२१ हजार भाविकांचे सामूहिक महापारायण
By लोकमत न्यूज नेटवर्क | Published: January 13, 2018 10:56 PM2018-01-13T22:56:40+5:302018-01-13T22:58:02+5:30
शेतकऱ्यांवरील संकट दूर करण्याचे साकडे घालण्यासाठी श्री संत गजानन महाराज भक्तपरिवार महापारायण सेवा समितीच्यावतीने २१ जानेवारी रोजी सकाळी ७ पासून रेवसा मार्गावरील श्रीगुरू गजाननधाम येथे एकाच वेळी २१ हजार भाविक ‘गजानन विजय’ ग्रंथाचे पारायण करणार आहेत.
आॅनलाईन लोकमत
अमरावती : शेतकऱ्यांवरील संकट दूर करण्याचे साकडे घालण्यासाठी श्री संत गजानन महाराज भक्तपरिवार महापारायण सेवा समितीच्यावतीने २१ जानेवारी रोजी सकाळी ७ पासून रेवसा मार्गावरील श्रीगुरू गजाननधाम येथे एकाच वेळी २१ हजार भाविक ‘गजानन विजय’ ग्रंथाचे पारायण करणार आहेत. हे देशातील सर्वांत मोठे महापारायण राहणार असल्याचा विश्वास समितीचे अध्यक्ष तथा पालकमंत्री प्रवीण पोटे यांनी कार्यक्रमस्थळी शनिवारी आयोजित पत्रपरिषदेत व्यक्त केला.
महापारायण सोहळ्याची तयारी अंतिम टप्प्यात आली असून, आतापर्यंत राज्यभरातून १८ हजार तसेच अमरावती जिल्ह्यातून चार हजार भाविकांची नोंदणी झाली आहे. इतर राज्यांसह परदेशातूनही नोंदणी झाली आहे. शेगाव संस्थानच्या धर्तीवर पाच हजार सेवेकरी सेवा देणार आहेत. विशेष म्हणजे, १५० मुस्लीम सेवेकरी आहेत. यावेळी एक लाखापेक्षा जास्त भाविकांकरिता महाप्रसादाचे नियोजन समितीने केले आहे. ३९००० चौ. फुटाचा मंडप तयार करण्यात आला असून, एक लाख चौरस फुटाचे स्वयंपाकगृह तयार केले आहे.
दोन लाख पाणी बॉटल
दानदात्यांकडून दोन लाख पाणी बॉटल वितरित होतील. डॉक्टरांची चमू व अॅम्ब्यूूलन्स व्यवस्था राहणार आहे. पत्रपरिषदेला खा. आनंदराव अडसूळ, सुरेखा ठाकरे, ज्ञानेश्वर धाने पाटील, प्रकाश साबळे, समितीचे सचिव सुधीर वाकोडे, शशिकांत पोकळे, जयवंत महल्ले, मनोज राऊत, रवि देशमुख, अजय जगताप, जयंत हरणे, जगदीश गुल्हाने, आशिष वानखडे, विजय पुंडकर, दीपक यादव, राजेश बहाळे, महेंद्र राऊत, उज्ज्वला देशमुख, शारदा टवाणी, भारती बजाज आदींची उपस्थिती होती. आरटीओ रामभाऊ गिते, एसडीओ इब्राहिम चौधरी, महापालिका उपायुक्त नरेंद्र वानखडे, जिल्हा शल्यचिकित्सक श्यामसुंदर निकम, कार्यकारी अभियंता मोहोड, ठाणेदार मनीष ठाकरे उपस्थित होते.
शोभायात्रा २० जानेवारी रोजी
विवेकानंद कॉलनी येथील श्री संत गजानन महाराज मंदिरातून २० जानेवारी रोजी सकाळी ७.३० वाजता ‘श्रीं’ची शोभायात्रा निघणार आहे. रुक्मिणीनगर, राजकमल चौक, जयस्तंभ चौक, मालवीय चौक, इर्विन चौक, पंचवटी, शेगाव नाका व नवसारीकडून रेवसा मार्गावरील गजानन धाम येथे शोभायात्रा पोहोचणार आहे. यामध्ये शेगाव, कोंडोलीसह अन्य ठिकाणांहून ५० दिंड्या व वारकरी शोभायात्रेत सहभागी होणार आहेत.