वन आणि व्याघ्र प्रकल्पातील खुर्चीला लोहचुंबक
By लोकमत न्यूज नेटवर्क | Published: September 16, 2021 04:17 AM2021-09-16T04:17:52+5:302021-09-16T04:17:52+5:30
लोकमत विशेष नरेंद्र जावरे, परतवाडा (अमरावती) : मेळघाट व्याघ्र प्रकल्प आणि वनविभागातील तब्बल ११ लेखापाल, लिपिकांचे स्थानांतर होऊनसुद्धा बदलीच्या ...
लोकमत विशेष
नरेंद्र जावरे, परतवाडा (अमरावती) : मेळघाट व्याघ्र प्रकल्प आणि वनविभागातील तब्बल ११ लेखापाल, लिपिकांचे स्थानांतर होऊनसुद्धा बदलीच्या ठिकाणी १५ दिवसानंतर ते गेलेच नसल्याचा धक्कादायक प्रकार पुढे आला आहे. आर्थिक मिळकतीच्या या खुर्च्यांना नोटांचे ‘लोहचुंबक’ असल्याची चर्चा वनवृत्तातील चारही जिल्ह्यांमध्ये सुरू आहे
बदली सत्र सुरू असल्याने वनरक्षक ते उपवनसंरक्षकांपर्यंत सर्वांनाच स्थानांतरण झालेल्या ठिकाणी विविध कालावधीत रुजू होण्याचे आदेश शासकीय नियमाप्रमाणे वरिष्ठ अधिकाऱ्यांनी दिले. परंतु, बुलडाणा व अमरावती जिल्ह्यातील कार्यालयीन लेखापाल, लिपिकांनी आदेशाची पायमल्ली केल्याचे चित्र आहे. वर्षानुवर्षे एकाच खुर्चीवर चिकटून बसलेले कर्मचारी खुर्ची सोडायला तयार नसल्याचे पुढे आले आहे. मुख्य वनसंरक्षक (प्रादेशिक) जयोती बॅनर्जी यांनी ९ ऑगस्ट रोजी वनवृत्तातील ११ लेखापाल, लिपिकांच्या बदल्या केल्या आहेत.
----------------
महिना लोटूनही खुर्चीला चिटकूनच
बदली आदेशानंतर संबंधित लेखापाल लिपिक यांना बदली ठिकाणी ३१ ऑगस्ट पूर्वी कार्यमुक्त करण्यात यावे. त्या दिनांकानंतर त्यांचे वेतन व भत्ते पूर्वीच्या विभागातून वितरित केले जाणार नाही, असे आदेश पत्रात देण्यात आले. पदस्थापनेच्या ठिकाणी रुजू होईपर्यंत संबंधित कर्मचाऱ्यांना कार्यालयाच्या पूर्वपरवानगीशिवाय कोणत्याही कारणास्तव रजा मंजूर करू नये तसेच बदली झालेल्या कर्मचाऱ्याने कोणतेही प्रकारचे रद्द करण्यासाठी दबाव आणू नये. केल्यास नियमानुसार कारवाई करण्यात येणार असल्याचे नमूद असले तरी बदली ठिकाणी खुर्चीला चिकटलेले बाबू गेलेच नसल्याची माहिती पुढे आली आहे.
-------------
अधिकाऱ्याची की बाबूंची मर्जी?
वर्षानुवर्षे एकाच ठिकाणी व शहराच्या ठिकाणी या कार्यालयातून त्या कार्यालयात स्थानांतरासाठी मर्जीने बेडुकउड्या घेतात. लेखापाल, लिपिक हे कर्मचारी आर्थिक मर्जी सांभाळत असल्याने अधिकारीही स्थानांतर झाल्यावर बाबूंना बदलीवर सोडत नसल्याची चर्चा बरीच बोलकी आहे