अमरावती येथे राजीव गांधी मतदान केंद्रांवरून इव्हीएम पळविल्याचा आरोप
By प्रदीप भाकरे | Updated: November 20, 2024 23:47 IST2024-11-20T23:46:52+5:302024-11-20T23:47:36+5:30
राजकीय कार्यकर्ते आक्रमक : गोपालनगरला पोलिस छावणीचे स्वरूप

अमरावती येथे राजीव गांधी मतदान केंद्रांवरून इव्हीएम पळविल्याचा आरोप
प्रदीप भाकरे, अमरावती : गोपालनगरस्थित राजीव गांधी उच्च प्राथमिक शाळेतील मतदान केंद्रांवरून अज्ञातांनी दुचाकीहून इव्हीएम पळवून नेल्याचा आरोप स्थानिकांनी केल्याने त्या परिसराला पोलिस छावणीचे स्वरूप आले आहे. सायंकाळी ७.३० च्या सुमारास तो प्रकार उघड झाला. मात्र अद्यापही तेथील
वातावरण शांत झाले नसून, बडनेरा विधानसभा मतदारसंघाचे अपक्ष उमेदवार तुषार भारतीय व प्रीति बंड यांच्यासह हजारो कार्यकर्ते तेथे तळ ठोकून
आहेत.
पोलीस उपायुक्त गणेश शिंदे व सागर पाटील यांनी बडनेरा विधानसभा मतदारसंघाच्या निवडणूक निर्णय अधिकाऱ्यांना त्या मतदान केंद्रावर पाचारण केले असून, उशिरा रात्रीपर्यंत तेथील तणाव निवळला नव्हता. काही स्थानिकांना काही अज्ञात लोक इव्हीएम दुचाकीहून व पायदळ घेऊन जात असल्याचे दिसले. त्यानंतर तणाव निर्माण झाला.
बडनेरा येथील येथील दुचाकी वर ईव्हीएम नेण्याप्रकरणी स्पष्टीकरण देण्यात आले आहे. सदरील मतदान केंद्रावरील सर्व ईव्हीएम निवडणूक निर्णय अधिकारी यांच्याकडे सुरक्षित आहे. याबाबत नागरिकांमध्ये झालेल्या संभ्रमाबाबत स्वतः निवडणूक निर्णय अधिकारी मतदान केंद्रावर पोहचत आहे. ईव्हीएम बाबत कोणताही अनुचित प्रकार घडला नाही. - गजानन कोटुरवार, जिल्हा माहिती अधिकारी