध्यरात्री ते पहाटे ५ या वेळेत आणून अल्प किमतीत या तस्करांना विकले जाते. आदिवासींना किरकोळ रकमेचे आमिष दाखवून सागवान तस्कर त्यांच्याकडून हे कृत्य करवून घेत असल्याचे सत्य आहे. त्यामुळे वनविभागाने मोठे धाडसत्र राबवून शहरातील अवैध सागवानाचा जखिरा पकडण्याची करामत दाखविण्याची गरज आहे.
हर्षोद्दीन तस्कर नव्हे, माफिया?
परतवाडा वनविभागाच्या पथकाने ब्राह्मणवाडा थडी येथील हर्षोद्दीन इनामदार याला दीड वर्षात चार वेळा दोन लाखांची सागवान तस्करी करताना वेगवेगळ्या चार वाहनांत पकडले. प्रत्येक वेळी सागवानसह त्याची कार जप्त करण्यात आली. तरीही हार न मानता त्याने तस्करी सुरूच ठेवल्याचे यावरून स्पष्ट होते. लाखो रुपयांच्या चार कार पकडण्यात आल्यानंतरसुद्धा सागवान तस्करीचा व्यवसाय सुरूच आहे. बिहाली जंगलातील सागवान त्याला विकल्याची कबुली कोहाना येथील आरोपींनी दिली. त्याच्या तडीपारीचा प्रस्ताव ब्राह्मणवाडा थडी पोलिसांना दिला असल्याचे परतवाड्याचे वनपरिक्षेत्र अधिकारी शंकर बारखडे यांनी ‘लोकमत’शी बोलताना सांगितले. ब्राह्मणवाडा थडी, परतवाडा, अचलपूर, अंजनगाव या संपूर्ण पट्ट्यात सागवान माफियांचा राज असल्याने त्याच्यावर कारवाईची गरज आहे, हे विशेष.
वनपाल परतले, वनाधिकाऱ्यांमध्ये जुंपली
चिखलदरा व घटांग येथील वनाधिकारी, कर्मचारी परतवाडा शहरात धाडी टाकत असताना, परतवाडा येथील अधिकारी-कर्मचारी सहकार्य न करता सुट्टीवर गेल्याचे वृत्त ‘लोकमत’मध्ये झळकताच वनपाल बाबूराव झांबरे तत्काळ कर्तव्यावर हजर झाल्याचे सांगण्यात आले. या प्रकरणात संपूर्ण सहकार्य केल्याचे वनपरिक्षेत्र अधिकारी शंकर बारखडे यांनी स्पष्ट केले. त्यामुळे आता किती सागवान तस्करांवर कारवाई होते. यावर सर्वांच्या नजरा खिळल्या आहेत. दरम्यान, ‘लोकमत’मध्ये वृत्त प्रकाशित होताच समकक्ष अधिकाºयांमध्ये जुंपल्याची चर्चा वनवतुर्ळात सुरू आहे.

Web Title: 'MafiaRaj' of Sagwan smugglers

Get Latest Marathi News , Maharashtra News and Live Marathi News Headlines from Politics, Sports, Entertainment, Business and hyperlocal news from all cities of Maharashtra.