Maharashtra Assembly Election 2019 (18062) - बिगूल वाजला, आचारसंहिता लागू, यंत्रणा सज्ज
By लोकमत न्यूज नेटवर्क | Published: September 22, 2019 01:39 AM2019-09-22T01:39:07+5:302019-09-22T01:40:14+5:30
जिल्ह्यात आठ विधानसभा मतदारसंघांमध्ये एकूण २४ लाख ४५ हजार ७६६ मतदार आहेत. यामध्ये १२ लाख ५८ हजार ९९ पुरुष, ११ लाख ८७ हजार ६२५ स्त्री व ४२ इतर मतदार आहेत. २६०७ मतदान केंदे्र व २१ साहाय्यकारी अशा एकूण २६२८ मतदान केंद्रांवर मतदान होणार आहे. यापैकी तीन केंद्रांच्या नावात बदल झालेला आहे, तर १६ केंद्रांचे ठिकाण बदलले आहे.
लोकमत न्यूज नेटवर्क
अमरावती : जिल्ह्यातील आठ विधानसभा मतदारसंघांसाठी २७ सप्टेंबरला निवडणूक अधिसूचना प्रसिद्ध करण्यात आल्यानंतर ४ ऑक्टोबरपर्यंत उमेदवारी अर्ज सादर करण्याची प्रक्रिया होणार आहे. निवडणुकीसाठी यंत्रणा सज्ज आहे. यावेळची विधानसभा निवडणूक पर्यावरणस्रेही व्हावी. कोणत्याही राजकीय पक्षाने प्रदूषणास कारक पदार्थांचा वापर करू नये, असे आवाहन जिल्हाधिकारी शैलेश नवाल यांनी शनिवारी पत्रपरिषदेत केले.
जिल्ह्यात आठ विधानसभा मतदारसंघांमध्ये एकूण २४ लाख ४५ हजार ७६६ मतदार आहेत. यामध्ये १२ लाख ५८ हजार ९९ पुरुष, ११ लाख ८७ हजार ६२५ स्त्री व ४२ इतर मतदार आहेत. २६०७ मतदान केंदे्र व २१ साहाय्यकारी अशा एकूण २६२८ मतदान केंद्रांवर मतदान होणार आहे. यापैकी तीन केंद्रांच्या नावात बदल झालेला आहे, तर १६ केंद्रांचे ठिकाण बदलले आहे. या निवडणूक प्रक्रियेत मतदारांचे नाव मतदार यादीत असणे महत्त्वाचे आहे. ही प्रक्रिया सुरू असल्याने मतदार नोंदणी करण्याचे आवाहन जिल्हधिकाऱ्यांनी केले.
निवडणुकीकरिता ५,०६७ बॅलेट युनिट, ३७२६ कंट्रोल युनिट व ३७९० व्हीव्हीपॅट उपलब्ध आहेत. या सर्व ईव्हीएमची प्रथमस्तर चाचणी ३१ ऑगस्टला पूर्ण झालेली आहे. आठ विधानसभा मतदारसंघांमध्ये २६२८ मतदान केंद्राध्यक्ष व प्रत्येक केंद्रावर तीन मतदान अधिकारी असे एकूण ११ हजार ५५६ अधिकारी-कर्मचाऱ्यांचे मनुष्यबळ लागणार आहे. याव्यतिरिक्त ५४४८ पोलीस पाटील व कोतवाल यांचेही सहकार्य निवडणुकीत राहणार आहे. यासोबतच प्रत्येक मतदान केंद्रावर दोन याप्रमाणे पोलीस बंदोबस्ताचे नियोजन आहे. संवेदनशील मतदान केंद्रावर अधिक कुमक तैनात ठेवण्यात येणार असल्याचे जिल्हाधिकारी शैलेश नवाल यांनी सांगितले. सीमा तपासणी नाक्यासंदर्भात जिल्हालगतच्या चार जिल्ह्यांतील अधिकाऱ्यांची बैठक शुक्रवारी घेण्यात आली. सर्व मतदारसंघांत एक-दोन दिवसात फ्लाइंग स्कॉड व सर्व पथकांचे गठण व आचारसंहितेच्या दृष्टीने काटेकोर अंमलबजावणी होणार आहे. विधानसभा निवडणूक प्रक्रिया ही मतदारसंघ मुख्यालयी ‘आरओ’ स्तरावर होणार असल्याचे ते म्हणाले. पत्रपरिषदेला उपजिल्हा निवडणूक अधिकारी शरद पाटील, एमसीएमसी समितीचे हर्षवर्धन पवार उपस्थित होते.
पदाधिकाऱ्यांची वाहने जमा करणार
आयोगाने निवडणुकीची घोषणा केली त्या क्षणापासून आठही मतदारसंघांत आदर्श आचारसंहिता लागू झालेली असल्याने पदाधिकाऱ्यांची शासकीय वाहने जमा करण्यात येणार आहेत. सायंकाळपर्यंत बहुतांश पदाधिकाऱ्यांची वाहन जमा होतील, असे जिल्हाधिकारी म्हणाले. याशिवाय ४८ तासांच्या आत सार्वजनिक ठिकाणी लागलेली राजकीय फलके, होर्डिंग काढण्यात येणार आहेत. मतदारांवर प्रभाव पडेल अशी कोणतीही बाब करता येणार नाही, असे जिल्हाधिकारी म्हणाले.
खर्चाची मर्यादा २८ लाख
विधानसभा निवडणुकीसाठी उमेदवारांना खर्चाची मर्यादा २८ लाख रुपयांची आहे व या मर्यादेच्या आत उमेदवारांना निवडणूक खर्च करावा लागणार आहे. यावर लक्ष ठेवण्यासाठी भरारी पथके, व्हीओओ पथके राहणार आहेत तसेच सर्व सीमांवर चेक पोस्ट राहणार आहेत. आयोगाचे अॅपदेखील या निवडणुकीत कार्यान्वित राहील. याव्यतिरिक्त १९५० या टोल फ्री क्रमांकावर मतदारांना तक्रार करता येणार आहे. २४ महिला केंद्रे राहतील. १० संवेदनशील केंद्रांवर ‘वेब कास्टिंग’ करण्यात येईल, असे जिल्हाधिकारी म्हणाले.
निवडणूक कार्यक्रम
अधिसूचना प्रसिद्धी
२७ सप्टेंबर
उमेदवारी अर्जाचा अंतिम दिनांक
४ ऑक्टोबर
उमेदवारी अर्ज छाननी
५ ऑक्टोबर
उमेदवारी अर्ज माघार
७ ऑक्टोबर
मतदान
२१ ऑक्टोबर
मतमोजणी
२४ ऑक्टोबर