बंदीजनाच्या मृत्यूप्रकरणी दंडाधिकार्यांकडून चौकशी
By लोकमत न्यूज नेटवर्क | Published: September 25, 2021 04:12 AM2021-09-25T04:12:10+5:302021-09-25T04:12:10+5:30
अमरावती : येथील अमरावती मध्यवर्ती कारागृहातील न्यायबंदीच्या मृत्यूप्रकरणी माहितगारांनी माहिती देण्याचे आवाहन उपविभागीय दंडाधिकारी रणजित भोसले यांनी केले आहे. ...
अमरावती : येथील अमरावती मध्यवर्ती कारागृहातील न्यायबंदीच्या मृत्यूप्रकरणी माहितगारांनी माहिती देण्याचे आवाहन उपविभागीय दंडाधिकारी रणजित भोसले यांनी केले आहे. न्यायबंदी अमोल शामराव मोहोड (रा. पांढरी खानापूर, ता. अंजनगाव सुर्जी) यांचा १७ मे २०२१ रोजी रात्री ९.३० वाजता जिल्हा सामान्य रुग्णालयात मृत्यू झाला. याबाबत जिल्हा दंडाधिकारी यांनी चौकशीचे आदेश दिले असून, चौकशी अधिकारी म्हणून उपविभागीय दंडाधिकाऱ्यांची नियुक्ती केली आहे.
या चौकशीमध्ये कैद्याच्या मृत्यूचे कारण, कैद्याचे मृत्यूपूर्व स्वास्थ्य, कैद्याला मारहाण होऊन त्यामध्ये मृत्यू झाला किंवा कसे, या प्रकरणात पोलिसांची भूमिका, वैद्यकीय उपचाराची कागदपत्रे व व्हिसेरा अहवाल या बाबींची चौकशी करण्यात येणार आहे. याबाबत ज्यांना माहिती असेल किंवा यासंबंधी माहिती द्यावयाची असेल अशा सर्व इच्छुकांनी तसेच संबंधित अधिकाऱ्यांनी वस्तुस्थितीदर्शक माहिती व आवश्यक कागदपत्रासह त्यांची प्रतिज्ञापत्रे उपविभागीय अधिकारी तथा उपविभागीय दंडाधिकारी, तहसील कार्यालय परिसर, श्याम चौक, अमरावती यांच्या कार्यालयात कार्यालयीन वेळेत गुरुवार ३० सप्टेंबरपर्यंत स्वतः सादर करावीत, असे आवाहन चौकशी अधिकारी भोसले यांनी केले आहे.