"महाराष्ट्र लुटेंगे और हमारे दोस्तोंको बाटेंगे हा भाजपचा अजेंडो"; अमरावतीमध्ये उद्धव ठाकरेंची बोचरी टीका
By ऑनलाइन लोकमत | Published: November 7, 2024 06:23 PM2024-11-07T18:23:57+5:302024-11-07T18:25:57+5:30
'बटेंगे तो कटेंगे' घोषणेवरुन उद्धव ठाकरे यांनी भाजपवर निशाणा साधला आहे.
Maharashtra Assembly Election 2024 : महाराष्ट्राच्या विधानसभा निवडणुकीत उत्तर प्रदेशचे मुख्यमंत्री योगी आदित्यनाथ यांच्या 'बटेंगे तो कटेंगे'ची जोरदार चर्चा सुरु आहे. मुख्यमंत्री योगी आदित्यनाथ यांनी बटेंगे तो कटेंगे अशी घोषणा दिली होती. या घोषणेवरुनच शिवसेना उद्धव बाळासाहेब ठाकरे पक्षाचे प्रमुख उद्धव ठाकरे यांनी भाजपवर निशाणा साधला आहे. 'बटेंगे तो कटेंगे नाही तर महाराष्ट्र को लुटेंगे' हा भाजपचा अजेंडा असल्याचे उद्धव ठाकरे यांनी म्हटलं.
उद्धव ठाकरे यांनी अमरावतीमध्ये दर्यापूर येथे सभेत बोलताना महायुती सरकारवर टीकास्त्र सोडले. यंदाची निवडणूक ही महायुती विरुद्ध महाविकास आघाडी अशी नाही, तर महाराष्ट्र प्रेमी विरुद्ध महाराष्ट्र द्रोही अशी आहे. आपण सगळेजण महाराष्ट्र प्रेमी म्हणून एकवटलो आहोत आणि पलिकडे महाराष्ट्र द्रोही आहेत, अशी टीका उद्धव ठाकरे यांनी केली. यावेळी बटेंगे तो कटेंगे या घोषणेवरूनही उद्धव ठाकरे यांनी भाजपवर निशाणा साधला.
"भाजप महाराष्ट्राला लाचार करायला निघाला आहे. आता त्यांची घोषणा आहे बटेंगे तो कटेंगे. मी बघतो कोण कापायला येतोय. भाजपचा अजेंडा बटेंगे तो कटेंगे नाही तर महाराष्ट्र को लुटेंगे और हमारे दोस्तोंको बाटेंगे हा आहे. आम्ही लुटू देणार नाही, आम्ही तुटू देणार नाही. माझा महाराष्ट्र मी स्वावलंबी आणि सर्वोत्तम करून दाखवल्याशिवाय राहणार नाही," असे उद्धव ठाकरे म्हणाले.
"आपल्या सरकारचं काय वाईट चाललं होतं. पाच वर्ष तरी पूर्ण करू द्यायची होती. त्यानंतर मी काय वाईट करत होतो ते बोंबलून सांगायचं होतं. अडीच वर्षात शेतकऱ्यांची कर्ज मुक्ती केली होती. ती कर्जमुक्ती केल्यानंतर कधीच तुमच्यासमोर येऊन मी शो केला नाही. कारण मी तुम्हाला जे कर्जमुक्त केलं. ते तुमच्यावर उपकार नव्हते केले तर मी माझं कर्तव्य पार पाडलं होतं. कमीतकमी त्रासात महाविकास आघाडी सरकारने शेतकऱ्याला कर्जमुक्त करून दाखवलं होतं. मी कधीच अहंकराने शेखी मिरवली नव्हती. मी खिशातून पैसे काढून शेतकऱ्यांना कर्जमुक्त नव्हतं केलं," असेही उद्धव ठाकरे म्हणाले.
"मी कधी हे मिरवून सांगितलं नाही. आज ज्यांचं हे सुरु आहे हे सगळे भाऊ. एक देवाभाऊ. एक दाढी भाऊ अन् तिसरा जॅकेट भाऊ. यांच्यामध्ये भाऊबंदकी एवढी झाली आहे. पण एका बाबत यांची एकी झाली आहे. आपण तिघे भाऊ भाऊ सगळे मिळून महाराष्ट्र खाऊ. आता निवडणुकीमुळे यांना बहीणींवर प्रेम आलं आहे. पण महिलांच्या सुरक्षेचे काय?," असा सवाल उद्धव ठाकरेंनी केला.