विद्यापीठाच्या युवा महोत्सवाची शानदार सांगता
By ऑनलाइन लोकमत | Published: October 6, 2019 09:18 PM2019-10-06T21:18:24+5:302019-10-06T21:19:00+5:30
कुलगुरूंची उपस्थिती : फिरती ट्रॉफी व्हीएमव्ही आणि श्री शिवाजी विज्ञान महाविद्यालय चमुला संयुक्तरीत्या प्रदान
अमरावती : संत गाडगेबाबा अमरावतीविद्यापीठाच्या युवा महोत्सवाची शानदार सांगता झाली. युवा महोत्सवाची फिरती ट्रॉफी येथील शासकीय विदर्भ ज्ञान विज्ञान संस्था आणि श्री शिवाजी विज्ञान महाविद्यालयास संयुक्तपणे बहाल करण्यात आली. या महोत्सवात १८० महाविद्यालयांतील सुमारे २८०० विद्यार्थ्यांनी उपस्थिती दर्शविली.
संत गाडगे बाबा अमरावती विद्यापीठाच्यावतीने शासकीय विदर्भ ज्ञान-विज्ञान संस्थेच्या संगीतसूर्य केशवराव भोसले सभागृहात आयोजित युवा महोत्सवाच्याच्या समारोपप्रसंगी व्यासपीठावर विशेष अतिथी म्हणून कुलगुरू मुरलीधर चांदेकर उपस्थित होते. प्रमुख पाहुणे म्हणून उच्च शिक्षण सहसंचालक केशव तुपे, कुलसचिव तुषार देशमुख, व्यवस्थापन परिषदेचे सदस्य प्रफुल्ल गवई, शासकीय विदर्भ ज्ञान-विज्ञान संस्थेचे संचालक वसंत हेलावी रेड्डी, विद्यार्थी विकास संचालक दिनेश सातंगे, रासेयो संचालक राजेश बुरंगे, कमल भोंडे, राजीव बोरकर, जयश्री वैष्णव, युवामहोत्सव समन्वयक सुधीर मोहोड व सहसमन्वयक विनोद गावंडे उपस्थित होते. यावेळी कुलगुरू चांदेकर यांनी युवा महोत्सव नवनवीन शिकण्यासाठी उत्तम व्यासपीठ असून या माध्यमातून विद्यार्थ्यांनी शिकण्याचा संकल्प करावा, असे आवाहन केले.
भारतीय शास्त्रीय गायन, स्वर वाद्य, शास्त्रीय वाद्य संगीत, तालवाद्य, सुगम संगीत, पाश्चिमात्य गायन, भारतीय समूह गायन, पाश्चिमात्य समूह गान, पाश्चिमात्य वाद्य संगीत, फोक आॅर्केस्ट्रा, लोकनृत्य, शास्त्रीय नृत्य, प्रश्न मंजूषा, वक्तृृत्व स्पर्धा, वादविवाद स्पर्धा, एकांकिका, प्रसव स्किट, माईम, मिमिक्री, फाईन आर्ट्स, आॅन दी स्पॉट पेंटीग, कोलाज, पोस्टर मेकिंग, माती कला, व्यंगचित्र, रांगोळी, स्थळ छायाचित्रण, स्थापना, मेहंदी या कला प्रकारात प्रथम, द्वितीय व तृतीय क्रमांक प्राप्त कलावंत व स्पर्धकांना कुलगुरू मुरलीधर चांदेकर व उपस्थित मान्यवरांच्यावतीने स्मृतिचिन्ह देऊन गौरविण्यात आले. युवा महोत्सवाची फिरती ट्रॉफी कुलगुरुंनी नाणेफेकद्वारे प्रथम सहा महिने शासकीय विदर्भ ज्ञान विज्ञान संस्था आणि नंतरच्या सहा महिन्यांकरिता शिवाजी विज्ञान महाविद्यालयाच्या चमुला प्रदान केली.
यावेळी प्रस्ताविक सुधीर मोहोड यांनी तर, दिनेश सातंगे व वसंत हेलावी रेड्डी यांनी मनोगत व्यक्त केले. पाहुण्यांचा परिचय उज्ज्वला देशमुख यांनी केला. राजीव बोरकर व प्रफुल्ल गवई यांनी बक्षीस वितरण समारंभाचे तर, देवळाणकर यांनी कार्यक्रमाचे संचालन केले. आभार विनोद गावंडे यांनी मानले. समारोप कार्यक्रमाला परीक्षा व मूल्यमापन मंडळाचे संचालक हेमंत देशमुख, वित्त व लेखा अधिकारी भारत कºहाड, जनसंपर्क अधिकारी विलास नांदुरकर आदी उपस्थित होते.