ओबीसी विद्यार्थ्यांचे वैमानिक होण्याचे स्वप्न होणार पूर्ण
By लोकमत न्यूज नेटवर्क | Published: January 21, 2022 01:31 PM2022-01-21T13:31:30+5:302022-01-21T14:11:56+5:30
वयाची १८ वर्षे पूर्ण करणारे आणि भौतिक, रसायनशास्त्र, गणित विषय घेऊन बारावी परीक्षा उत्तीर्ण शहरी भागातील ७० टक्के, तर ग्रामीण भागातील ६५ टक्के गुणांसह विद्यार्थी अर्ज करण्यास पात्र आहेत.
अमरावती : महात्मा ज्योतिबा फुले संशोधन व प्रशिक्षण संस्था (महाज्योती) या राज्य शासनाच्या स्वायत्त संस्थेतर्फे ओबीसी, व्हीजेएनटी, एसबीसी विद्यार्थ्यांना मोफत कमर्शिअल पायलट ट्रेनिंग देण्याचा निर्णय घेतला आहे. या प्रशिक्षणानंतर या विद्यार्थ्यांना प्लेसमेंट मिळणार असून, ओबीसी विद्यार्थी-विद्यार्थिनींचे उंच आकाशात विमान उडविण्याचे स्वप्न या महत्त्वाकांक्षी योजनेतून पूर्ण होणार आहे.
महाज्योतीने याबाबत राज्य शासनाच्या नागपूर फ्लाईंग क्लबशी करार केला आहे. त्यानुसार प्रतिविद्यार्थी २७ लाख रुपये शुल्क आकारले जाणार आहे. मात्र, हे सर्व शुल्क महाज्योती अदा करणार आहे. निवड झालेल्या विद्यार्थ्यांना नागपूर येथे मोफत कमर्शिअल पायलट ट्रेनिंग मिळणार आहे. प्रशिक्षणाचा कालावधी १८ महिन्यांचा असणार आहे. त्यासाठी गरजू विद्यार्थ्यांना विद्यावेतन देण्याची बाबसुद्धा संचालक मंडळासमोर आहे. या वर्षी नागपूर फ्लाईंग क्लबकडे प्रशिक्षणासाठी केवळ २० जागा उपलब्ध असल्यामुळे महाज्योतीने ऑनलाईन अर्ज मागविले आहेत.
हे विद्यार्थी करू शकतील अर्ज
वयाची १८ वर्षे पूर्ण करणारे आणि भौतिक, रसायनशास्त्र, गणित विषय घेऊन बारावी परीक्षा उत्तीर्ण शहरी भागातील ७० टक्के, तर ग्रामीण भागातील ६५ टक्के गुणांसह विद्यार्थी अर्ज करण्यास पात्र आहेत. १८ ते २८ वयोमर्यादा आणि नाॅन क्रिमिलेयर असणे बंधनकारक करण्यात आले आहे.
महाज्योतीच्या संकेतस्थळावर करावा अर्ज
ओबीसी, व्हीजेएनटी, एसबीसी विद्यार्थ्यांनी महाज्योतीच्या संकेतस्थळावर जाऊन महाज्योतीच्या मोफत कमर्शिअल पायलट ट्रेनिंगचा लाभ घ्यावा. त्यासाठी १२ फेब्रुवारी २०२२ पर्यंत संपूर्ण आवश्यक कागदपत्रे अपलोड करून ऑनलाईन अर्ज सादर करावा लागणार आहे.
ओबीसी, व्हीजेएनटी, एसबीसी विद्यार्थ्यांना मोफत कमर्शिअल पायलट ट्रेनिंगसाठी लागणारा निधी शासनाने दिला आहे. नागपूर फ्लाइंग क्लबसोबत तसा करारदेखील झाला आहे. यात पात्र विद्यार्थ्यांचे वैमानिक होण्याचे स्वप्न नक्कीच पूर्ण होईल.
- प्रा. दिवाकर गमे, संचालक, महाज्योती.